अमृतपालसिंग : खलिस्तानवाद्यांचा नवा चेहरा!

    21-Nov-2022   
Total Views |
singh


भिंद्रनवाले यांची जागा घेऊ पाहण्याचा प्रयत्न अमृतपालसिंग याचा चालला आहे. दोघांमध्ये असलेल्या साधर्म्याचा फायदा अमृतपालसिंगकडून उठविला जात आहे. हातात तलवार, गडद निळ्या रंगाचा फेटा असा वेष करून भिंद्रनवाले आणि आपल्यात असलेले साम्य दाखविण्याचा प्रयत्न अमृतपालसिंग यांच्याकडून केला जात आहे.


पंजाबमध्ये खलिस्तानवादी तत्वे पुन्हा डोके वर काढू लागल्याचा प्रत्यय अधूनमधून येऊ लागला आहे. 1984 मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’नंतर आणि खलिस्तानी दहशतवाद्यांचा म्होरक्या भिंद्रनवाले याचा नायनाट झाल्यानंतर तेथील दहशतवाद संपुष्टात येईल, असे वाटले होते. पण, या दहशतवादाचा पुरता बीमोड झाला असल्याचे दिसून येत नाही. खलिस्तानवाद्यांना पाकिस्तान खतपाणी घालत आहे, हे तर अगदी उघड आहे. या अतिरेक्यांना सर्वतोपरी मदत करून पंजाबमध्ये असंतोष कसा माजविता येईल, असा त्या देशाचा प्रयत्न आहे. तसेच, भारताबाहेर अन्य देशात असलेले खलिस्तानवादी सर्व प्रकारची मदत करण्यास तत्पर असतातच. मध्यंतरी इंग्लंडमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लीम संघर्षामध्ये काही खलिस्तानवादी तत्वे मुस्लीम दंगेखोरांच्या बाजूंनी असल्याचेही दिसून आले होते. या घटना घडत असतानाच पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांचा एक नवा चेहरा जनतेपुढे आला आहे.

काही दिवसांपूर्वी अमृतसरच्या मजिठिया मार्गावर असलेल्या गोपाळ मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी या शिवसेना (टाकसाली) नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संदीपसिंग नावाच्या व्यक्तीने आपल्याकडील परवाना असलेल्या पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून सुरी यांची हत्या केली होती. पोलिसांनी वैमनस्यातून ही हत्या झाली, असे सकृतदर्शनी म्हटले असले तरी जनतेला ते मान्य नाही. पंजाबमधील फुटीरतावादी तत्वांच्या प्रभावाखाली येऊन संदीपसिंग याने ही हत्या केल्याचे चर्चा आहे. या फुटीरतावादी तत्वांचा म्होरक्या म्हणून जे नाव पुढे आले आहे ते अमृतपालसिंग याचे! अमृतपालसिंग आणि संदीपसिंग व त्याचा मुलगा यांच्या अनेक बैठक झाल्याचा एक व्हिडिओही अस्तित्वात आहे. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनी या हत्येप्रकरणीच्या ‘एफआयआर’मध्ये अमृतपालसिंग याचेही नाव समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

कोण आहे हा अमृतपालसिंग? त्याचा अचानक उदय कसा काय झाला? अमृतपालसिंग हा दुबईतून अलीकडेच पंजाबमध्ये आला. खलिस्तानवाद्यांचा कट्टर पुरस्कर्ता म्हणून तो ओळखला जातो. अभिनेता दीप सिधू याने स्थापन केलेल्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेची सूत्रे आता या अमृतपालसिंग याच्या हाती आहेत. अमृतपालसिंग याने बळजबरीने या संघटनेची सूत्रे आपल्याकडे घेतल्याचे बोलले जात आहे. अमृतपालसिंग यांच्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त अकाली दल (अमृतसर) वगळता सर्व पक्षांच्या नेत्यांनी ‘आप’च्या नेतृत्वाखालील सरकारकडे केली आहे. तसेच, अमृतपालसिंग यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने पंजाब सरकारला दिले आहेत.पंजाबमध्ये फुटीरतावादी पुन्हा डोके वर काढू लागले आहेत ते त्या राज्यात अलीकडेच झालेल्या संगरूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दल (अमृतसर) उमेदवार सिमरणजितसिंग मान हे विजयी झाले. शिरोमणी अकाली दल (अमृतसर) हा पक्ष फुटीरतावाद्यांचे समर्थन करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. गेल्या तीन दशकांमध्ये सिमरणजितसिंग मान यांच्या पक्षास पंजाबमध्ये कोणी महत्त्व देत नव्हते. पण, या विजयाने फुटीरतावादी तत्वांना बळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा तत्वांना सर्व ती मदत करण्यास पाकिस्तान टपून बसलेला आहेच. फुटीरतावादी मान यांचा विजय आणि पंजाबमधील दुबळे सरकार या संधीचा फायदा घेऊन फुटीरतावाद्यांना पाकिस्तानकडून सर्व ते साह्य दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर भिंद्रनवाले यांची जागा घेऊ पाहण्याचा प्रयत्न अमृतपालसिंग याचा चालला आहे. दोघांमध्ये असलेल्या साधर्म्याचा फायदा अमृतपालसिंगकडून उठविला जात आहे. हातात तलवार, गडद निळ्या रंगाचा फेटा असा वेष करून भिंद्रनवाले आणि आपल्यात असलेले साम्य दाखविण्याचा प्रयत्न अमृतपालसिंग यांच्याकडून केला जात आहे. पण, भिंद्रनवाले ‘दमदमी टाकसाल’ संघटनेचा प्रमुख होता. अमृतपालसिंग हा केवळ दहावी उत्तीर्ण आहे. त्याच्या कुटुंबाचा दुबईत व्यवसाय आहे. काही काळापूर्वी अमृतसरला येण्याआधी त्याने दाढीही ठेवली नव्हती, असे सांगण्यात येते. आपल्या प्रवचनांमध्ये त्यास ‘गुरुबाणी’चे दृष्टांतही देता येत नाहीत. गुरूंच्या बलिदानांचाच उल्लेख त्याच्या वक्तव्यांमधून असतो.

भारत सरकारवर कडाडून टीका करतानाच युवकांना ‘स्वातंत्र्यासाठी’ बलिदान करण्याचे आवाहनही त्याच्याकडून करण्यात येत असते. अमृतपालसिंग जी भूमिका वठवत आहे, त्यासंदर्भातील प्रशिक्षण त्याला पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने दिले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आपल्याला भिंद्रनवालेपासून प्रेरणा मिळाली असल्याचे सांगण्याची संधी हा अमृतपालसिंग सोडत नाही. शिखांनी शस्त्रधारी व्हावे आणि गुरू आणि पंथ यांच्यासाठी बलिदानास सज्ज व्हावे, असे आवाहनही त्याच्याकडून केले जात असते. अमृतपालसिंग यास मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने फुटीरतावादी विचार पसरविणार्‍या या अमृतपालसिंग याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. दुसरा भिंद्रनवाले कोणालाच परवडणार नाही!

सहा वर्षांमध्ये बाजवा कुटुंबीयांकडे अब्जावधींची संपत्ती!


पाकिस्तानचे जनरल कमर जावेद बाजवा यांची कारकिर्द संपण्यास आता अवघे काही दिवस बाकी राहिले असताना या बाजवा कुटुंबीयांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांमध्ये अब्जावधींची वाढ झाल्याची माहिती बाहेर आल्याने पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या कारकिर्दीकडेच संशयाने पाहिले जात आहे. अहमद नूरानी या नावाच्या एका पाकिस्तानी पत्रकारानेच हा सर्व गौप्यस्फोट केला आहे. जनरल बाजवा यांचे कुटुंबीय आणि अन्य जवळचे नातेवाईक यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये पाकिस्तानात आणि विदेशातही प्रचंड माया गोळा केली, अशी माहिती या पत्रकाराने उघड केली आहे. बाजवा परिवारातील घटकांनी पाकिस्तानमधील प्रमुख शहरालगत अनेक फार्म हाऊसेस विकत घेतले आहेत. तसेच, या कुटुंबातील सदस्यांनी नवीन उद्योग सुरू केले आहेत. विदेशांमध्ये स्थावर मालमत्ता विकत घेतल्या आहेत. असे सर्व व्यवहार करून या परिवाराने अब्जावधी डॉलरची संपत्ती मिळविली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

जनरल बाजवा यांची पत्नी आयेशा अमजद, सून महनूर साबीर आणि अन्य जवळच्या नातलगांनी मिळून ही माया गोळा केली आहे. पत्रकार अहमद नूरानी यांच्यानुसार, बाजवा कुटुंबीयांनी गेल्या सहा वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय सुरू केले. विदेशात मालमत्ता खरेदी केली. अनेक व्यापारी आस्थापनांची मालकी स्वतःकडेघेतली, इस्लामाबाद, कराची शहरालगत विस्तीर्ण फार्म हाऊसेस खरेदी केली, लाहोर आणि अन्यत्र स्थावर मालमत्ता खरेदी केली. गेल्या सहा वर्षांत या कुटुंबीयांनी 12.7 अब्ज रुपयांहून अधिक संपत्ती केली, असे या वृत्तात म्हटले आहे. लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 2013 मध्ये आपल्या संपत्तीचे विवरणपत्र बाजवा यांनी तीन वेळा बदलले. आयेशा अमजद यांनीही अधिक तपशील न देता आपल्या आठ मालमत्ताची माहिती घोषित केली.

बाजवा यांच्या सुनेच्या नावावर ऑक्टोबर 2018 मध्ये शून्य संपत्ती होती. पण, तिचे लग्न होण्याचा आधीच्या आठवड्यात दि. 2 नोव्हेंबर, 2018 या दिवशी तिची संपत्ती एकदम एक अब्जाहून अधिक झाली! पाकिस्तानमध्ये नवीन लष्करप्रमुख नेमण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा एक दिवस आधी जनरल बाजवा यांच्या कुटुंबीयांनी सहा वर्षांमध्ये किती प्रचंड संपत्ती जमा केली, याचा वृत्तांत बाहेर आला. पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आणि त्यांचे नातलगच एवढी प्रचंड संपत्ती गैरमार्गाने जमा करतात तर त्या देशातील राजकारणी, नोकरशहा यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, हे सांगण्याची आवश्यकताच नाही. जनरल बाजवा यांचा ‘आदर्श’ पुढे असेल, तर यापेक्षा दुसरे काहीच घडणार नाही!

‘राज्यपाल हा ‘रबर स्टॅम्प’मुळीच नाही!’


केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध वर्तन करीत असल्याचे दिसून येत आहे. केरळमधील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दूर करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतल्यानंतर संतप्त झालेल्या डाव्या आघाडी सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठाचे कुलपती असलेल्या राज्यपालांनाच कुलपतीपदावरून हटविण्यासाठी आंदोलन सुरू केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीने राजभवनासही घेरले. तसेच या आघाडीकडून राज्यपालांबद्दल अपप्रचारही केला जात आहे. लोकायुक्तांचे अधिकार कमी करण्यासंदर्भातील विधेयकाचाही त्यात समावेश आहे. या विधेयकाद्वारे मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार प्रदान होणार आहेत. पण राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करीत नाहीत, हे डाव्या आघाडीचे दुखणे आहे. याच दरम्यान, लोकायुक्त दिन साजरा करण्यासाठी केरळ लोकायुक्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्यपालपदाचे महत्त्व आणि त्या पदास असलेले अधिकार यावर आपल्या भाषणात स्पष्ट विवेचन केले. केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव हे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी, राज्यपाल म्हणजे ‘रबर स्टॅम्प’ नाही, हे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालपदाची व्याख्या स्पष्टपणे केली आहे, असेही त्यांनी लक्षात आणून दिले. राज्यपालांनीएखाद्या विषयात हस्तक्षेप केला की, त्यांनी असे करायला नको होते, अशी चर्चा लगेचच सुरू होते. पण ही सर्व चर्चा निरर्थक आहे. पण आपली घटना काय सांगते हे लक्षात घेतले पाहिजे. लोकायुक्तपदासारख्या संस्थेचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत असताना राज्यपाल त्यासंदर्भात हस्तक्षेप करू शकतात. घटनात्मक संस्थांच्या कामकाजावर परिणाम करणारे कायदे आणण्याचे प्रयत्न होत असतील आणि अशा संस्था अस्थिर केले जात असेल, तर त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे, असे तामिळनाडूच्या राज्यपालांनी ठणकावून सांगितले. तामिळनाडूच्या राज्यपालांनी केरळमध्ये आयोजित कार्यक्रमात तेथील डाव्या आघाडीच्या सरकारचे कान टोचले हे चांगलेच झाले! त्यातून त्या सरकारला काही सद्बुद्धी मिळते का ते पाहावे लागेल!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.