‘सुपरफास्ट’ मुंबईला ‘मेगाफास्ट’ करणारे विकास प्रकल्प

    दिनांक  14-Sep-2021 21:39:37   
|

Mumbai  _1  H x
 
 
 
 
मागील भागात मुंबईतील काही गृहनिर्माण प्रकल्पांचा आपण आढावा घेतला होता. आज मुंबईच्या विकासाला गतिमान करणार्‍या अशाच दोन प्रकल्पांची आपण सविस्तर माहिती करुन घेऊया.

 
मुंबई-पारबंदर पूल प्रकल्प (ट्रान्सहार्बर लिंक)
 
हा एक मुंबईतील नवीन मुंबईला जोडणारा असा महत्त्वाचा द्रूतगती वाहतूक महामार्ग प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडून बांधला जात आहे. यात मुंबई बंदराकडील पिरपाव जेट्टी, मुंबईतील शिवडीतील ठाणेखाडीचा भाग आणि नवी मुंबईतील शिवाजी नगर आणि चिरले भाग जोडले जाणार आहेत. नवी मुंबईतील ‘जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्ट बंदरा’चा भाग, रायगड जिल्ह्यातील उरण व अलिबागचा भाग आणि प्रस्तावित नवी मुंबईतील विमानतळसुद्धा या जोडरस्त्याला भविष्यात जोडले जाणार आहेत तसेच मुंबईतील दक्षिण, मध्य व पश्चिमेकडील भाग पण जोडले जाणार आहेत.
 
या २१.८ किमी लांबीच्या प्रकल्पात काँक्रिटच्या पुलावरच्या मधल्या भागाखालून होड्या जाण्यासाठी चार किमींचा पोलादी भाग ठेवला जाणार आहे. या पुलावरून जाणार्‍या वाहनांचा जास्तीत जास्त वेग ताशी १०० किमी राहणार आहे. या पुलावर मरिन पूल म्हणून ‘आधुनिक इंटेलिजन्ट ट्राफिक प्रणाली’ आणि इतर वाहतूकसोई होणार आहेत. या प्रणालीमध्ये पूल वापरणार्‍या वाहनांचे सीसीटीव्हींच्या साहाय्याने कायम निरीक्षण केले जाऊन योग्य त्या सुरक्षिततेसाठी सर्व बदलते संदेश मध्यवर्ती-केंद्राकडे पाठविले जातील. या पुलावर शिवडीजवळ फ्लेमिंगो व माशांकरिता ८.५ किमी पट्ट्यात ध्वनीमुक्त ‘एको दिवे प्रणाली’ असेल, तसेच ‘भाभा अ‍ॅटॉमिक संशोधन केंद्रा’कडून दृश्यरोधक रचनाही ठेवली जाणार आहे.
 
पुलाची रचनात्मक माहिती
 
 
एकूण शिवडी ते चिरले पुलाची लांबी २१.८ किमी व पुलावर सहा मार्गिका असतील. हे दक्षिण मुंबईतील स्थानांना पूर्वेकडे नवी मुंबईला जोडण्याविषयीचे काम १९९० पासूनच तत्कालीन राज्य सरकारच्या विचारात होते. या कामाकरिता ८५ टक्के निधी ‘जिका’ या जपानी कंपनी’ने पुरवण्याचे ठरविले आहे. एकूण प्रकल्पाची स्थूल किंमत १७,८४३ कोटी रु. आहे. जुलै २०२१ पर्यंत पुलाचे बांधकाम ४७ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची एकूण लांबी २१.८ किमी, ज्यात पुलाची लांबी १८.१९ किमी व रुंदी २७ मी. मार्गिका (३+३), रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक-एक आपत्कालीन मार्गिका असेल. सर्वात उंच खांब २६ मी. व समुद्रात सर्वात खोल पाया ४७ मी. असणार.
 
पुलाची टिकण्याची क्षमता १०० वर्षे राहील. हे काम पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात लांब असा पाण्यावरील व समुद्रावरील सागरी सेतू ठरणार आहे. पुलाच्या कामात काँक्रिट व स्ट्रक्चरल पोलादी कामाचा वापर केला जाणार आहे. हे काम २०२२ मध्ये आधी ठरल्याप्रमाणे ५४ महिन्यांत पूर्ण करण्याचे विचारात होते. परंतु, ‘लॉकडाऊन’मुळे ते काम आता २०२३च्या मध्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. टोल चार्जेस - कारकरिता रु. २४०, हलक्या व्यापारी वाहनासाठी रु. ३१०, बससाठी रु. ५५० असे विचाराधीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर २०१६ मध्ये पायाभरणी समारंभाचे उद्घाटन केले आणि प्रत्यक्ष बांधकामएप्रिल २०१८ मध्ये सुरू झाले. हे काम २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे ठरले आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत ५२ टक्के काम पूर्ण.
 
 
पॅकेज १ - शिवडीपासून १०.३८ किमी लांबींचे मरिन काम कंत्राटदार ‘लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो.’
पॅकेज २ - १०.३८ किमी खुणेपासून १८.१९ किमी खुणेपर्यंत (७.८१ किमी मरिन बांधकाम)
पॅकेज ३ - १८.१९ किमी खुणेपासून राष्ट्रीय महमार्गावरील चिरले गावापर्यंत (३.६१ किमी) कंत्राटदार ‘लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो.’
पॅकेज ४ - ‘इंटेलिजन्ट ट्रान्स्पोर्ट प्रणाली’ ज्यामध्ये टोल, ट्रान्स्पोर्ट व्यवस्थापन आणि मशीनरी साहित्याच्या उभारणीकरिता वेगळा कंत्राटदार नेमला जाणार आहे.
 
 
‘स्टील गर्डर’चा देशात प्रथमच वापर होणार आहे. पुलाखालून बोटींची वाहतूक सुकर होणे आणि समुद्रातील तेलवाहिन्यांना धक्का लागू नये, यासाठी खांबांमध्ये अधिक अंतर ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी अत्याधुनिक ‘ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक्स’चा (OSD) वापर करण्यात येत आहे. एकूण २२ किमीच्या पुलापैकी ४.१ किमींचा टप्पा ‘स्टील बॉक्स गर्डर’चा असेल. ९० ते १८० मी. लांबीचे २९ ‘ओएसडी’ वापरले जातील. स्टील बांधणीचा खर्च सुमारे ४३०० कोटी रु. आहे.
 
 
हा असा ‘एमटीएचएल’ प्रकल्प, काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई व नवी मुंबई नगरे खरोखर जोडली जातील. ही रस्ताविकासाची कामे विशेषत: गृहनिर्माण प्रकल्पांसाठी फार सोईची ठरणार आहेत. ‘एमएमआरडीए’ या पुलावरून मेट्रो बांधता येईल का, त्याचा अभ्यास करणार आहे. सार्वजनिक डेडिकेटेड बससेवासुद्धा या मार्गावरुन भविष्यात सुरु होऊ शकते.
 
 
मुंबई ते नागपूर समृद्धी द्रूतगती महामार्ग
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. नोव्हेंबर २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. मुंबई ते नागपूर या ७०१ लांबीच्या द्रूतगती मार्गासाठी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे नागपूर ते शिर्डीपर्यंतचे काम १ मे रोजी पूर्ण करण्याचे पक्के ठरले होते. परंतु, कोरोना ‘लॉकडाऊन’च्या अडचणींमुळे कामगारांची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. शिवाय बांधकामांकरिता जे सामग्री लागते, त्याचीही चणचण भासू लागली होती. त्यामुळे काम पुढे ढकलण्यात आले.
 
 
‘कोविड-१९’ पूर्व काळातील नियोजनाप्रमाणे कामाचे टप्पावार वेळापत्रक खालीलप्रमाणे पूर्ण करण्याचे ठरले होते.
 
टप्पा १ - ५२० किमी नागपूर ते शिर्डी हे काम मे २०२१ ला पूर्ण होणार होते.
 
टप्पा २ - शिर्डी ते इगतपुरी १०३ किमींचे काम डिसेंबर २०२१ ला पूर्ण होणार होते.
 
टप्पा ३ - उरलेले ७८ किमींचे काम (इगतपुरी ते मुंबई) १ मे, २०२२ ला पूर्ण होणार होते. 
या सगळ्या नियोजनाच्या तारखा आता बदलाव्या लागतील.
 
या प्रकल्पाकरिता एकूण स्थूल किंमत रु. ५५,३३५ कोटी आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च ५२.६ टक्के झाला आहे व स्थापत्त्य काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. हा महामार्ग दहा जिल्ह्यांतून, २६ तालुक्यांतून आणि ३९३ गावांतून जाणार आहे. एकदा पूर्ण झाल्यावर नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ १६ तासांवरून आठ तासांवर येईल. विशेष म्हणजे, या कामासाठी जमिनीचा ताबा घेण्याचे काम दहा जिल्ह्यांतील ८८६१.०२ हेक्टरचे काम १८ महिन्यांत (विक्रमी वेळात) पूर्ण झाले. शेतकर्‍यांना वा मालकांना नुकसानभरपाई म्हणून ७४२४.३७ कोटी रु. खर्च करण्यात आले.
 
 
या महामार्गाच्या रस्त्याची प्रस्तावित रुंदी १२० मी. व लांबी ७०१ किमी वेगमर्यादा ताशी १५० किमी राहील. नागपूर-शिर्डी मार्गाच्या टप्प्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे. या परिसरात पेट्रोल पंप व इतर सुविधा वाहनचालकांसाठी पुरविल्या जाणार आहेत. जलसंधारणाच्या कामाकरिता अमरावती जिल्ह्यातील ३८ नाल्यांतील ९१,२१० मी. लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे.
 
 
या मार्गाच्या कामाबरोबर १७ नवीन नगरे बांधली जाणार आहेत. त्यातील सहा नगरे बांधून त्यात व्यापारी व निवासी संकुले असतील, शिवाय शेतीविषयक उद्योगही असतील. त्याकरिता विकास आराखड्याकरिता सल्लागार नेमला जाईल. ‘क्रायसिल’ व ‘एचसीपी’ कंपन्या काम करतील. त्याकरिता दोन गावे (२७१८ हेक्टर) ठाणे जिल्ह्यात, सात गावे (११३३.०२ हेक्टर) वर्धा जिल्ह्यात, तीन गावे (१९४४.०७ हेक्टर) बुलढाणा जिल्ह्यात, चार गावे (१९६७.९५ हेक्टर) नगर व औरंगाबादजवळ, सहा गावे (२२६९ हेक्टर) खुद्द औरंगाबादमध्ये आहेत.
 
 
जंगली वसाहती सांभाळण्याकरिता दहा ठिकाणी ‘ओव्हरपासेस’ बांधले जाणार आहेत. याकरिता ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांचा सल्ला घेतला जाणार आहे. एकूण ११७ किमी रस्त्यांच्या ठिकाणी (ठाणे, अकोला व वाशिम) अशा २५ ‘वाईल्ड लाईफ’च्या वस्त्या आहेत. ‘ओव्हरपासेस’ ३२ मी. रुंद व चार मी. उंच राहणार आहे. ‘समृद्धी महामार्गा’वर २४ पथकर नाके राहणार आहेत. ते ‘फास्टॅग’ यंत्रणेने सुसज्ज असतील. या मार्गावर १.६५ रुपये प्रतिकिमी दराने पथकर वसुली सगळ्या प्रवासासाठी १,१५७ रुपये होईल.
 
 
कसारा घाटाच्या दोन बोगद्यांचे काम पाच किमीचे (कसारा ते इगतपुरी) पूर्ण झाले. ७.६ किमी बोगदा ओलांडणार्‍या दुसर्‍या रस्त्याने १५ ते २० मिनिटे लागायची व नवीन कामानंतर फक्त आठ मिनिटे लागतील. या मार्गावरील हरित विकास कामे करण्यासाठी व त्यांचा सांभाळ करण्यासाठी सुमारे रु. ९०० कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग सर्वोत्तम ठरणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. नागपूर ते शिर्डी ५०० किमींचे काम डिसेंबर २०२१ ला पूर्ण होईल व उर्वरित काम ऑगस्ट २०२२ साली पूर्ण होईल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.