मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत असलेले खडसे आता कुठे आहेत?

गिरीश महाजनांचा घणाघात

    12-Mar-2023
Total Views |
Girish Mahajan's criticism of Khadse

मुंबई : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार घणाघात केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “माझ्यामुळेच जिल्हा आणि सहकार आहे, असा खडसेंचा गैरसमज होता. बँकेत, दूध संघात, विधानसभेत आणि जिल्ह्यातही मीच हा खडसेंचा अहंमपणा जास्त होता. तो आता उतरला आहे. माणूस जास्त हवेत उडायला लागला, तर किती खाली जोरात आपटतो, यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही”, असेही महाजन म्हणाले.

महाजन पुढे म्हणाले, “भाजपात असताना खडसे म्हणायचे सर्व माझ्यामुळे आहे. पक्षातून बाहेर पडल्यानंतर स्वत:चा मतदारसंघ खडसेंना टिकवता आला नाही. तिथे ते निवडून येऊ शकत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, आता कुठे येऊन पडलेत, असा टोलाही गिरीष महाजनांनी लगावला आहे.
 
दूधसंघाच्या निवडणुकीत खडसेंच्या पॅनेलचं कोणीच निवडून आलं नाही. मागील वर्षी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकला होता. तेव्हा खडसेंनी आमच्यावर टीका-टीप्पणी करत, मीच कसा बाहुबली आहे, हे दाखवलं होतं. आता वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेनं ( शिंदे गट ) त्यांना जागा दाखवली, असा घणाघात गिरीश महाजनांनी खडसेंवर केला आहे. राष्ट्रवादीतील गटबाजीचा फटका बसल्याने हा पराभव खडसेंच्या जिव्हारी लागला असून त्यावर महाजन यांनी घणाघात केला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.