नजर नावीन्याचा शोध घेणारी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

dacess_1  H x W


‘डी अ‍ॅक्सेस’ (D-Access) ही कंपनी अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींची सेवा प्रदान करणारी भारतातील एक नामांकित कंपनी. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बारकाईने नजर ठेवत, सुरक्षा प्रदान करणारी अधिकाधिक ‘अ‍ॅडव्हान्स’ उपकरणे तयार करण्याचे कार्य ही कंपनी करते. सर्व प्रकारच्या मालमत्तेला सुरक्षा प्रदान करणे, हे या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट. अशा या अत्याधुनिक सुरक्षा सेवा प्रणाली व सॉफ्टवेअर निर्माण क्षेत्रात सेवा देणार्‍या नामांकित ‘डी अ‍ॅक्सेस’ कंपनीचे संचालक अमित सुधीर पवार यांच्या कोरोना काळातील व्यवस्थापन कौशल्याचा व मदतकार्याचा घेतलेला आढावा.


२००८ साली ‘डी अ‍ॅक्सेस सिक्युरिटी सिस्टीम प्रा. लि.’ या कंपनीची स्थापन झाली. तेव्हापासून अत्याधुनिक सुरक्षा सेवा प्रणालीचे कंपनीचे कार्य हे अविरतपणे सुरू आहे. या कार्यात अत्यंत कुशल आणि प्रतिभावान अभियंते, तंत्रज्ञ, प्रोग्रामर, स्वयंचलित सिस्टीम आणि सॉफ्टवेअरची रचना आणि विकास करणारी टीम कंपनीच्या जडणघडणीत प्रामुख्याने योगदान देते. कंपनी उत्पादनांमध्ये ‘लाईन-अप’मध्ये इलेक्ट्रॉनिक सुरक्षा कॅमेरे, वायरलेस सुरक्षा प्रणाली, सुरक्षा धातुशोधक, प्रवेश नियंत्रण सुरक्षा प्रणाली, प्रवेश स्वयंचलित यंत्रणा, फ्लॅप बॅरियर, बूम बॅरियर, नजर ठेवणारे सीसीटीव्ही सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीम आणि ऑफिस ऑटोमेशन आणि ‘थ्री-डी फेस’ यांचा समावेश आहे. याशिवाय २०१२ मध्ये सुरक्षेशी निगडित सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातही कंपनीने यशस्वीरीत्या पाऊल ठेवले. ज्यात कंपनी स्वयंचलित ‘एचआरएमएस’, ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’, ‘कॅन्टीन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’, ‘अ‍ॅम्बेडेड सोल्युशन्स’ यासारख्या कित्येक सेवा कंपनी प्रदान करते. १२ ते १४ वर्षांच्या कार्यकाळात कंपनीचा कायमच चढता आलेख राहिल्याचे या कंपनीचे संस्थापक आणि संचालक अमित पवार सांगतात.कोरोना काळात कंपनीने उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा नमुना भावी उद्योजकांसमोर ठेवला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोनाचे संकट केवळ पुणे किंवा महाराष्ट्र किंवा भारत एवढेच मर्यादित नव्हते, तर हे संकट संपूर्ण जगासाठी अनभिज्ञ असेच होते. पुण्यात पहिला कोरोना रुग्ण १४ मार्च, २०२० रोजी आढळून आला. रुग्ण सापडताच जगभरात कोरोनाने घातलेला धुमाकूळ पाहता मार्च अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच गोष्टी जागच्या जागी ठप्प झाल्या. त्याचप्रमाणे ‘डी अ‍ॅक्सेस’ कंपनीचेही सर्व व्यवस्थापन ठप्प झाले. मार्च ते मे दरम्यान कंपनीचे सर्व व्यवस्थापन ठप्पच होते. यादरम्यान काय करायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच उभा राहिला. यावेळी कंपनीचे सर्व कर्मचारी ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले होते व ‘पुढे काय?’ यावर विचारविनिमय सुरू होता. यावेळी दुसरा एक विचार होता तो म्हणजे, आपण समाजासाठीदेखील काम केले पाहिजे. व्यवस्थापन समितीने याबाबत नियोजन करून काही निधी जमा केला आणि त्या निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत पोहोचवली. यात मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक वस्तूंच्या किटचा समावेश होता. जसे की डाळी, तांदूळ, तेल, मीठ, अन्नधान्य यांचे किट बनवून ते गरजूंना वाटप केले. हातावर पोट असणार्‍या अशा एका मोठ्या वर्गाला वाड्या-वस्त्यांवर जाऊन पवार यांच्या टीमने मदत पोहोचवली. मनुष्यधर्म पाळत समाजासाठी आपण कठीण प्रसंगात उपयोगी पडलो, याचे मोठे समाधान व अभिमान असल्याचे अमित पवार सांगतात. ‘लॉकडाऊन’ काळात घरात बंदिस्त असताना घरातील वडीलधार्‍या माणसांचा पवार यांना पाठिंबा लाभला. त्याचप्रमाणे अमित यांचे मित्र तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय सोनवणे यांचीही मोठी साथ लाभल्याचे अमित पवार सांगतात. ‘ई-संवाद’ माध्यमातून सर्वजण एकमेकांशी जोडले गेलेले असल्यामुळे मोठा मानसिक आधार या काळात कंपनीतील प्रत्येकच कर्मचार्‍याला मिळाला.

आम्ही कायमच नावीन्याचा शोध घेतला. कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे ७५ कर्मचार्‍यांची आमची टीम कार्यरत होती, तेवढीच पूर्ण ती आज कार्यरत झाली आहे आणि कोरोना काळातही आम्ही ज्यापद्धतीने काम केले, त्यामुळे आमच्या कामात आज वाढ झाली आहे.

कंपनी महत्त्वपूर्ण सुरक्षा सेवा क्षेत्रात मोडत असल्याकारणाने कंपनीने मे महिन्यातच आपल्या कामाला सुरुवात केली. अनेक शासकीय यंत्रणांची प्रणाली हाताळण्याचे महत्त्वाचे काम पवार यांच्या कंपनीकडे असते. त्यामुळे सरकार प्रमाणित संस्थांकडून कंपनीच्या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली व त्यानंतर कंपनीच्या कामाला सुरुवात झाली. यात सुरुवातीला व्यवस्थापकीय समिती व शासन नियमानुसार कर्मचारी उपस्थितीच्या नियमावलीनुसार कामकाज सुरू झाले. कंपनीच्या सेवा ‘इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘ऑटोमेशन’अंतर्गत येत असल्याकारणाने कंपनीला लागणारा बराचसा कच्चा माल परदेशातून आयात करण्यात येत होता. या वस्तू कशा आयात करायच्या, हे आव्हान असतानाच कंपनीच्या अभियांत्रिकी विभागातील कर्मचार्‍यांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावत, काही नवीन उत्पादने निर्माण करण्याचे ठरविले. जी उत्पादने परदेशातून भारतात आयात होतात, त्यांना भारतातच पर्याय निर्माण करण्याचा मानस समोर ठेवण्यात आला. कंपनीने यशस्वीरीत्या नवीन भारतीय बनावटीची दोन ते तीन उपकरणे या काळात लॉन्च केली. भारताला एक नवीन अत्याधुनिक प्रणाली प्रदान करण्यात अमित पवार व त्यांच्या टीमला यश मिळाले. आजही या अत्याधुनिक प्रणालीचे ‘इन्स्टॉलेशन’ अनेक ‘मल्टिनॅशनल’ कंपन्यांमध्ये केले जात आहे व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘ह्युमन बॉडी टेम्परेचर स्कॅनर’, ‘अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टीम’, ‘हेल्थ केअर मॉनिटरिंग सिस्टीम’ यांसारखी उपकरणे कंपनीने तयार केली. यासाठी लागणारे सॉफ्टवेअर कंपनीने निर्माण केले. या प्रक्रियेत कंपनीचे अनेक कर्मचारी घरून काम करत होते. मात्र, तरीही उत्तम व्यवस्थापन राखत कंपनीने ‘टीमवर्क’च्या जोरावर कोरोना संकटाचे संधीत रूपांतर करत, कंपनीच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला. कंपनीने कोरोना काळात नवनिर्मिती केलेल्या उत्पादनांना आज केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मागणी वाढते आहे.


dacess_1  H x W

‘डी अ‍ॅक्सेस’ ही एक कंपनी नसून ते एक मोठे कुटुंबच आहे. येथील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना सोबत घेत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे कंपनीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने नवनिर्मिती क्षेत्रात आज मानाचे स्थान आहे. अमित पवार सांगतात की, “आज आम्ही ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट क्षेत्रात आहोत, काही गोष्टींच्या नवनिर्मितीकडे वळलो आहोत, हे आता अविरतपणे सुरूच राहणार आहे. नवीन प्रकल्प आमच्याकडे येतच राहतील. व्यवसाय क्षेत्रात चर्चा होती की, कोरोनानंतर मोठे संकट देशासमोर असेल. आपल्याला काम मिळणार नाही. मात्र, जर आपण कायम नावीन्याच्या शोधात राहिलो, नवनिर्मितीसाठी प्रयत्न केले, तर जगभरात कोणावरही काम नाही, अशी वेळ येणार नाही. तरुण उद्योजकांनीही समाजातील मागणीचा आढावा घेत नवीन काय करता येईल, याचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी संशोधन केले पाहिजे. आपल्या कार्यात सातत्य ठेवले, सातत्याने कष्ट केले तर यश तुमचेच आहे,” असा संदेश अमित पवार तरुण उद्योजकांना देतात.
@@AUTHORINFO_V1@@