१२ नोव्हेंबरपासून बोगद्यात अडकलेत ४० मजूर, मदतीसाठी सैन्यही धावले... पाईपद्वारे बचावकार्याचा प्रयत्न

    15-Nov-2023
Total Views |

Uttarkashi


देहरादून :
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अद्याप बचावकार्य सुरुच आहे. यामध्ये आता लष्कर आणि हवाई दलाचे पथकही सहभागी झाले आहेत. पाईपद्वारे बचावकार्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
 
१२ नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४० कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. बोगद्याच्या आतमध्ये ड्रिलिंगचे काम सुरू असून ढिगाऱ्याच्या आत स्टीलचे पाईप टाकले जात आहेत.
 
ढिगाऱ्याच्या आत ३ फूट रुंद पाईप टाकून त्यातून कामगार बाहेर येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असून त्यांच्याशी सतत संपर्क सुरु आहे. परंतू, काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
 
यासोबतच एका पाईपद्वारे कामगारांना अन्न आणि पाणी पुरवले जात असून याच पाईपच्या मदतीने त्यांना ऑक्सीजनचाही पुरवठा केला जात आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलिसांसह इतर पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. तसेच लवकरच बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षितपणे बाहेर पडणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडकलेल्या कामगारांमध्ये झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिसा, बिहार, उत्तराखंड आणि आसामधील कामगारांचा समावेश आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.