ध्येयवादी शरद कुमार

    दिनांक  20-Nov-2021 13:58:15   
|

Sharad _1  H xटोकियो ‘पॅरालिम्पिक २०२१’मध्ये कांस्यपदक पटकावत ‘अर्जुन पुरस्कारा’वर आपले नाव कोरणार्‍या ध्येयवादी शरद कुमार याचा जीवनप्रवास...
 
 
भारतीय क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या काही खेळाडूंचा ‘खेलरत्न पुरस्कार’ आणि ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान करून नुकताच सन्मान करण्यात आला. टोकियो येथे संपन्न झालेल्या ‘पॅरालिम्पिक २०२१’मध्ये भारतीय खेळाडूंनी ’न भूतो न भविष्यति’ अशी कामगिरी केली. भारतीय ‘पॅरा’ खेळाडूंनी १९ पदके भारतासाठी जिंकून सर्वच भारतीय खेळाडूंसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.
 
अंतिम सामन्याच्या आधीच्या दिवशी जखमी होऊनसुद्धा कांस्यपदक पटकावत एका खेळाडूने आपल्या घरच्यांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान उंचावली. यानंतर सर्वांनी त्याच्या या ध्येयवादी विचारांचे कौतुक केले. तो खेळाडू म्हणजे ‘टी ४२’ उंच उडीत कांस्यपदक पटकावणारा भारतीय ‘पॅरा अ‍ॅथलिट’ शरद कुमार. शरदच्या या कामगिरीमुळे सर्व देशभरात त्याची चर्चा झाली. जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास...
 
 
शरद कुमार याचा जन्म दि. १ मार्च, १९९२ रोजी बिहारमधील मुझफ्फरमध्ये झाला. सामान्य घरात जन्मलेल्या शरदला वयाच्या दुसर्‍या वर्षी स्थानिक निर्मूलन मोहिमेत ‘पोलिओ’चे बनावट औषध घेतल्याने डाव्या पायाला अर्धांगवायू झाला. यानंतर त्याचे आई-वडील दोघेही खचले होते. मात्र, तरीही यातून सावरून त्याच्या शिक्षणासाठी धडपड सुरू केली. त्याला दार्जिलिंगमधील एका बोर्डिंग शाळेत पाठवले. त्याचे आईवडील नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन त्याच्या शाळेचे शुल्क भरायचे. दार्जिलिंगमधील ‘सेंट पॉल हायस्कूल’मध्ये त्याचे शिक्षण सुरु झाले.
 
 
 
तो अभ्यासामध्ये हुशार होताच, शिवाय त्याला खेळांमध्येही रस होता. याचदरम्यान त्याला उंच उडी खेळाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. सुरुवातीला काही मुले त्याची मस्करी करत. म्हणून त्याने एकट्याने या खेळाचा सराव करण्यास सुरुवात केली. सातवीला असताना त्याने शालेय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सामान्य श्रेणीमध्ये खेळतानादेखील त्याने शालेय आणि जिल्हास्तरीय अनेक विक्रम मोडीत काढले. राज्यस्पर्धा जिंकून त्याने या खेळामधील स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले.
 
 
पुढील शिक्षणासाठी त्याने दिल्लीतील ‘मॉडर्न स्कूल’मध्ये प्रवेश घेतला आणि शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे ‘राज्यशास्त्र’ विषयात अभ्यास करण्यासाठी ‘किरोडीमल महाविद्यालया’त प्रवेश घेतला. पुढे ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’तून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‘स्पेशलायझेशन’सह ‘राजकारण’ विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. शरद कुमारच्या यशात त्याच्या मोठ्या भावाचे खूप मोठे योगदान आहे. शरद सतत त्याची आवड जपत खेळत राहावा, यासाठी मोठ्या भावाने सर्व जबाबदार्‍या घेतल्या. जेव्हा त्याच्या शाळेतील क्रीडा अधिकार्‍यांसह इतर अनेकांनी त्याला पाठिंबा देण्यास नकार दिला, तेव्हा शरदच्या मोठ्या भावाने त्याला मोलाचा पाठिंबा दिला.
 
 
 
२००८ मध्ये शरद कुमारने पहिले राष्ट्रीय पदक जिंकले. २०१० साली ग्वांगझू येथील आशियाई ‘पॅरा गेम्स’मधून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २०१२ मध्ये तो १.६४ मीटर उडी घेत लंडन पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरला. एप्रिल २०१२ मध्ये मलेशियन ‘ओपन पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये १.७५ मीटर उंच उडी घेऊन नवा विक्रम आपल्या नावावर केला. वयाच्या १९व्या वर्षी तो जागतिक क्रमवारीत अव्वल ठरला. यानंतर मात्र त्याचा वाईट काळ सुरू झाला. कारण, त्याने दिलेल्या ‘डोपिंग टेस्ट’मध्ये ‘पॉझिटिव्ह’ आला आणि लंडनमध्ये भारतीय झेंडा फडकावण्याचे त्याचे स्वप्न हे अपूर्ण राहिले. दोन वर्षे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. या सर्व गोष्टींमुळे खेळामधील त्याचा आत्मविश्वास ढासळला होता. त्याने अभ्यासवर अधिक लक्ष दिले. त्यानंतर ‘रिओ पॅरालिम्पिक’मध्ये त्याची कामगिरी ही अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
 
 
 
अनेक संकटे येऊनदेखील शरद कुमारने ‘पॅरालिम्पिक’मध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न सोडले नाही. त्याने युक्रेनमध्ये आपले प्रशिक्षण सुरू ठेवले. पुढे त्याने २०१७च्या जागतिक ‘पॅराअ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये १.८४ मीटर उडी मारून रौप्यपदकाची कमाई केली. पुढे २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या ‘पॅरा आशियाई गेम्स’मध्ये १.९० मीटर उंच उडी मारून एक नवा विक्रम रचला. पुढे तो टोकियोमध्ये होणार्‍या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला. यावेळी त्याने ‘टी ४२’ प्रकारात कांस्यपदक पटकावले. हे पदक त्याच्यासाठी खूप खास होते.
 
 
 
कारण, अंतिम फेरीच्या आदल्या दिवशी सरावादरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्याने अंतिम फेरीतून माघार घेण्याचादेखील विचार केला होता. मात्र, यावेळी वडिलांच्या सल्ल्यावरून त्याने ‘श्रीमद्भगवद्गीता’ वाचली आणि आत्मविश्वास संपादन करून पुन्हा मैदानात उतरला. त्याच्या या ध्येयवादी विचारांमुळेचा अनेक संकटांवर त्याने मात केली आणि तो यशस्वी ठरला. आता खेळाप्रमाणेच त्याने ’आयएएस’ होण्याचेदेखील स्वप्न उराशी बाळगले आहे. पुढेही त्याची ही ध्येयं सफल होत राहोत, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.