प्रत्येकाच्या बकेटलिस्टमध्ये असणारं 'हंपी मंदिर'

    दिनांक  18-Jan-2022 18:50:07
|

Hampi
 
 
 
बंगळुरू : कर्नाटकच्या हंपी मंदिराचं प्रत्येक तरुणाईला वेगळं आकर्षण असतं. एकदा तरी या मंदिराचं पारंपारीक वैभव पहाता यावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तरुणाईच्या बकेटलिस्टमध्ये असणाऱ्या या हंपी मंदिराचा वारसाही तितकाच मोठा आणि अद्भूत. या मंदिराचाही एक इतिहास आहे... या मंदिराची कहाणी नेमकी काय ते आपण या भागात पाहुयात... पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवराय यांनी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपी येथे आणून इथल्या रथामध्ये तिची स्थापन केली होती. साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्ण देवरायांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपूररात ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही.', अशी या मंदिराची अख्यायिका आहे. आजही विठ्ठलाच्या प्रतिक्षेत हे मंदिर उभं आहे असे म्हटले जाते. कर्नाटकातले हंपी हे शहर सोलापूर शहरापासून फक्त ३५० किमी अंतरावर आहे. हे विठ्ठलमंदिर तुंगभद्रा नदीच्या काठी वसले आहे. अतिशय सुंदर असे शोभणारे हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
 
 
 
मंदिराची रचना
विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम द्रविडी शैलीतले आहे. मंदिराच्या चहूबाजूंना उंच तटबंधी आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करताच आपण वेगळ्या जगात तर नाही ना आहोत, असा भास होतो.
 
 
 
Vitthal mandir
 
 
मंदिरातली चार पीठं आणि तुळशी वृंदावन...
मंदिरात एकामागे एक अशी चार पीठ आहेत; ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि रथ पीठ. रथ पीठ म्हणजे दगडी रथ. त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत. हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे. इथे एक तुळशी वृंदावनही आहे. पूर्वीच्या काळी घरासमोर तुळशी वृंदावन असायचे, तो कदाचित याच द्रविडी शैलीचा एक भाग असावा.
 


Hampi1
 
 
 
चार बाजूंना चार मंडप...
मंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत; पाकगृह मंडप, भजनगृह मंडप, पांडुरंग-रखुमाई कल्याण मंडप आणि मध्यभागी असलेला महामंडप. कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जाई. त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ हे संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नसले तरी अजूनही त्या स्तंभांमधून स्वरांचा नाद ऐकू येतो.
 


hampi2
 
 
 
महामंडपात विठ्ठल मंदिर...
मध्यभागी असलेल्या महामंडपात विठ्ठल मंदिर आहे. मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यात पूर्वी विठ्ठलाची मूर्ती आता पंढरपुरात असल्याचे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. मूर्ती इथे नसली तरी मंदिराचे पावित्र्य आजही जपलेले आहे. ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ या ओवीची प्रचीती आजही त्या महामंडपात येते. मुख्य गाभाऱ्याच्या बाजूने एक छुपा प्रदिक्षणा मार्ग आहे. तो केवळ राज घराण्यातील लोकांसाठी मर्यादित होता.
 
 

hampi3
 
 
 
ऐतिहासिक विशेषता...
इथे वर्षातून एकदा विठ्ठलाची महा पूजा होत असे. त्यावेळी राजा कृष्ण देवरायाची राणी चेन्नम्मा या महामंडपात नृत्य सादर करत असे. त्याकाळी म्हणजे १५ व्या शतकात परदेशातून काही कलाकार आपली कला सादर करण्यास यायचे. मंडपाबाहेर पोर्तुगीज, चीनी अशा परदेशी लोकांची शिल्पे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिला फौजींची शिल्पे आहेत, एक महिला वाघाशी लढत आहे तर दुसऱ्यात युद्धात लढणारी स्त्री दिसते. विजयनगरच्या सैन्यात स्त्रीयांनाही प्रवेश होता हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटते. महामंडपाच्या मागील बाजूस देवी लक्ष्मीचे मंदिर आहे. हिंदू पुराणाप्रमाणे माता लक्ष्मी ही भगवान विष्णुंची सहचारणी होती. मंदिर परिसरात बरेच शिलालेख आढळतात.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.