नवी दिल्ली : ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये, पाकिस्तानी संघ ९ पैकी ५ सामने गमावून लीग फेजमधूव बाहेर पडला होता, त्यानंतर त्याला त्याच्या मायदेशी बेरंग परतावे लागले होते. यानंतर बाबर आझम यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तर पीसीबीने (पाकिस्तानी क्रिकेट संघ) आता वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर शान मसूदकडे कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. शाहीन आफ्रिदी हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज आहे. मात्र, चांगली आकडेवारी असूनही हा विश्वचषक त्याच्यासाठी चांगला गेला नाही. त्याने २७ कसोटी सामन्यात १०५ बळी घेतले आहेत, तर ५३ एकदिवसीय सामन्यात १०४ बळी घेतले आहेत. टी-२० इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर त्याने ५२ मॅचमध्ये ६४ विकेट घेतल्या आहेत.
२०१८ च्या महिन्यात त्याने एप्रिलमध्ये T२०I, सप्टेंबरमध्ये ODI आणि डिसेंबरमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो सतत संघासोबत आहे. शान मसूदबद्दल बोलायचे तर तो पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज आहे ज्याने ३० कसोटी सामन्यांमध्ये १५९७ धावा केल्या आहेत. तो २०१३ पासून पाकिस्तानी संघाकडून खेळत असून त्याचे वय ३४ वर्षे आहे. शान मसूदचे वडील पीसीबीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य आहेत. तो बराच काळ पाकिस्तानी संघाबाहेरही होता.
राजीनामा देताना बाबर आझम यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, “पांढऱ्या चेंडू क्रिकेटमध्ये (ODI-T२०) पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचे कारण म्हणजे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांची एकत्रित मेहनत होती. पण, या प्रवासात मला सतत साथ देणाऱ्या पाकिस्तानच्या उत्कट क्रिकेट चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो. आज मी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा एक कठीण निर्णय आहे, परंतु मला वाटते की ही योग्य वेळ आहे.