खटल्याचे घर : समतोल मनपरिवर्तन केंद्र

    15-Mar-2023
Total Views |
Samatol Foundation

समतोल मनपरिवर्तन केंद्र गेली १८ वर्षे मुलांना घडविण्याचे काम करत आहे. अनेक मुलांच्या आयुष्यात यामुळे परिर्वतन झालेले आहे. संस्था मुलामध्ये बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते. या कार्यासंदर्भात काही...

भारतीय परंपरा आपल्याला माहितीच आहे. आपली समाजव्यवस्था ही कुटुंबव्यवस्था आहे. खरंतर कुटुंब म्हणजे काय? तर आपल्या संतांनी ‘हे विश्वची माझे घर’ असे म्हटले आहे. काळानुसार परिस्थिती बदलत जाते, हे जरी खरे असले, तरी एखादी गोष्ट संपूर्णपणे नष्ट होणे म्हणजे दुर्दैवाचे लक्षण ठरेल.अनेक गोष्टींचा आढावा घेताना कुटुंबव्यवस्थेमधील ‘खटल्याचे घर’ म्हणजे एक विद्यापीठ होते. इथे घरातीलच मंडळी शिक्षक होती, मुख्याध्यापक होती, गणित, भूगोल, इतिहास, शास्त्र सगळ्याच गोष्टींचा अभ्यास होता आणि यांचा वापर कुठे, कसा करायचा याची समज व भानदेखील दिले जात होते. पण त्याचबरोबर सामुदायिक प्रेमभाव नक्कीच होता. प्रेम, दया, शांती, आनंद या कुटुंबात नेहमी दिसायचा. कोणी शारीरिक किंवा मानसिक विकलांग असले, तर त्याच्याकडे जास्त लक्ष दिले जायचे. एखादा बौद्धिकदृष्ट्या कमजोर असेल, तर त्याला वेगळे प्रशिक्षण देऊन सक्षम केले जात असे. शेती हे खूप मोठे शास्त्र आहे, तंत्र आहे आणि आपल्या देशात शेती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भारत देशाची ओळख कृषिप्रधान देश अशी होती.

आजच्या स्थितीत कुटुंबव्यवस्था कोलमडत चालली आहे आणि त्याचे भयानक परिणाम दिसायलाही सुरुवात झाली आहे. मागील २५ वर्षांमध्ये बालगृह, अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा बर्‍याच विषयांवर चर्चा सातत्याने होताना दिसते. यामध्ये बर्‍याच वेळा विकासाच्या नावाखाली ही दुकाने मांडली गेली आहेत. वास्तव तर खूपच वेगळे आहे. अनेक चांगल्या मनाने काम करणार्‍या संस्था यामध्ये विनाकारण भरडल्या जातात.खरंतर संस्था म्हणजे खटल्याचे घर म्हणाला पाहिजे. कारण, खटल्याच्या घराची पद्धतसुद्धा संस्थेसारखीच होती. एक एक खटल्याच्या घरात २५/३० मुले सहज असायची आई-वडील, चुलते-चुलती, काका-काकी, मामा-मामी, मावशी, आत्या सर्वजण एकत्र असायचे. नणंद, भावजय एकत्र मैत्रिणी असायच्या. माहेरी गेलेली लेक जेव्हा सासरला जायला निघायची, तेव्हा आज जेवढी मंडळी असतात तेव्हा एवढी मंडळी फक्त मुलीला वाटेला लावायला यायची, अशी अनेक उदाहरणे देता येईल.

आज संस्थेमध्ये १००/१५० मुले इकडून तिकडून जमा करून ठेवली जातात. ती कोणत्याही एका ठराविक राज्याची किंवा जिल्ह्याची किंवा भाषेची नसतात. खरंतर मुलांना घडविण्यासाठी मुलांसोबत काम करायला पाहिजे, पण वास्तवामध्ये मुलांना दाखवून त्यातून अनुदान मिळविण्यासाठी आणि देणगी मिळविण्यासाठी मुलांबरोबर काम केले जाते. मुलांना मदत झाली पाहिजे, पण ते ‘खटल्याच्या घरा’प्रमाणे असले पाहिजे तरच विकासाची द्वारे खुली राहतील.’समतोल’च्या मनपरिवर्तन केंद्रात याच दृष्टिकोनातून विचार करून गेली १८ वर्षे मुलांना घडविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुलांची संख्या संस्थेत २५पेक्षा जास्त नसते. जेणेकरून प्रत्येक मुलामध्ये बदल घडविण्यासाठी लक्ष दिले जाईल. प्रत्येक मुलगा एक पुस्तक आहे आणि ते वाचता यावे म्हणून प्रत्येक कार्यकर्ता सक्षमपणे व मनापासून प्रयत्न करतो. तसेच वेगवेगळ्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या मुलांच्या बाबतीत अनेक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत संस्थेच्या रेकॉर्डवर ८५ हजारांपेक्षा जास्त मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन झाले आहे आणि आज समाजात सक्षमपणे कार्यरत आहेत.

सध्याचे स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात बाल-गोपालनगरी आम्ही पुन्हा एकदा अस्तिवात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. बालकांचे कायदे, नियम-अटी सर्व काही सरकारी अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीने ‘समतोल’ला मार्गदर्शन करत असली, तरी बालकांचा विकास आणि सक्षमता हे यातील मुख्य सूत्र आहे, हेही ‘समतोल’च्या कामा मधून दाखवले जात आहे.आजच्या स्थितीत सेंद्रिय शेतीमधून रसायनमुक्त भाजीपाला मुलांना मिळतो. देशी गाईंच्या गोसेवा माध्यमातून दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळत आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य व बौद्धिक शारीरिक क्षमता सक्षम होत आहे. एक ‘आत्मनिर्भर केंद्र’ म्हणून ’समतोल’ प्रकल्प विकसित होत आहे, पण यामध्ये बालप्रेमी व्यक्ती म्हणजेच आम्ही कार्यकर्ते आहोत. कारण, प्रत्येक मूल हे आपलेच आहे, अशी भावना आहे. हे कुठे शक्य आहे, तर कुटुंबव्यस्थेत शक्य आहे म्हणून ‘समतोल मनपरिवर्तन केंद्र’ म्हणजेच ‘खटल्याचे घर’ आहे.
 
 
-विजय जाधव





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.