‘महादेव अॅप’ घोटाळ्यात दिल्ली दरबाराची हिस्सेदारी?; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात

    13-Nov-2023
Total Views |
PM Narendra Modi on INC

नवी दिल्ली :
‘महादेव अॅप’ घोटाळ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या दिल्ली दरबाराची हिस्सेदारी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सांगावी, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढमधील मुंगेली येथील जाहिर सभेत केला आहे.

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंगेली येथे भाजपच्या विजय संकल्प रॅलीस संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘महादेव अॅप’ घोटाळ्यावरून काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, महादेव बेटिंग अॅप घोटाळा ५०८ कोटी रुपयांचा असून तपास यंत्रणांनी या प्रकरणात मोठी रोकड जप्त केली आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा जवळचा सहकारीही तुरुंगात आहे. यात मुख्यमंत्र्यांना किती पैसे मिळाले हे काँग्रेसने उघड करावे, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या दिल्ली दरबारात किती पैसे पोहोचले याचाही हिशेब मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी द्यावा; असा टोला पंतप्रधानांनी लगाविला आहे.

काँग्रेस सरकारच्या कुशासनाचा अंत निकट आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, येणारी देव दिवाळी छत्तीसगढसाठी नवा आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे. छत्तीसगढला लुटणारी काँग्रेस देव दिवाळीत कोठेही दिसणार नाही, याचा चंग मतदारांनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाद्वारे जनतेचा कौल स्पष्ट झाला असून आता लवकरच छत्तीसगढला लुटून आपली तिजोरी भरणाऱ्या काँग्रेसला जनता सत्तेतून पायउतार करणार आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.