गोव्याच्या जंगलातील वणव्यांवर ‘तिसरा डोळा’

नियंत्रण कक्ष स्थापन : अतिदक्षता विभाग २४ तास कार्यरत

    13-Mar-2023
Total Views |
Forest fires in Goa

पणजी
: गोव्यातील जंगल क्षेत्रात गेल्या आठवड्याभरात वणव्याच्या अनेक लहानमोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून, गोव्यातील जंगलांवर लक्ष ठेवणे आणि वणव्यांवर नियंत्रणासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.गोवा परिसरात रविवार, दि. ५ मार्चपासून आठवड्याभरात जंगले, खासगी क्षेत्रे, सार्वजनिक जमिनी, बागा, महसुली जमीन इत्यादींसह विविध भागांत अनेक ठिकाणी वनवे लागल्याचे आढळले आहे.

वणव्यांच्या या स्थानिक घटनांकडे सर्वोच्च प्राधान्याने लक्ष देण्यासाठी आणि त्यांची ठिकाणे सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.त्यानुसार सर्व संबंधित अधिकार्‍यांना अतिदक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला जात आहे. जंगलातील वणव्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी वनविभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यात आगीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. आगीच्या घटनास्थळी ताबडतोब उपस्थित राहण्यासाठी अचूक भौगोलिक निर्देशांक आणि वणव्यांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांकानुसार रिअल टाईम नकाशे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना सामायिक केले जात आहेत. आगीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ७५० जणांचे पथक कार्यरत आहे.
 
वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेशांवर बंदी, प्रवेश रोखण्यासाठी वन आणि वन्यजीव कायद्यांची कडक अंमलबजावणी : वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेश तपासण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी, वन कायद्यांची सुनिश्चित आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपवन संरक्षकांना विशिष्ट निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, अलीकडेच लागलेल्या प्रत्येक ठिकाणच्या वणव्यांची कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक वणव्यांच्या घटनांची तपशीलवार चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.जंगलातल्या वनवे प्रतिबंधक उपाययोजना गतिमान करण्यात आल्या असून, वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्षेत्र अधिकारी आणि त्यांची पथके अविरत प्रयत्न करत आहेत. जंगलातील पानगळ साफ केली जात आहे.
 
वणव्यांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी हवाई दल आणि नौदलाचे दोन हेलिकॉप्टर राज्यभरात किती प्रमाणात वनवे लागले आहेत ते शोधण्यासाठी वनक्षेत्राचे नियमित हवाई निरीक्षण करत आहेत. सक्रिय वनव्यांचे क्षेत्र मोजण्यासाठी ड्रोनचादेखील वापर केला जात आहे. जिथे पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम भागातली आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल हेलिबकेटचा वापर केला जात आहे. गेल्या आठवडाभरात ४८ वनव्यांची ठिकाणे शोधून काढण्यात आली असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे वणव्याच्या घटनांवर नियंत्रण प्रस्थापित झाले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.