बांगलादेशात ३३० दिवसांत २४४२ हिंसाचाराच्या घटना

    11-Jul-2025   
Total Views |

मुंबई : बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचार प्रचंड प्रमाणात वाढल्याचे नुकतेच एका आकडेवारीवरून समोर आले आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी परिषद नावाच्या संघटनेने गुरुवारी सांगितले की, गेल्या ३३० दिवसांत म्हणजेच ४ ऑगस्ट २०२४ पासून देशात अल्पसंख्याकांविरोधात २,४४२ हिंसक घटना घडल्या. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेले. महिलांवर सामूहिक बलात्कारांसह अनेक लैंगिक अत्याचार झाले. प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. या हल्ल्यांत बळी पडलेल्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील पुरुष, महिला आणि किशोरवयीन मुलांचा समावेश होता.

परिषदेने अहवालात म्हटले की, ४ ऑगस्ट २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान २,१८४ हिंसक घटना घडल्या. त्यानंतर जानेवारी २०२५ ते जून २०२५ मध्ये आणखी २५८ घटनांची नोंद झाली. म्हणजेच ४ ऑगस्ट २०२४ पासून एकूण २४४२ हिंसक घटना घडल्या. २०२५ च्या घटनांमध्ये २० बलात्काराच्या घटना घडल्या. हिंदू प्रार्थनास्थळांवर ५९ वेळा हल्ले झाले. तसेच जनजाती समुदायांवरही १२ वेळा हल्ले झाले.

परिषदेच्या मते, हिंसाचाराच्या ८८ प्रकरणांमध्ये आतापर्यंत ७० जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने म्हणजेच मोहम्मद युनूस यांनी परिषदेच्या या नवीन अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक