सुहृदयी, भविष्यवेधी प्रवीण दरेकर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2021
Total Views |


davkghure_1  H


सर्वसामान्य कुटुंबात व्यतीत केलेले जीवन, विद्यार्थिदशेपासूनच चळवळीतील सहभाग, ‘मुंबई बँके’च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जाळे, राज्यभरातील जनतेशी आस्था अशा अनुभवाच्या संपन्न शिदोरीमुळेच प्रवीणजी यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळाले अन् गेल्या पावणेदोन वर्षांच्या काळात त्यांची भाषणे, मुद्दे आणि दौर्‍यांच्या माध्यमांतून महाराष्ट्राला एक समर्थ विरोधी पक्षनेता मिळाला आहे.




महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने विशिष्ट स्थान निर्माण करणार्‍या, लोकप्रिय व तळागाळाशी नाळ जोडलेल्या नेत्यांमध्ये प्रवीणजी दरेकर यांचा समावेश होतो, याचा अभिमान वाटतो. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वसाप गावामधून सुरू झालेला प्रवीणजी यांचा राजकीय प्रवास आता विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचला आहे. ‘मुंबई बँके’चे संचालक, अध्यक्ष, आमदार आणि आता पावणेदोन वर्षांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळात त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांबरोबर गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली. बँकेच्या माध्यमातून गरजूंना सेवा पुरविली. ‘कोविड’ आपत्तीच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दौरा करीत सरकारी यंत्रणेला उपाययोजना करण्यास भाग पाडले. विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रवीणजींनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधिमंडळाच्या अधिवेशनांचा कालावधी कमी करण्यात आला; अन्यथा प्रवीणजींचा झंझावात पाहावयास मिळाला असता.विधिमंडळाबरोबरच राज्यात दौर्‍यांवेळी जनतेची व्यथा मांडण्याचा त्यांचा भर आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, या भावनेतून त्यांचे कार्य सुरू आहे. जनतेला सुविधांबरोबरच राज्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे त्यांना काही आमदार प्रवीणजी दरेकर नाही, तर ‘प्रवीणजी Daredevil’ असे म्हणतात.


विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम करताना त्यांची सामान्यांप्रति असलेली तळमळ आम्ही पाहतो. स्वत: सामान्य कुटुंबातील असल्यामुळे कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रवीण दरेकर यांचा गुण लक्षणीय आहे. राज्यावर आलेल्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच, त्याचक्षणी सामान्यांचे अश्रू पुसण्याबरोबरच तात्पुरती मदत पोहोचविण्यासाठी प्रवीणजी यांची लगबग अनेक वेळा अनुभवायला मिळाली. यंदा महाड, चिपळूण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराबरोबरच गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळानंतरच्या दौर्‍यात त्यांच्यासमवेत सहभागी झालो होतो. त्यावेळी त्याचा प्रत्यय आला. मुंबईहून महाडमध्ये पोहोचण्यासाठी निघालो. मात्र, ठिकठिकाणी पुराचे पाणी होते. त्यातून मार्ग काढत आम्ही महाडजवळ पोहोचलो. मात्र, त्यावेळी एका पुलावरून पाण्याचे लोंढे जात होते. त्याचवेळी तेथे पुण्याहून महाडकडे निघालेली आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीमही पोहोचली. या टीमसोबतच आम्ही रात्री उशिरापर्यंत पाणी ओसरण्याची वाट पाहत बसलो. अखेर पहाटेच्या सुमारास पाणी कमी झाल्यानंतर आम्ही महाड-पोलादपूरकडे रवाना झालो.महाडला जात असतानाच प्रवीणजींना फोन आला. महाड तालुक्यातील तळीये येथे घरांवर दरड कोसळली असल्याची वार्ता समजली. ते क्षणातच अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने रायगड जिल्ह्यातील सरकारी यंत्रणांना माहिती कळविली अन् तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना केल्या. आम्ही सर्वप्रथम तळीयेकडे रवाना झालो. माजी मंत्री गिरीश महाजन, प्रवीणजी आणि मी घटनास्थळी मजल-दरमजल करीत पोहोचलो अन् कोणतीही सरकारी यंत्रणा पोहोचली नसल्याचे आढळल्यावर प्रवीणजींचा रौद्र अवतार पाहावयास मिळाला. तळीयेनंतर आम्ही पूरग्रस्त भागाकडे धाव घेतली. त्यावेळी तेथे त्यांच्या कार्याचा झपाटा पाहायला मिळाला. महाड-पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक गावात मदत पोहोचविण्याबरोबरच अडकलेल्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी आम्ही अखंड धावपळ करीत होतो. त्या पाच-सहा दिवसांत सकाळी उजाडल्यापासून रात्री अंधार पडेपर्यंत आम्ही तिघेही पूरग्रस्त भागाचे दौरे आणि अंधार पडल्यावर मदतीचे नियोजन, सरकारी अधिकारी, भाजपच्या स्वयंसेवकांबरोबर संवाद साधत होतो. तब्बल १८  ते २० तास ते कार्यमग्न होते. विशेषत: अपुर्‍या सरकारी यंत्रणेवर त्यांनी केलेले प्रहार गाजले. महाड-चिपळूण परिसरात ‘एनडीआरएफ’चा बेस कॅम्प उभारण्याची मागणी प्रवीणजी यांनी वर्षभरापूर्वीच केली होती. गेल्या वर्षी या भागाचा दौरा करताना भविष्यात आपत्ती आल्यास फटका बसण्याची त्यांना भीती होती. ती दुर्दैवाने यंदा खरी ठरली. प्रत्येक भागाचा दौरा करताना त्या परिसराची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन उपाययोजना व नियोजन करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची ही भविष्यवेधी नजर महाराष्ट्राच्या प्रगतीत भर घालणारी ठरेल, हा विश्वास वाटतो.



पूरग्रस्त भागाप्रमाणेच रायगड जिल्ह्याला ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा बसल्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी प्रवीणजी तत्काळ आपद्ग्रस्त भागात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मच्छीमार, बागायतदारांबरोबरच घराचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून, त्यांची व्यथा विधान परिषदेत परिणामकारक पद्धतीने मांडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार जागे झाले होते.विधान परिषदेच्या अधिवेशनावेळी कमी कालावधीत परिणामकारक मुद्दे मांडणे, हे प्रवीणजींचे वैशिष्ट्य. राज्यातील विविध भागातील प्रश्न, ते सोडविण्यावरील उपाय व अडचणी, सरकारी यंत्रणेकडून अपेक्षा, स्थानिकांचे मत आदींची माहिती घेऊन ते धसास लावण्याचा प्रयत्न करतात. एखादा प्रश्न मांडल्यानंतर आपली जबाबदारी संपली, असे ते मानत नाहीत. तर त्यावर काय निर्णय झाला, यावर बारकाईने लक्ष ठेवतात. राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींची माहिती घेतल्यावर त्याचे महाराष्ट्रावर होणार्‍या परिणामांबाबत उत्सुकता असते. त्यातून ते निवृत्त सनदी अधिकारी, तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तींकडून माहिती घेतल्यावर आपले मत निश्चित करतात. त्यानंतरच ते त्याबाबत भाष्य करतात. दौर्‍याच्या काळात ते गाडीतही काम करताना पाहावयास मिळतात.विधान परिषद वा सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त मी कधीही प्रवीणजी यांना चिडलेले पाहिले नाही. ते नेहमी संपर्कात आलेल्या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करून मनमोकळेपणाने चर्चा करतात. मात्र, विधान परिषदेत एखाद्या प्रश्नावरील चुकीचे उत्तर देण्यात आले किंवा सरकारी कामकाजातील ढिलाई व अनास्था पाहून ते एका क्षणात संतप्त होतात.





ठाणे आणि प्रवीण दरेकर यांचे एक अनोखे नाते. ‘कोविड’ आपत्तीच्या काळात त्यांचा दिवसाआड संपर्क होत असे. ठाण्यातील परिस्थिती, रुग्णसंख्या आणि हॉस्पिटलमधील स्थिती जाणून घेत. या काळात त्यांनी अनेक वेळा ठाण्याचा दौरा केला. रुग्णांबरोबरच ‘कोविड’ योद्ध्यांच्या अडचणींवर ते सतर्क होते. घोलाईनगर येथील दुर्घटनेच्या वेळीही महापालिकेच्या बेजबाबदार अधिकार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षावर संताप व्यक्त केला होता. मात्र, फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. कार्यक्षम अधिकार्‍यांच्या पाठिशी, तर बेजबाबदार यंत्रणेवर ‘आसूड’ ओढणारे प्रवीणजी आम्हाला पाहावयास मिळाले.प्रवीणजी हे दहा वर्षांपासून ‘मुंबई बँके’च्या चेअरमनपदी आहेत. त्यांच्या काळात ‘मुंबई बँके’ने भरारी घेतली असून, खासगी बँकेसारखा वेगवान कारभार सुरू आहे. प्रवीणजी यांच्यामुळेच बँकेच्या कारभारात सुधारणा झाली. त्यांचा सहकार क्षेत्राविषयी विशेष अभ्यास आहे. त्यांच्याशी चर्चा करताना अनेक वेळा त्याचे प्रत्यंतर आले. मला सहकार खात्याबाबत काही नियमांची माहिती हवी असल्यास, मला ते फोनवरच अवघ्या दोन मिनिटांत देतात. सहकार क्षेत्राचे कायदे त्यांना अगदी मुखोद्गत आहेत. प्रवीणजींनी विद्यार्थी चळवळीत काम केले. त्यामुळे महाविद्यालयातील प्रश्नांबाबत ते सजग आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांना आस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विधिमंडळात भेट असल्यावर शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यांबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारताना प्रवीणजी पाहावयास मिळतात.



सर्वसामान्य कुटुंबात व्यतीत केलेले जीवन, विद्यार्थिदशेपासूनच चळवळीतील सहभाग, ‘मुंबई बँके’च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जाळे, राज्यभरातील जनतेशी आस्था अशा अनुभवाच्या संपन्न शिदोरीमुळेच प्रवीणजी यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळाले अन् गेल्या पावणेदोन वर्षांच्या काळात त्यांची भाषणे, मुद्दे आणि दौर्‍यांच्या माध्यमांतून महाराष्ट्राला एक समर्थ विरोधी पक्षनेता मिळाला आहे. प्रवीणजी दरेकर यांना उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी व वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा.



- निरंजन डावखरे
(लेखक कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत.)






@@AUTHORINFO_V1@@