काही आधुनिक लेखकांनी समर्थशिष्या वेणाबाईंच्या जीवनावर
कादंबरी लेखन केले आहे. वेणाबाईंचे एकंदर आयुष्य, त्यांनी अनुभवलेले
प्रसंग, मनाला चटका लावणारे आहेत. वेणाबाईंचे एकंदर जीवनचरित्र व वाड्.मय
अभ्यासण्याजोगे आहे. बखरकारांनी श्री समर्थचरित्र सांगताना वेणाबाईंच्या
कार्याचा उल्लेख केला आहे.
समर्थांच्या काळी तसेच त्यापूर्वीच्या
काळात समाजात असा समज दृढ झाला होता की, या संसारात बायकापोरे ही
परमार्थमार्गातील धोंड आहेत. त्यामुळे त्याकाळी जनमानसात संसाराविषयी
तिटकारा निर्माण झाला होता. अशा रीतीने प्रपंचाची हेळसांड झाल्याने सर्व
बाबतीत समाजाचे अपरिमित नुकसान झाले. सांस्कृतिक क्षेत्रात भोंदूगिरी
तांत्रिक-मांत्रिक यांना ऊत आला. राजकीय क्षेत्रातही पिछेहाट होऊन
गुलामगिरी पदरी पडली. या सार्यांचा परिणाम म्हणून त्याकाळातील स्त्रीवर्ग
सर्व बाबतीत उपेक्षित राहिला. त्यांना कुठेच मान उरला नाही. हे ओळखून
प्रपंचांची अवकळा थांबवण्यासाठी समर्थांनी प्रपंच प्रतिष्ठेचा उपदेश करायला
सुरुवात केली. समर्थ नुसता उपदेश करुन थांबले नाहीत, तर आपले विचार
कार्यान्वित करण्यासाठी स्वामी कामाला लागले. उपेक्षित स्त्रीवर्गाला
त्यातून सावरण्यासाठी समर्थांनी विवेकपूर्ण विचाराने स्त्रीत्वाचा गौरव
केला.
स्त्रीवर्गाची महती
सांगताना समर्थ म्हणतात, “फक्त स्त्रीच बाळाला जन्म देते. अनेक खस्ता खात
ती आपल्या बाळाला वाढवते. बाळाचे संगोपन करते. फक्त आईच बाळाला मायेने
वात्सल्याने जपते. या कामात ती कधी आळस करीत नाही. संगोपनाच्या कामाचा तिला
कंटाळा अथवा वीट येत नाही. अशी ममता, माया, मातेशिवाय कुठे आढळत नाही,”
असे समर्थ म्हणतात. संदर्भ दासबोध द. १७ स. २ ओवी क्र. २६ व २७ पुरुषांच्या
बरोबरीने स्त्रियांनाही वागवले पाहिजे, हा विचार समर्थांच्या अगोदर सुमारे
२१०० वर्षांपूर्वी भगवान बुद्धाने मांडला होता. सर्वांना माहीत आहे की,
गौतम बुद्धाने १८ वर्षांवरील सर्व अव्यंग स्त्री-पुरुषांना
बौद्धभिक्षूंच्या संघात प्रवेश दिला होता. संघातील सर्व स्त्री-पुरुष
भिक्षूंनी नीतीसंपन्न असावे, यासाठी बुद्धाने भिक्षूभिक्षुणींच्या आचाराचे
दहा नियम ठरवून दिले होते. त्यांना ‘दशशील’ म्हणतात. त्यात, माळाउटणी
इत्यादी सौंदर्य प्रसाधनांचा मोह टाळावा, नाचगाण्यासारख्या कार्यक्रमास जाऊ
नये, गादीवर झोपू नये, अशा संन्यासप्रवण विचारांचा समावेश आहे. मोह,
भ्रष्टाचार, ऐहिक आकर्षणे टाळण्यासाठी भिक्षूंना गिरीकंदरात विहारात राहावे
लागे.
सदाचाराची उच्च पातळी
गाठणार्या बुद्धांनी समाजातील सर्व स्त्रीपुरुषांत समानता आणण्याचा
प्रयत्न केला. तथापि समर्थांनी स्त्री-पुरुषांची समानता, तर मान्य केलीच,
पण स्त्रीवर्गाचे समाजातील महत्त्व ओळखले आणि स्त्रीत्वाचा यथोचित
विवेकपूर्ण गौरव केला. तसा गौरव त्यांच्या समकालीन कोणाही साहित्यिकाने
केलेला दिसत नाही. स्वामींनी स्त्रियांतील गुणवत्ता ओळखून त्यांना
संप्रदायात सामावून घेतले. संप्रदायात त्यांना योग्यतेनुसार काम देण्याचे
औदार्य दाखवले ४०० वर्षांपूर्वी समाजातील स्त्रीशक्ती व त्यांच्यातील
गुणवत्ता वाया जात होती. तिचा योग्य उपयोग होत नव्हता. समर्थांनी
विचारपूर्वक त्या गुणवत्तेला पारमार्थिक व सामाजिक कार्यासाठी कामाला
लावले. त्यातून स्वामींचे वैचारिक व बौद्धिक चातुर्य दिसून येते. त्याकाळी
स्त्रीवर्गात विधवा महिलांची स्थिती खेदकारक होती. विधवांना चार भिंतीच्या
आड राहून कुटुंबातील घरची कामे करणे आणि इतर वेळी धार्मिक ग्रंथांचे करणे
यातच काळ कंठावा लागे. धार्मिक विधीत अथवा सर्व समारंभात त्यांना भाग घेता
येत नसे. याशिवाय अनेक बंधने विधांवर लादली गेली होती. ही बंधने-रुढी
धर्मसंमत मानली गेली. तरी, कोणाही धर्ममार्तडांची तमा न बाळगता स्वामींनी
अनेक स्त्री-शिष्यांना, त्यात विधवाही होत्या, अनुग्रह देऊन त्या
स्त्रियांना सामाजिक प्रवाहात आणले. तसेच संप्रदायाची कामे त्यांना दिली.
समर्थांच्या स्त्री-सांप्रदायिक शिष्यांमध्ये उद्धवस्वामींच्या मातोश्री
अन्नपूर्णाबाई, आपाबाई, सरलाबाई, गंगाबाई, गोदाबाई, कृष्णाबाई अशा कितीतरी
स्त्री-शिष्यांची नावे सांगता येतील. समर्थांना माणसांची उत्तम जाण होती.
तसेच त्यांच्या ठिकाणी गुणग्राहकता होती. प्रत्येकातील गुणविशेषता लक्षात
घेऊन त्याच्या लायकीप्रमाणे समर्थ संप्रदायाचे काम देत असत. मग तो पुरूष
असो वा ती स्त्री असो. सर्व गुणवान शिष्यांत स्वामींनी कधी स्त्री-पुरूष
असा भेदभाव केला नाही. त्यामुळे संप्रदायात एखाद्या कुटुंबाप्रमाणे स्त्री
शिष्यवर्ग वावरत असे.
समर्थांसारखा
कुटुंबप्रमुख संप्रदायाची काळजी घेत होता, असे स्वामींनी शिष्यांना शिस्त
लावून दिली. सर्व स्त्री-शिष्यवर्गात चिमणाबाई आक्का आणि वेणाबाई या
बालविधवा होत्या. त्या अतिशय हुशार व धोरणी होत्या. गडावरील व्यवस्था
पाहण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडील असलेले प्रशासकीय कौशल्य
स्वामींनी ओळखले होते. त्यामुळे ते काम त्यांच्याकडे दिले गेले. समर्थ
असताना आणि समर्थांच्या निधनानंतर सुमारे ३७ वर्षे त्यांनी गडाची व्यवस्था
पाहिली. वेणाबाई यासुद्धा बालविधवा होत्या. वेणाबाईंच्या ठिकाणी अनेक
गुणविशेष होते. त्या उत्तम स्वयंपाक करीत. वेणाबाईंच्या विशेष पारमार्थिक
अधिकार ओळखून स्वामींनी सर्व स्त्री-शिष्यात त्यांना वेगळे स्थान दिले
होते. संप्रदायासाठी जे २० गुण सांगितले आहेत, त्यात ‘अर्थान्तर’ सांगणे,
याचा समावेश आहे. वेणाबाई हुशार व बुद्धिमान होत्या. ‘अर्थान्तर’ सांगण्यात
त्या कुशल होत्या. वेणाबाईंच्या ठिकाणी असलेल्या गुणांचा व त्यांच्या
व्यक्तिमत्त्वातील विशेष हा प्रस्तुत निबंधाचा विषय आहे. सर्वसाधारण
वाचकवर्गाचा कल निबंधापेक्षा ललितवाड्.मयाकडे अधिक असतो. ललितवाड्.मयातील
लालित्य व रंजकता सर्वसामान्य वाचकाला प्रिय असते. त्यामुळे असेल कदाचित,
आधुनिक लेखांनी वेणाबाईंचे जीवनचरित्र सांगण्यापेक्षा त्यांच्या जीवनावर
कादंबरी लिहिणे पसंत केले. कादंबरीकार संतचरित्रातील नाट्यमय प्रसंग ओळखून
त्याची कौशल्यपूर्ण मांडणी कादंबरीत करीत असतात. त्यावर भाषेचा साज चढवून
वाचकांच्या रंजकतेसाठी, भावउद्रेकासाठी लेखक लेखन करतात. तथापि संतांची
चरित्रे ही रंजकतेसाठी वाचायची नसतात. त्या चरित्रांतून जो प्रेरणादायी
पारमार्थिक संदेश मिळतो, त्यासाठी ती वाचायची असतात. संतांनी मोठ्या
कष्टाने अनुभूतीचा टप्पा ओलांडलेला असतो, ते मार्गदर्शन परमार्थ वाटचालीत
उपयोगी असते.
ऐतिहासिक,
पौराणिक व्यक्तींच्या जीवनावर कादंबरी लिहिताना लेखक कथानकात थोडे
स्वातंत्र्य घेतात. कादंबरीत मूळ नायक अथवा नायिकेबरोबर कल्पित पात्र व
प्रसंग निर्माण करून ललित लेखक आपल्या लेखनात नाट्य व रंजकता आणण्याचा
प्रयत्न करतात. पुस्तक वाचकानुकूल करावे, असा त्यांचा उद्देश असतो. त्याला
हरकत नाही, पण त्यातून मूळ पात्राच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला धक्का
लागणे उपयोगाचे नाही, याचे भान ठेवले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ११
वर्षांचे रामदास लग्नातून पळाले तेव्हा त्या नियोजित वधूवर काल्पनिक रंजक
कादंबर्या रचल्या गेल्या. त्या कादंबर्या लोकांना इतक्या खर्या वाटल्या
की, त्यासाठी वाचक रामदासांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून मोकळे झाले!
संतचरित्रावरील कादंबर्या वाचायला हरकत नाही, पण त्या तारतम्य ठेवून
वाचाव्यात. काही आधुनिक लेखकांनी समर्थशिष्या वेणाबाईंच्या जीवनावर कादंबरी
लेखन केले आहे. वेणाबाईंचे एकंदर आयुष्य, त्यांनी अनुभवलेले प्रसंग, मनाला
चटका लावणारे आहेत. वेणाबाईंचे एकंदर जीवनचरित्र व वाड्.मय अभ्यासण्याजोगे
आहे. बखरकारांनी श्री समर्थचरित्र सांगताना वेणाबाईंच्या कार्याचा उल्लेख
केला आहे. आत्माराम एक्केहाळीकर यांनी ‘दासविश्रामधाम’ या प्रचंड ग्रंथात
(ओवीसंख्या सुमारे १६,३००) रामदासस्वामींचे चरित्र व वाड्.मय कथन करताना
वेणाबाईंसंबंधीही माहिती दिली आहे. त्या ग्रंथातील संदर्भ देत समर्थ
अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी वेणाबाईंचे चरित्रकथन ‘मराठी वाड्.मयाचा
इतिहास-खंड ३’ रामदास खंड या ग्रंथात केले आहे. सच्छिष्याचे लक्षण सांगताना
समर्थ म्हणतात,
मुख्य सच्छिष्याचे लक्षण।
सद्गुरूवचनीं विश्वास पूर्ण।
अनन्यभावे शरण। त्या नाव सच्छिष्य।
वेणाबाईंनी स्वत:ला समर्थाचरणी वाहून घेतले होते, त्या खर्या अर्थाने समर्थशिष्या होत्या. त्या म्हणतात-
हृदयी धरिले सद्गुरूचरण।प्राणांतीही विसंबेना ॥
सुरेश जाखडी
7738778322
svjakhadi@gmail.com