मुंबई (विशेष प्रतिनिधी): अमरावती शहराच्या जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरात सापळा रचुन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांडूळाची अवैध विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी अमरावती वनविभागाने ही कारवाई केली असुन पुढील तपास सुरू आहे.
एमआयडीसी परिसरातील (जुना बायपास रोड) अंबिका मार्बलजवळ अमरावती वनविभागाचे अधिकारी बनावट ग्राहक बनुन आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. अंबिका मार्बलजवळ सापळा रचत या आरोपींना त्याठिकाणी बोलवुन पोलिसांनी पकडले. अंकुश पवार, मंगल बेले आणि प्रविण लडके अशी या तीन संशयित आरोपींची नावे असून मांडूळ प्रजातीच्या सापाबरोबरच त्यांच्याकडे इतर जीवंत वन्यजीव सापडण्याची शक्यता शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये वनविभागाचे अमरावतीचे विभागीय वनाधिकारी किरण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे, वनपाल पी.व्ही.निर्मळ, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाचे वनरक्षक अनंत नायसे, स्वप्निल राऊत तसेच वनरक्षक हेमंत पांगरे, वनरक्षक दिनेश धारपवार, वनरक्षक पी.आर.वानखडे, वनरक्षक आर.ए.जुनघरे, वाहन चालक सी.बि.मानकर व इतर वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) वडाळी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.