मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेली कामगिरी ही थक्क करणारी आहे. राजकीय पंडितांचे अंदाज चुकीचे ठरवत, भाजप येथे सत्तेवर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘मोदी की गॅरेंटी’वर त्यांनी विश्वास ठेवला आणि काँग्रेसप्रणित संधीसाधू ‘इंडिया’ आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले, असेच हे निकाल ठळकपणे सांगतात.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या तसेच लोकसभेची उपांत्य फेरी असे ज्या निवडणुकांकडे पाहिले जात होते, त्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. राजकीय विश्लेषकांसह मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खोटे ठरवत, या तीन राज्यांतील जनतेने भाजपला भरघोस मतांनी विजयी केले आहे. ‘भारत विरुद्ध इंडिया’ असा हा लढा होता. यात भारत निर्विवादपणे विजयी झाला आहे. सनातविरोधातील ‘इंडिया’ आघाडीला मतदारांनी स्पष्टपणे अव्हेरले आहे. सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्या संधीसाधू ‘इंडिया’ आघाडीला ही सणसणीत चपराक आहे. ‘मोदी की ग्यारंटी’ विश्वासार्ह आहे, हेच निकालांनी दाखवून दिले. विकासाच्या झंझावातासमोर भ्रष्टाचार विजयी होऊ शकत नाही, पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात केलेली शेरेबाजीही देशातील जनता आवडत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. देशाच्या ‘अमृत काळा’साठी २५ वर्षांनंतर ‘विकसित’ भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान मोदी यांच्या विकासनीतीला दिलेला हा कौल आहे. काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीने केलेले जातीपातीचे राजकारणही मतदारांना रूचले नाही. म्हणूनच महिला, गरीब, युवा आणि किसान यांच्यासाठी काम करणार्या भाजपला त्यांनी निवडून दिले.
हा विजय फक्त आणि फक्त मोदी यांचाच! मोदी यांच्या प्रचाराच्या झंझावातात काँग्रेस पूर्णपणे निष्प्रभ ठरली. मध्य प्रदेशात सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणारी, राजस्थानात सलग दुसर्यांदा विजयी होऊ अशी दर्पोक्ती ठरणारी काँग्रेस म्हणून सपशेल पराभूत झाली. पंतप्रधान मोदी यांनी ही राज्ये ढवळून काढली. काँग्रेसी भ्रष्टाचारावर कठोर शब्दांत प्रहार केला. अमित शाह यांच्या रणनीतीची त्याला मिळालेली जोड सुवर्णाक्षरांत भाजपची यशोगाथा लिहिणारी ठरली. काँग्रेसी कूशासन, सोयीनुसार केलेले हिंदुत्वाचे राजकारण, जातीपातीत समाज विभागण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न, महिलांचा सन्मान राखण्यात आलेले अपयश पराभूत करणारे ठरले.
मध्य प्रदेश येथे प्रस्थापितांच्या बाजूने मतदारांनी मतदान करत, भाजपला पूर्ण बहुमत दिले. २००३ पासून येथे भाजप सलगपणे सत्तेत आहे. गुजरात पाठोपाठ अशी कामगिरी करणारे, हे दुसरे राज्य! म्हणूनच आता मध्य प्रदेशलाही भाजपचा गड म्हणून संबोधले जाईल. येथे बदल घडवून आणला जाईल, असे चाचण्यांनी ठळकपणे सांगितले. मात्र, महिलांना सन्मान देणार्या मध्य प्रदेशातील सुशासनाला स्पष्ट जनादेश मिळाला. मध्य प्रदेशमध्ये भाजप कार्यकाळात महिलांचा उचित सन्मान केला गेला. ‘लाडली बेटी’, ‘लाडली लक्ष्मी’, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण, ‘कन्या विवाह’, ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ या योजनांची केलेली प्रभावी अंमलबजावणी महिलांचे आयुष्य बदलणारी ठरली. म्हणूनच तेथे काँग्रेसची अक्षरशः वाताहत झाली.
राजस्थानात एक आड, एक संधी देण्याची परंपरा यंदाही कायम राहिली असली, तरी राजस्थानात काँग्रेसी सरकारविरोधात प्रचंड नाराजी होती. ती मतपेटीतून व्यक्त झाली, असे निश्चितपणे म्हणता येते. तेथील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत होती, गेहलोत सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. तशातच प्रश्नपत्रिका फुटल्या. २२ लाख युवा मतदार पहिल्यांदाच तेथे मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यांनी भाजपला मतदान करणारा निर्णय निर्णायक ठरला, असे निश्चितपणे म्हणता येते. भ्रष्टाचारी काँग्रेसला मतदारांनी राजस्थानात नाकारले.
छत्तीसगढ येथे भाजपने अनपेक्षितपणे विजय नोंदवला आहे. निवडणूकपूर्व तसेच मतदानोत्तर चाचणीत तेथे काँग्रेसच विजयी होईल, असे दावे केले जात होते. मात्र, छत्तीसगढमधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. तेथे हजारो कोटींचे गैरव्यवहार घडत होते. ‘महादेव’ अॅप घोटाळा उघडकीला आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. छत्तीसगढ येथे नक्षलवाद प्रमुख समस्या आहे. अलीकडच्या काही वर्षांत केंद्र सरकारने तो संपुष्टात यावा, यासाठी तेथे केलेले विशेष प्रयत्न भाजपला मतदान करणारे ठरले. तेलंगणमध्ये भाजपने मिळवलेल्या जागा लोकसभेत भाजपचा जनाधार वाढवणार्या ठरतील.
देशातील तीन प्रमुख राज्यांनी दिलेला हा जनादेश असाच कायम राहिला, तर पाच महिन्यांनंतर होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजप ३२५ पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पश्चिम बंगाल तसेच बिहार या दोन राज्यांतही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होईल, असे निश्चितपणे म्हणता येईल. महाराष्ट्रात भाजपने ‘मिशन ४५’ ठेवले आहे. ते यशस्वी होईल, असे आजचे निकाल पाहता म्हणता येते. हेच कल लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहतील. किंबहुना, भाजपच्या बाजूने जनादेश झुकेल, असाही दावा केला जात आहे. तसे झाले तर किमान भाजप ३५० जागा स्वबळावर जिंकेल आणि सलग तिसर्यांदा केंद्रात सत्तेवर येईल.
भाजपला पराभूत करण्याच्या हेतूने विरोधकांची ‘इंडिया’ या नावाने जी मोट बांधण्यात आली आहे, तिला मात्र चिंतेत टाकणारा हा निकाल. देशहितापेक्षा घराणेशाही आणि आपापले सुभे सुरक्षित ठेवण्यासाठी विरोधक एकत्र आले खरे; पण त्यांच्यापाशी ‘अजेंडा’च नाही. पंतप्रधानपदासाठी आश्वासक चेहरा नाही. भाजपद्वेष आणि मोदीविरोध हाच ज्यांचा ‘अजेंडा’ आहे, त्या ‘इंडिया’ आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. म्हणूनच लगेचच त्यांनी चिंतन करण्यासाठी ६ तारखेला बैठक बोलावली आहे. चिंतन करण्यासाठी का चिंता करण्यासाठी हा वेगळा विषय.
गेल्या दहा वर्षांत भाजपचे सरकार केंद्रात आहे. भाजप सरकारने राबवलेल्या विकास योजना, विकासकार्य मतदारांना भावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवली गेली आहे. भारताच्या विकास गाथेवर जागतिक मोहर उमटली आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे लोकार्पण जानेवारी महिन्यात २२ तारखेला होत आहे. भाजपने श्रीरामाच्या जन्मस्थळी मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला होता, तो सत्तेवर येताच प्रत्यक्षात आणला आहे. ‘मोदी की गॅरेंटी’ ती हीच. त्यावरच मतदारांनी विश्वास ठेवला, असे आज निश्चितपणे म्हणता येते.