काय हवं होतं श्रद्धाला? काय दिलं समाजाने?

    18-Nov-2022   
Total Views |

shesha 
 
 
 
श्रद्धाची निर्घृण हत्या झाली. तीन वर्षाच्या निकट सहवासानंतर जर तिचा सोबती अत्यंत थंड डोक्याने उत्तम नियोजन करून तिचा खून करतो, याचा अर्थ ही सहज घडलेली घटना नक्कीच नाही. आई वडील विभक्त होते, अशा कुटुंबातून येऊन आपल्या पायांवर उभं राहण्याच्या इर्षेने जीवनाला भिडलेली ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली तरुणी. या वयात अनेक प्रश्न भेडसावतात, उसळतं रक्त आणि सोबतीला आर्थिक स्वातंत्र्यही होतंच. अशावेळी आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊ न शकणारी मुलगी कमकुवत होती किंवा मूर्ख होती अशी विधानं करणं म्हणजे बेजबाबदारपणा. मी माझ्या नियमानुसार वागेन असं सांगून घर सोडणारी मुलगी मारझोड करणाऱ्या प्रियकरसोबत लग्नाचा हट्ट धरणारी नक्कीच नसावी.
 
 
आई बाबा विभक्त झाल्यापासून तिचा विवाहसंस्थेवरचा विश्वास उडाला होता असे तिच्या मित्र मैत्रिणीच्या व्यक्तव्यवरून लक्षात येते. अशावेळी लग्न नको पण लीव्ह इन मध्ये एकत्र राहू असा तिचा सूर असावा ही शक्यता नाकारता येत नाही. आणि याच विषयाला जोडल्यास लव जिहाद आणि उपयोगशून्य 'काफिर'ची हत्या ही मुस्लिम मानसिकता तर्कसुसंगत वाटते. अर्थात या सर्व शक्यता. परंतु २६ वर्षाच्या जाणत्या आणि ३ वर्षांचा निकट सहवास लाभलेल्या मुलीची हत्या करून प्रदीर्घ प्रक्रियेतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबला बाह्य मदत मिळाली असावी अशी शक्यताही नाकारता येत नाही.
 
 
परंतु या घटनेकडे लव्ह जिहादी कट्टर दृष्टिकोनातून न पाहता तिच्या मानसिकतेविषयी उल्लेख करावासा  वाटतो. ही घटना घडून गेली. पण पुढे काय? अशा अनेक मुली जन्माला येतील आणि त्यांच्या सहिष्णू वृत्तीचा फायदा घेणारे डोमकावळे टपलेलेच असतील. या मुली मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात का? तर मुळीच नाही. मायाळू असतात, संवेदनशील असतात, क्षमाशील, आशावादी असतात. उदारमतवादी दृष्टिकोनातून जगाकडे पाहतात. इतरांचं दुःख पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले, आपल्या प्रश्नांपेक्षा इतरांची दुःख आपल्याला मोठी वाटू लागली, समोरच्या व्यक्तीच्या भावनांसाठी आपण कासावीस होत असू तर आपण त्यांच्यासाठी दुबळं सावज ठरू शकतो. हे त्यांना समजत नाही. आपल्या भावनांना आपण काबूत ठेऊ शकत नसू तर विवेक ठेऊन नात्यांचा आणि आपला स्वतःचा विचार करण्याची शक्ती आपण गमावून बसतो. आपल्या भावनांच्या आणि गरजांच्या बाबतीत तरी आपण स्वार्थी असायलाच हवं. भयंकर आशावादी असू तर आपण आपल्याच स्वप्नांमागे फरफटले जातो. कुठे थांबावं, कुठून परत फिरावं याची जाणीव आपल्याला होत नाही.
 
 
हा प्रश्न फक्त मुलींचा नाही तर सगळ्या वयोगटातल्या सर्व स्त्री पुरुषांचा आहे. आपल्याला उपयोगशून्य नवऱ्याला सर्वतोपरी सहन करणाऱ्या स्त्रियांची परंपरा फार पूर्वी पासून लाभली आहे. दारू पिणाऱ्या, मारझोड करणाऱ्या आणि कधीतरी काहीही कमाई न करणाऱ्या नवऱ्याविरोधात तक्रार करून काडीमोड घेण्याची हिम्मत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रियाही दाखवत नाहीत. लग्न झाल्यावर पार्टीचे मार्ग बंद होतात की ते बंद झालेत असं स्त्रियांना वाटतं? आंतरधर्मीय पुरुषासोबत नातं जोडायचा निर्णय मुली घेतात तेव्हा त्याला घरून साहजिकच विरोध होतो पण निर्णय चुकला तर आईबाबा त्यांना भक्कम आधार देतात का?
 
 
आपली विचारसरणी, जगाकडे पाहायचा दृष्टिकोन आपली मतं आपल्या जडण घडणीतून तयार होत असतात. कोणत्या वातावरणात आपण मोठे झालो आहोत, कोणाचा सहवास आपल्याला जास्त लाभतो, या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. कुटुंबात वडिलांचा भावनिक संपर्क किती आहे, आईचा आणि वडिलांचा एकमेकांशी किती संवाद आहे, भावंडांसोबबत आणि आपल्यासोबत आई वडील कसा व्यवहार ठेवतात हे सर्व लहान मुलं पाहत असतात. यातून त्यांना आत्मभान येतं, सेल्फ कन्सेप्ट तयार होते ती याच वयात, बऱ्याच मुलांमध्ये पर्सनॅलिटी क्रायसिस डेव्हलप होतो तो थोडं कळू लागतं त्याच काळात.
 
 
समाज आपल्याला स्वीकारेल का? आपलं घर आपल्याला स्वीकारेल का? मी एखादा चुकीचा निर्णय घेतला तरी घरी परत जायचे मार्ग आपल्यासाठी मोकळे आहेत का? हे प्रश्न या मुलांना पडू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्या माणसांनी आपल्यावर विश्वास दाखवणं गरजेचं असतं, नाहीतर जो न्यूनगंड तयार होतो तो आपल्याला चंचल बनवतो, मिळतील तेवढी आव्हानं आपण पेलू पाहतो. सर्वांपेक्षा काही वेगळं करावं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावं अशी खुमखुमी येते. जागाच लक्ष वेधून घ्यायचा सुप्त प्रयत्न यामागे असतो. ते अटेन्शन चुकीच्या व्यक्तीकडून मिळालं तर आपली सहज शिकार होते. स्वतःला मानसिकदृष्ट्या निर्णय घेण्यासाठी भक्कम बनवणं ही काळाची गरज आहे.
 
 
आपल्या मुलांना, मैत्रिणींना, मित्रांना, एक डोळस दृष्टिकोन आपणच द्यायला हवा. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना विचारसक्षम बनवणं हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.