शाखांचा नाद आव'हाडाने' करू नये : नरेश म्हस्के

शिवसेना शाखा तोडण्यासाठी आव्हाडच आग्रही असल्याचा पुरावा व्हायरल

    17-Nov-2023
Total Views |
Naresh Mhaske on Jitendra Avhad

ठाणे : ठाण्यात शिवसेनेच्या शाखांचा पुळका आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर शिवसेनेच्या (शिंदे गट) नरेश म्हस्के यांनी शरसंधान केले आहे. घे जित्या, तुला पाहिजे होता ना रे पुरावा ! आमच्या शाखांचा नाद सोड, तो 'आव'... हाडाने नाही, शिवसैनिकांनीच करावा ! अशी टिप्पण्णी म्हस्के यांनी एक्स वर करून त्यासंदर्भातील व्हीडिओही व्हायरल केले आहेत.

मुंब्र्याची शाखा तोडल्यानंतर गेले काही दिवस मुंबई - ठाण्यातील राजकारण ढवळुन निघाले आहे. मुंब्यातील ती शाखा शिवसैनिकांनी सामाजिक काम करण्यासाठी ताब्यात घेतली.ती शाखा वाचवण्याच्या नावाने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुंब्र्यात ७ ते ८ आमदार घेऊन आले होते. आव्हाड यांना अपेक्षित होते की, मुंब्र्यातील वातावरण बिघडवायचे यासाठी एक प्रकारे ते खतपाणी घालत होते. त्यादिवशी जाहीर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर आव्हाड यांनी तोंड खुपसुन 'नासक्याने एक तरी पुरावा द्यावा " असे भाष्य केल्याने म्हस्के यांनी व्हीडीओ व्हायरल करून प्रत्युत्तर दिले.


याच जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या कळवा मुंब्र्यातील अनेक शाखा स्वतः उभे राहून तोडल्या, कित्येक शिवसैनिकांची घर उध्वस्त केली. मुंब्रा कळवा येथील शिवसैनिकांचा रोजगार संपवला. त्याच आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचायला येतात का ?

कळवा येथील शाखा, जिचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. ती शाखा तत्कालीन मनपा आयुक्तांना सांगून त्यांनी तोडली. ती शाखा पुन्हा बांधत होतो ती शाखा अनधिकृत म्हणून थांबवा. नाहीतर मी उपोषण करेन, रस्त्यावर उतरेन. असा इशारा देत आव्हाडांनी आंदोलन उभारले होते. त्या कळवा शाखेचा पुरावा आज बाळासाहेबांच्या स्मृती दिनी ट्विटच्या माध्यमातून देत, तुमच्यात जर हिम्मत असेल तर "तो मी नव्हेच" असे म्हणून दाखवा.असे आव्हान म्हस्के यांनी आव्हाड यांना दिले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.