समस्येत संधी शोधणारी उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2021   
Total Views |

Sheetal bhide_1 &nbs
 
 
प्रवाहाच्या विरोधात परिस्थितीमध्येही सकारात्मक आयुष्य जगणाऱ्या शीतल भिडे या नवउद्योजिकांमध्ये तसेच, मराठी भाषा संवर्धन चळवळीमध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्याविषयी...
अंबरनाथच्या शीतल भिडे या बालवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका. तीन दशकांपूर्वी त्या तिथे शिक्षक म्हणून रूजू झाल्या. शीतल आणि त्यांचे पती चंद्रशेखर यांचा ’भिडे अ‍ॅण्ड सन्स’ हा आम्रखंड आणि श्रीखंड तयार करुन विक्रीचा व्यवसाय. तसेच शीतल यांचा लखनवी कपडे विकण्याचाही व्यवसाय आहे. त्याचबरोबर दर दिवाळीला शीतल आणि त्यांचे कुटुंबीय त्रिस्थळी यात्रा सहल काढतात. यात प्रयागराज, काशी आणि गया या तीन स्थळांची धार्मिक सहल असते. डोंबिवली-कल्याण वगैरे भागातून या सहलीला चांगला प्रतिसाद असतो. घरातले सदस्य समरस भावनेने जगत असतील, तर घरात सुखशांती आणि त्याबरोबर लक्ष्मीही वास करते, हे शीतल यांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध केले आहे. मुख्याध्यापकाची नोकरी सांभाळताना घरचा आम्रखंड आणि श्रीखंड व्यवसाय करतानाही शीतल यांना कधीच असे वाटले नाही की, आपण तर मुख्याध्यापिका, मग आपण हे काम का बरे करावे? कारण, कोणतेही काम कधीच हलके नसते. स्वाभिमान आणि प्रामाणिकपणे केलेले काम हे श्रेष्ठच आहे, असा शीतल यांचा विचार. एका महिलेने एकाच वेळी विविध व्यवसाय करण्याचा संकल्प करणे आणि त्यात तसे यशही मिळवणे, ही दुर्लभ बाब आहे. मध्यमवर्गीय शीतल भिडे यांनी हे साहस दाखविले. होय, हे साहसच होते. कारण, मराठी माणूस उद्योग करूच शकत नाही, अशी एक विचित्र मानसिकता समाजात आढळते. या पार्श्वभूमीवर शीतल यांनी छोट्या प्रमाणात का होईना, पण आपल्या स्तरावर घरगुती उद्योगाची पायाभरणी केली. त्यात त्यांच्या सासूबाई मंगला, पती चंद्रशेखर आणि मुलगा क्षितीज यांनीही सहभाग दिला.
 
 
त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा होण्याचीही एक कहाणी आहे. एकदा त्यांचे पती चंद्रशेखर यांनी त्यांच्या आईच्या म्हणजे मंगला यांच्या मार्गदर्शनाखाली घरच्या घरी श्रीखंड-आम्रखंड तयार करायला सुरुवात केली. मंगला यांना वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची आवड होतीच. त्यांची सुरुवात दोन किलोंपासून झाली, नंतर वाढत वाढत आता त्या १७५ किलो श्रीखंड-आम्रखंड विकतात, मग हळूहळू इतर पदार्थ मिळतील का, अशीही ग्राहकांकडून विचारणा होऊ लागली. तेव्हा हळूहळू हे सगळे पदार्थ तयार करायला सुरुवात केली. आता घरगुती श्रीखंड-आम्रखंडाबरोबरच मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, बेसन लाडू, पौष्टिक लाडू, घरी बुंदी पाडून तयार केलेले मोतीचूर लाडू, पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, पाकातले चिरोटे हे खाद्यपदार्थही ‘भिडे अ‍ॅण्ड सन्स’तर्फे तयार केले जातात. आधी हा व्यवसाय अंबरनाथपुरताच मर्यादित होता, पण हळूहळू कल्याण-डोंबिवलीमध्ये सुद्धा खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. व्यवसायात प्रामाणिक असावे, वेळा पाळाव्यात, दिलेला शब्द पाळावा, यासाठी शीतल जणू कटिबद्धच आहेत. त्यामुळेच की काय, त्यांच्या घरच्या व्यवसायात सध्या एकही बाहेरची व्यक्ती काम करत नसतानाही शीतल त्यांना मिळालेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स दिलेल्या वेळेत पूर्ण करतात. शीतल यांनी त्यांच्या उत्पादनाची कधीही जाहिरात केली नाही.
 
 
दुसरीकडे मायमराठी भाषेसाठीचे त्यांचे कामही उल्लेखनीय आहे. त्यांच्या समुपदेशनामुळे शेकडो पालकांनी त्यांची मुले मराठी माध्यमात शिकायला पाठवली. शीतल यांची जीवनकहाणी ही तशी चारचौघींसारखीच असली, तरी त्यात वेगळेपणा आहे. प्रभाकर आणि मालती मुजुमदार यांना चार अपत्ये. त्यापैकी एक शीतल. प्रभाकर रेल्वेत नोकरीला होते, तर मालती गृहिणी होत्या. हातावरच्या शेवया, हलव्याचे दागिने त्या तयार करून देत असत. आई-वडिलांनी लहानपणापासून मुलांना प्रामाणिकतेचे आणि कष्ट करण्याच्या मानसिकतेचे संस्कारही दिले. दोघेही मुलांना सांगत, ‘सतत नवीन शिकत राहा.’ मालती आपल्या मुलांना सांगत, “संसार हा दोघांचा असतो. त्यामुळे तो दोघांनी बरोबरीने चालवावा आणि कोणत्याही समस्येला उत्तर असतेच; फक्त ते आपण शोधून काढणे महत्त्वाचे.” उभयंतांना चार अपत्ये आणि प्रभाकर एकटेच कमावते असले, तरी त्यांनी मुलांची सगळी हौसमौज पूर्ण केली.
 
 
 
लहानपणापासून शिक्षिका व्हायचे शीतल यांनी मनोमन ठरविले होते. तसेच आपला एक व्यवसाय असावा, असेही त्यांना वाटे. पुढे महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काही कारणास्तव शीतल यांना शिक्षण सोडावे लागले. पण, या काळातही बहीण-भावंडांसोबत त्या घरच्या टायपिंगच्या व्यवसायात काम करत असत. पुढे त्यांना चंद्रशेखर भिडे यांचे स्थळ आले. चंद्रशेखर सालस आणि निर्व्यसनी, घरदांज. मात्र, ते रिक्षाचालक होते. शाळेत मुलांना रिक्षाने न्यायचे हा व्यवसाय. शीतल यांनी लग्नाला होकार दिला. कारण, एकच की शीतल यांच्या घरातल्यांनी नवऱ्या मुलाची माहिती काढली होती. सुस्वभावी आणि कष्टाळू मुलगा. शीतल यांच्या निर्णयावर अनेक जणांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शीतल यांनी विवाहानंतर सासरच्यांच्या मदतीने घरात व्यवसाय-उद्यमाच्या आवडीचे नंदनवन फुलवले. आयुष्यात पुढे जास्तीत जास्त महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध निर्माण करून देण्याचा शीतल यांचा संकल्प आहे. त्या म्हणतात, “प्रत्येक समस्येत संधी आहे. ती संधी शोधायला हवी.”
@@AUTHORINFO_V1@@