ठाणे : नागरीकरण वाढत असल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. ठाणे शहरात वाढत्या कचऱ्याची समस्या गहन बनली असून वारंवार जनजागृती करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिका प्रशासन मेटाकुटीला आले आहे. आता तर दिवाळी सणानिमित्त नागरीकांनी केलेल्या घर सफाईमुळे तसेच, फटाके व तत्सम सणोपयोगी भंगार व टाकाऊ वस्तुंची भर कचऱ्यात पडली असुन हे प्रमाण आधीच्या दैनंदिन कचऱ्याच्या ३० टक्के अधिक असल्याचे ठाणे महापालिका घनकचरा विभागाने सांगितले.दरम्यान, कचरा वाढल्याने साफसफाई यंत्रणेवर ताण वाढला असुन ठेकेदारही या अधिकच्या कचरा निर्मुलनासाठी जास्त मेहनताना देण्याची मागणी करीत आहेत.
दिवाळी सणामुळे ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. दिवाळीसाठी अनेकांच्या घरी रंगरंगोटी तसेच जुने फर्निचर व अन्य साहित्य भंगारात अथवा कचऱ्यात टाकले जाते. त्यामुळे कचरा वाढत आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज अंदाजे ९६० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. दिवाळीत यात भर पडली असुन ३० टक्के कचरा वाढला असल्याचे घनकचरा विभागाचे म्हणणे आहे. कचरा वाढला असला तरी कचरा उचलण्याची यंत्रणा तसेच घंटागाड्याची संख्या मर्यादीतच असल्याने सफाई कामगारांवरील ताण वाढला आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेकडे स्वत:चे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने डायघर प्रकल्प तसेच अन्य ठिकाणी कचरा टाकला जातो.या डंम्पींग ग्राऊंडलाही स्थानिकांचा विरोध होत असतानाही पालिकेकडून या भागात दररोज शेकडो टन कचरा टाकला जातो.तेव्हा, कचरा निर्मूलनाचा प्रश्न भीषण बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.