काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, संपली की बँकॉकला; देवेंद्र फडणवीस यांची टीका

    15-Nov-2023
Total Views |
devendra fadanvis
 
 
पांढुर्णा (मध्य प्रदेश) : निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली.
 
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि पांढुर्णा येथे सभा घेतल्या. सौंसर आणि पांढुर्णा या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे नानाभाऊ मोहोड आणि प्रकाशभाऊ उईके यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज सभा घेतल्या. मध्यप्रदेशचा हा तिसरा प्रचार दौरा होता, यापूर्वी त्यांनी १८ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबर रोजी प्रचारात भाग घेतला होता. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, माजी मंत्री परिणय फुके, आ. प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.
 
फडणवीस म्हणाले, ही तीच मंडळी आहेत, जे सनातनला डेंग्यू, मलेरिया म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात तोडणारे हेच कमलनाथ आहेत. कमलनाथ हे देशाच्या बाजूने आहेत की औरंगजेबाच्या बाजूने हा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांचा पुतळा पाडणारे कधीच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्याचठिकाणी शिवरायांचा पुतळा उभा केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
पंतप्रधान मोदी शेवटच्या घटकाचा विचार करणारे
 
आज जनजाती गौरव दिवसानिमित्त पंतप्रधानांनी २४ हजार कोटींची पीएम जनमन योजना प्रारंभ केली आहे. यापूर्वी ११ हजार कोटींची विश्वकर्मा योजना प्रारंभ केली. शेवटच्या घटकाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच आजवरचा सर्वांत मोठा गरिब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबविला. मोदीजी शेतकरी सन्मान निधीची मदत देतात. पण, जेथे भाजपाची सरकारे नाहीत, तेथील राज्य सरकारे मोदीजींच्या योजनांची अंमलबजावणी होऊ देत नाही. त्यामुळे देशाच्या विकासात मध्यप्रदेश कुठे असेल, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. पांढुर्णा हा नवीन जिल्हा झाल्याने आता पांढुर्ण्याचे अनुदान पांढुर्ण्याला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.