माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात याचे अतिशय सुंदर साहित्यिक वर्णन केले आहे. ते प्रत्येक साधकाने अवश्य वाचावे, इतके सुंदरतेने ओथंबलेले दिव्य काव्य आहे. आता कुंडलिनी जागृत होते म्हणजे नेमके काय होते, त्याचा अंतर्बाह्य परिणाम व शारीरिक उलाढाली काय होतात, याचे ज्ञान-विज्ञान सविस्तर पाहू.
आजच्या आध्यात्मिक जगतात कुंडलिनी हा विषय फार बोलला जातो आणि कुंडलिनी जागृत करण्याची बरीच दुकानेदेखील सुरू झाली आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, स्वत:ला बुद्धिवादी समजणारे लोकही अशांच्या मागे लागतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपली कुंडलिनी जागृत झाली, असे मनोमन मानतात. भारतात या विषयावर बुवाबाजी सुरू झाली आहे, तर पाश्चिमात्य जगतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. बर्याच पाश्चिमात्य लेखकांनी या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत, पण कोणालाच या विषयाचा ज्ञानमूलक अनुभव नसल्याने पुस्तकात उपयोगात आणलेल्या शोभिवंत व जबरदस्त शब्द प्रयोगाखेरीज त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
कुंडलिनी हा विषय प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. कल्पना अथवा भंपकपणा करण्याचा नाही. केवळ कल्पनांनी हा विषय जाणू म्हटल्यास संत तुकारामांच्या भाषेत बोलायचे झाल्यास ‘बोलाचाच भात, बोलाचिच कढी। जेवुनिया तृप्त कोण झाला।’ अशी परिस्थिती आहे. हा विषय समजण्यास कमीत कमी वैज्ञानिक ज्ञान आणि त्याला धरून प्रखर बुद्धिमत्ता तरी हवी. वरीलपैकी काहीच नसल्यास कोणाचा तरी हात डोक्यावर ठेवून अथवा काल्पनिक स्पंदनांचा व्यापार करून कुंडलिनी विषय समजायचा नाही आणि अनुभव तर त्याहून येणार नाहीत. काही लोकांची याबाबतीत मोठी विचित्र अवस्था झाली आहे. एकतर या विषयाचा खरेखोटेपणा जाणण्यास प्रत्यक्ष साधना करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे कुंडलिनी जागृत करण्याचा जे दावा करतात, त्यांच्या मागे लागून त्यांचा खोटेपणा जगासमोर आणण्यात ते अपयशी ठरले आहेत. परिणामी, डोक्यावर हात ठेवून कुंडलिनी जागृत करण्यार्यांचे उखळ पांढरे होऊन त्यांच्या खोट्या प्रचाराला मुळीच आळा बसत नाही.
कुंडलिनी जागृत न झाली तरी चालेल, पण कुंडलिनी जागृत करण्याचा जो भंपक प्रचार चालू आहे, तो समाजस्वास्थ्याकरिता घातक आहे. विशेषत: असल्या भूलथापांना बळी पडून आधीच दुर्बल असलेला हिंदू समाज अधिक दुर्बल होत आहे. समाजाची होत असलेली प्रतारणा आता थांबली पाहिजे. त्याकरिता बुद्धिवादी तरुणांनी आता समोर येऊन ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ असा पराक्रम दाखविणे आवश्यक आहे.आणखी एक चुकीची कल्पना मूळ धरून राहिली आहे आणि ती अशी की, कुंडलिनी जागृत झाली की, अध्यात्मातील सर्व सिद्धी व उच्च अवस्था प्राप्त झाल्या असे समजावे. ही एक फार मोठी चूक आहे. कुंडलिनी जागृती म्हणजे पलीकडील दिव्य जगताचे महाद्वार होय. कुंडलिनी जागृती झाल्यावरच या भव्यदिव्य विश्वाचा अनुभव घेण्याची क्षमता साधकात येऊ शकते. कुंडलिनी जागृती अध्यात्मातील सर्वोच्च अवस्था नसून मध्य अवस्था आहे.
कुंडलिनी जागृत झालेल्या साधकाचे पूर्वीचे सर्व दुर्गुण जाऊन तो एका दिव्य शक्तीने भारित होत असतो. कुंडलिनी जागृती म्हणजे उच्च संस्कार धारण केल्यामुळे आपल्या शरीरातील पेशीपेशीत जी जुनी गुणाणुरचना आहे ती पार बदलून त्या स्थानी उन्नत अशा जीवनाला धारण करू शकेल, अशी उच्च धारणायुक्त गुणाणुरचना तयार होत असते. ती तशी होताना साधकाला फार त्रास होतो. कुंडलिनी जागृत होताना प्रथम साधकाच्या अंगाचा विलक्षण दाह होतो. विद्युत झटका बसावा, तसा जीव सतत घाबरत असतो. कशात रूची राहत नाही. कशातच लक्ष लागत नाही. खाणेपिणे शक्य नसते. अन्न, पाणी व झोप अतिशय कमी होते. श्वास वारंवार निरुद्ध व्हायला पाहतो. शरीर कृश होऊन शक्तीच नसल्यासारखी वाटते. अंगावर कोंडा जमतो. प्राण बाहेर जातात, असे सारखे वाटते. ओकारी व शौचास जाण्याची वारंवार इच्छा होते, पण त्या क्रिया होत नाही.
सर्व शरीरात काही प्राण राहिला आहे, असे वाटत नाही. झोप, मूत्र, तहान, इच्छा, आकांक्षा सर्व नष्ट झालेल्या वाटतात. कधी कधी अर्धे अंग खूप गरम, तर अर्धे अंग खूप थंड वाटते. परंतु, उष्णतामापक यंत्रात तसे काहीच दिसत नाही. पेशीपेशींमधील गुणरचना अथवा कुंडलरचना बदलून सर्वांगसाधनेला उपयुक्त अशी नवीन उत्तम गुणरचना आतूनच होत असते. सर्वांग समुद्रमंथनाप्रमाणे मंथून निघते. कुंडलगुणरचना हळूहळू स्थिर झाल्यावर साधकाचा जीव भांड्यात पडतो. कृश झालेले शरीर पुन्हा पुष्ट नव्हे, प्रमाणबद्ध बनते. आपल्या जीवात्म्याला त्याच्या जन्मतः प्राप्त शरीरातील गुणाणुरचना अभ्यस्त झाल्यामुळे नवीन बदलणार्या गुणाणुरचनेला जीवात्मा अभ्यस्त नसल्यामुळे जीवाला अतिशय त्रास होतो. याचे कारण म्हणजे पूर्वीचे गुणाणू आपली पूर्वरचना सोडून नवीन रचनेत यायला पाहतात. त्यामुळे ही सर्व लक्षणे उत्पन्न होतात.
शरीरातील प्रत्येक पेशीपेशीमधील गुणाणूंची पुनर्रचना झाल्यावर मग वरील सर्व भयानक अनुभव क्रमागत बंद होतात. शरीर तेजःपुंज व प्रमाणबद्ध होते. शरीरातील कृशता व लठ्ठपणा नाहीसा होऊन शरीर आदर्श व प्रमाणबद्ध बनते. योगी अथवा भक्त कधीच लठ्ठ नसतो. कारण, अनेक इच्छा-आकांक्षांप्रमाणे त्याच्या शरीरात अतिरिक्त अवस्थासुद्धा नसतात. लठ्ठपणा, शरीराची कृत्रिम अवस्था होय. ती नाहीशी होऊन शरीर प्रमाणबद्ध होते. कुंडलिनी जागृत साधकाची क्षमता व बुद्धी विलक्षण वाढून तो जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अतिउच्च होतो. तो सर्वांगसुंदर व सर्वगुणसंपन्न होतो.\मन अतिशय शांत आणि बलवान होते. बुद्धी कुशाग्र झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात असा कुंडलिनी जागृत झालेला साधक इतरांपेक्षा लवकर प्रवीण होतो.
तो उच्च योगी असल्यामुळे उच्च कवी, वक्ता, लेखक, गायक, चित्रकार, तत्त्वज्ञानी, मल्ल, मुत्सद्दी, संशोधक, समाजसुधारक, प्रेमी आणि भविष्य जाणणारा होतो. त्याचे सर्वांग तेज:पुंज व प्रमाणबद्ध झाल्याने तो अतिशय सुंदर दिसतो. तो सद्गुणी व उत्क्रांतीकरिता सुयोग्य होतो. धर्मपंथ, संप्रदाय व सर्व वृत्तींच्या वर जातो. जीवन भव्यदिव्य बनते. वेदव्यासांनी भगवान श्रीकृष्णांचे जीवन असेच परिपूर्ण रेखाटले आहे. ते श्रेष्ठ योगी, बासरी वादक, तत्त्वज्ञानी, मित्र, समदु:खी, प्रेमी, मल्ल, राजकारणी, समाजसेवक, मुत्सद्दी, समाजसुधारक होते. शरीरशुद्धी, ध्यानधारणा, चिंतन, स्वभाववृत्ती संयमाने कुंडलिनी योग्य प्रकारे जागृती होते. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची वा मसिहाची आवश्यकता राहत नाही. पुढील दिव्य अनुभवांसाठी तो आता सिद्ध होतो.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)