मुंबई (प्रतिनिधी): मालाड येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या न्यु दिंडोशी परिसरातील बिबट्या अखेर वन विभागाने जेरबंद केला आहे. म्हाडाच्या रॉयल हिल्स सहकारी सोसायटीच्या परिसरात मुक्त संचार करणारा बिबट्या मंगळवारी सकाळी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.
न्यु दिंडोशी परिसरात नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा सलग दोन दिवस मुक्त संचार आढळून आला होता. दि. ७ आणि ८ मार्च रोजी सलग दोन दिवस मध्यरात्रीच्या वेळी बिबट्या मुक्त संचार करत असलेला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले होते. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या ५०० रहिवाशी कुटुंबातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. लहान मुलांचा तसेच नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता बिबट्या जेरबंद झाल्यामुळे येथाल नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
“पहाटे साडेपाचच्या दरम्यान मालाड येथील बिबट्या सापळ्यात अडकला आहे. बिबट्या सध्या वन विभागाच्या ताब्यात असून वन विभागाच्या पशुवैद्यांकडे तपासणीसाठी आहे. सुदैवाने या सगळ्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला केलेला नाही. बिबट्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल”, असे प्रतिक्रिया डीसीएफ संतोष सस्ते यांनी दिली आहे.
दरम्यान, बिबट्याचा संचार आढळुन येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालुन बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन कॅमेरा ट्रॅप्स आणि पिंजरा लावला होता. नागरी वस्तीमध्ये कचऱ्याचे ढीग जसे मोठ्या प्रमाणावर वाढत गेले तसे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण ही वाढत गेले. याच भटक्या कुत्र्यांमुळे भक्ष्य मिळू लागले आणि परिणामी बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.