शिक्षक : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा शिल्पकार

    दिनांक  05-Sep-2020 00:03:18
|
Teachers day_1  ‘राष्ट्रशिक्षक’ अन् भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज, दि. ५ सप्टेंबर हा जन्म दिवस देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून भारत सरकारतर्फे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...


मानवी जीवनाला सुयोग्य आकार देण्यात आई-वडिलांसह शिक्षकांचे योगदानही महत्त्वाचे असते. पालकांनी आपल्या पाल्यांना संस्कारक्षम करावं, तर शिक्षकांनी त्यांना आदर्श नागरिक बनविण्याच्या दृष्टीने विद्यादान करावं, म्हणजे भावी पिढी बुद्धिमान अन् राष्ट्रप्रेमी होऊन देशाचे नाव विश्वात अजरामर करेल, हे निश्चित. आज देशात मोठ मोठे शास्त्रज्ञ, विचारवंत, कायदेपंडित, डॉक्टर, राजनेता, साहित्यिक, अभिनेता, चित्रकार, समाजसेवक, इंजिनिअर, सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहेच, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. शिक्षकामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात बुद्धिमत्ता असते की, तो बुद्धिमत्तेच्या बळावर ‘राष्ट्रपती’ या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो. त्याचे उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होय. ‘राष्ट्रशिक्षक’ अन् भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस देशात ’शिक्षक दिन’ म्हणून भारत सरकारतर्फे साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. राधाकृष्णन यांना भावपूर्ण आदरांजली आणि तमाम शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.


‘शिक्षण अन् तत्त्वज्ञान’ या क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल राधाकृष्णन यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करून केंद्र सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले. शिक्षकांनी शुद्धविचार, चारित्र्यसंपन्नता, संयमशीलता, निर्भयता व सदाचार या पंचसूत्रांची कास धरून विद्यार्जनाचे उत्तरदायित्व पार पाडावे, असा मोलाचा संदेश राधाकृष्णन यांनी अध्यापकांना दिला आहे. आचारविचारांना आत्मसात करून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा, हा त्यामागील राधाकृष्णन यांचा मूळ उद्देश होता. अशा महान राष्ट्रशिक्षकाला आमचे शतशः प्रणाम.


शिक्षकांनी या पंचसूत्रीचा अंगीकार करून तन-मन-धनाने आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सुयोग्य आकार द्यावा. भारताची भावी पिढी सर्वदृष्टीने सक्षम व बुद्धिमान व्हावी, यासाठी सरकारने शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त दुसरी ’अशैक्षणिक कामे’ (उदा. जनगणना, निवडणुकींची कामे आदी) देऊ नये, जेणेकरून ‘ते’ विद्यार्जनाचे कार्य पूर्ण क्षमतेने करू शकतील. आजचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे असल्याने शिक्षकवर्गाला माहिती-तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे, याचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने त्या दिशेने ठोस पावलं उचलावीत. सदर शिक्षण पद्धतीचे लोण खेडोपाडी पोहोचविण्यासाठी शासन यंत्रणेने प्राधान्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी आयटी शिक्षणात मागे पडणार नाही. यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, ज्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही साक्षरतेची प्रमाण वाढू शकेल.


शिक्षणाचे व्यापारीकरण थांबविण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठी ‘डोनेशन’ देण्या-घेण्यावर कडक निर्बंध असावेत. शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे पडू नये, याकरिता त्या त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात शिक्षक संख्याबळ असावे. विद्यार्थ्यांना आदर्श व संस्कारक्षम करावयाची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यांवर असते, याचा विचार करून शिक्षकांनी तंबाखू सेवन, धुम्रपान, मद्यपान या व्यसनांपासून कोसो दूर राहावे. कारण, ’मुलं’ ही अनुकरणप्रिय असतात, हे अध्यापकांनी लक्षात ठेवावे.


शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासह पर्यावरण, वृक्षारोपण, प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, जल-वायू-ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी काय दक्षता बाळगावी, प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी, घनकचर्‍याचे वर्गीकरण व त्यापासून सेंद्रिय खतांची निर्मिती, श्रमदान, व्यायाम व योगाभ्यासाचे फायदे आदी गोष्टींचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावे, जेणेकरून हीच मुलं-मुली पुढे मोठी झाल्यावर पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी होऊन वसुंधरेचं (पृथ्वीचं) रक्षण व संवर्धन करण्याच्या कामी स्वेच्छेने योगदान देण्यास पुढे येतील.

तात्पर्य, शिक्षक दिनी या महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकून, अध्यापक वर्गाला सचेत व सावध करणं अगत्याचे आहे. आज सार्‍या जगाला कोरोना महामारीने ग्रासले असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘लॉकडाऊन’ जाहीर करून शाळा महाविद्यालये बेमुदत बंद ठेवली आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खोळंबा होत आहे. सरकारने त्यावर उपाय म्हणून ‘ऑनलाईन एज्युकेशन’ही नवीन शिक्षण प्रणाली लागू केली आहे. परंतु, त्यामुळे पालकांना शिक्षण शुल्कासह लॅपटॉप, मोबाईल ही उपकरणे विकत घ्यावी लागत असल्याने त्यांच्यावरील खर्चाचे ओझे दुपटीने वाढले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात वाढता शैक्षणिक खर्च भागविणे पालकांना नाकीनऊ येत आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाल्याने शिक्षकांनाही यासंबंधी प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. तथापि, ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने,तेथील विद्यार्थी व शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यास्तव शिक्षक वर्गाला विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुठल्याही परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारला शहरी भागातील विद्यार्थ्यांसह ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे, हाच एकमेव पर्याय आहे. मित्रहो, भारतासह राज्यातील शिक्षक वर्ग कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे पालकांना काळजी करण्याचे कारण नाही.


बंधू-भगिनींनो, शिक्षक दिनी डॉ. राधाकृष्णन यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोर, धोंडो केशव कर्वे अशा थोर शिक्षकांचे स्मरण करणे अगत्याचे आहे. कारण, या शिक्षणमहर्षींनीदेखील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. दर्जेदार शिक्षण देणारा देश, अशी भारताची जगात प्रतिमा असावी, हे डॉ. राधाकृष्णन यांचे स्वप्न साकार करणे, म्हणजे हीच खरी शिक्षक दिन साजरा करण्याची फलश्रुती ठरेल. ‘विद्या विनयेन शोभते!


- रणवीर राजपूत


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.