"माथाडी कामगारांच्या रास्त मागण्या तातडीने मान्य करा"

    दिनांक  04-May-2021 16:37:58
|

Pravin Darekar_1 &nb
मुंबई : " जीवाची पर्वा न करता टाळेबंदी काळात सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक अशा भाजीपाला आणि अन्नधान्याच्या पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावणारे माथाडी कामगार हे देखील 'कोरोना योद्धेच' आहेत, पण त्यांच्या रास्त मागण्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून सरकारला या मागण्यांकडे डोळेझाक करता येणार नाही," असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारला दिला. माथाडी कामगारांना रेल्वे, बस व एसटीने प्रवासास परवानगी, अत्यावश्यक सेवेत समावेश आणि विमा संरक्षण कवच, या मागण्यांसाठी माथाडी कामगार न्याय हक्क सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनकडून माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी वाशी रेल्वे स्टेशन येथे केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी दरेकर उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
माथाडी कामगारांनी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या मशिद बंदर, डॉकयार्ड रोड, रे रोड, कुर्ला, मानखुर्द, वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दादर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, डहाणू रेल्वे स्टेशन बाहेर कोरोनाची नियमावली आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर करून कामगार व महाराष्ट्र दिन साजरा केला.
 
 
पुढे प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, "माथाडी कामगार कष्टाची व अंगमेहनतीची कामे करतात. भाजीपाला, अन्नधान्य या गोष्टी अत्यावश्यक सेवेत आहेत, त्याची वाहतूक देखील अत्यावश्यक सेवेत आहे. पण माल उतरवणाऱ्या, माल वाहून नेणाऱ्या माथाडी कामगारांना मात्र सरकारने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले नाही. या कामगारांची रोजीरोटी या कामावर आहे, ते टाळेबंदीच्या काळात त्यांच्या कामाच्या ठिकाणी कसे पोहोचतील याचा साधा विचारही सरकारने केला नाही. टाळेबंदीच्या काळात माथाडी कामगार व अन्य घटक बाजार समितीच्या आवारात नागरिकांच्या अन्न-धान्य, कांदा बटाटा, मसाले, भाजी व फळे, गॅस सिलिंडर या जीवनावश्यक मालाची, जनावरांचे खाद्य, पिकांचे खत व अन्य मालाची लोडिंग व अनलोडिंगची कामे जीव मुठीत घेऊन करत आहेत. ही कामे करताना अनेक माथाडी कामगारांना कोरोनाची लागण झाली तर अनेक कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण त्यांना विमा कवच देण्याचा विचारही सरकारने केला नाही."
 
 
"डॉक्टर, महापालिका कर्मचारी कोरोना रूग्णांची सेवा करीत आहेत तर पोलीस यंत्रणा संरक्षण देण्याचे काम करत आहेत. त्याप्रमाणेच माथाडी कामगार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मग जीव धोक्यात घालून कष्टाची कामे करणाऱ्या घटकाला अत्यावश्यक सेवेत घेणे, त्यांना रेल्वेने व महापालिका बस आणि एसटी बसने प्रवास करण्यास परवानगी देणे तसेच त्यांना विमा संरक्षण कवच लागू करणे या मागणीकडे महाराष्ट्र शासन का दुर्लक्ष करीत आहे?", असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
 
 
पुढे दरेकरांनी सांगितले की, सोमवारीच मला माथाडी कामगारांचे नेते, आमदार नरेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले होते. या आंदोलनाला येण्यापूर्वीच मी मागण्या मान्य करण्याची विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे आणि आज करोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला, माथाडी कामगारांच्या रास्त मागण्यांना समर्थन देण्यासाठी आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणाऱ्या कामगार व महाराष्ट्र दिनात सहभागी होण्यासाठी आज येथे आलो आहे. या आंदोलनाची दखल घेऊन कष्टाची व अंगमेहनतीची कामे करणा-या माथाडी कामगारांना शासन न्याय देईल, अशी अपेक्षा ही दरेकर यांनी व्यक्त केली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.