आंदोलनाचे 'ठाणे' - ठाण्यात सरकारी,निमसरकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचारीही संपात सहभागी

आरोग्य सेवेसह शासकिय कामकाजावर परिणाम

    14-Mar-2023
Total Views |
 
Thane agitation
 
ठाणे: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सर्वच समाज घटकांच्या नव्या सरकारकडुन अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने जुनी पेन्शन तसेच विविध मागण्यासाठी मंगळवारी ठाण्यात एक-दोन नव्हे तर तब्बल चार आंदोलने पार पडली. या आंदोलनामध्ये सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यामुळे आरोग्य सेवेसह शासकिय कामकाजावर परिणाम झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना याची झळ पोहचल्याचे दिसुन आले. आंदोलक कर्मचारी बेमुदत संपावर ठाम होते.
 
जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील लाखो शासकिय कर्मचारी आजपासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. या संपाचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटत आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील हजारो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून 'आमचा आता एकच नारा ... जुनी पेन्शन लागु करा ' असे फलक झळकवुन घोषणाबाजी केली. तर ठाणे जिल्हा (सिव्हिल) रुग्णालय आवारातही जुनी पेन्शन लागु करण्याच्या मागणीसाठी नर्स, वॉर्डबॉय आदी रुग्णालय कर्मचाऱ्यानी निदर्शने आणि घोषणाबाजी केली. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही,तर बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला. कर्मचारी आंदोलनात उतरल्याने रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला. अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सिव्हील रुग्णालयात तिष्ठत थांबावे लागल्याचे चित्र दिसुन आले.
 

Thane agitation 
 
ठाणे महापालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्नाबाबत म्युनिसिपल लेबर युनियनच्या नेतृत्वाखाली शेकडो कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी भर दुपारी ठामपा मुख्यालयासमोर निदर्शने करीत मनपा आयुक्ताना निवेदन दिले. जुनी पेन्शन योजनेसह ७ व्या वेतन आयोगावर आधारीत वेतनश्रेणी व भत्यांबाबतचा करार लेबर युनियनसोबत करून थकबाकी जून मध्ये अदा करावी. कंत्राटी कामगारांना समान वेतन लागु करावे. आदी मागण्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी निवेदनात केल्या आहेत.
 
इमु कर्जबाधित शेतकऱ्यांचे उपोषण
 
ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण व धरणे आंदोलन छेडले. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी १५ वर्षापूर्वी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकारी संस्था यांच्या भडक जाहिरातींना भुलून शेतीपूरक असा इमू पालन व्यवसाय कर्ज काढुन सुरु केला. तेव्हा, शेतकऱ्यांची आर्थिक भरभराटी होईल. अशी प्रलोभने दाखवण्यात आली. मात्र, हा व्यवसाय तोट्यात गेल्याने इमु शेतकरी कर्जबाजारी झाले. याचा निषेध नोंदवत मंगळवारी शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले.तसेच, शासन व बँक स्तरावर कर्जमाफी न मिळाल्यास भविष्यात आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.