मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय वंश, त्यांच्या साम्राज्यातल्या संकटांचा काळ, अहिंसा आणि शस्त्र या दोन परस्परविरोधी तत्त्वांतील संघर्ष या सार्याची गुंफण या नाटकात पाहायला मिळते.
स्वा.सावरकरांची लेखणी म्हणजे क्रांती, परंपरा, राष्ट्रभक्ती, इतिहास आणि वैचारिक स्पष्टतेचा संगम. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये केवळ भावनांची उधळण नाही, तर प्रत्येक शब्दामागे एक चैतन्यशील राष्ट्रभान आहे. त्यांच्या लेखनात प्राचीन भारतीय परंपरेची प्रतिष्ठा आणि आधुनिक राष्ट्रनिर्मितीची जाणीव यांचा समतोल दिसतो. त्यांनी इतिहासाचे पुनर्लेखन करताना, अनेकदा विजयी शत्रूंच्या नजरेतून लिहिलेला इतिहास पुन्हा भारतभूमीच्या नजरेतून उभा केला. त्यांचं साहित्य हे सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीचे जोखळदंड तोडण्याचं साधन ठरलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक द्रष्टे साहित्यिक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि तत्त्वचिंतक होते. त्यांची लेखणी ही तलवारीइतकीच धारदार आणि हिंदू संस्कृतीलाही अगदी कवेत सामावून घेणारी. ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे त्यांचं नाटकही या सर्व अंगांनी समृद्ध आहे.
पौराणिक आणि ऐतिहासिक वास्तवाला सांगीतिक स्वरूपात सादर करणं, ही मराठी नाट्यपरंपरेची ताकद. ‘संगीत संन्यस्त खड्ग’ ही त्याला अपवाद नाहीच. नाटकाचा मूळ गाभा आहे राष्ट्ररक्षणासाठी तलवार उपसावी की संयम, सहनशीलता, अहिंसा यांचा मार्ग स्वीकारावा. मग या प्रश्नाचा शोध घेताना हे नाटक मानवी भावभावनांचे अनेक पदर उलगडते. नाटकाच्या संगीतमयतेकडे पाहिलं, तर सुरांची ही तलवारही तितकीच धारदार आहे. ’शतजन्म शोधिताना’, ’मर्मबंधातली ठेव ही’ यांसारखी गाणी केवळ कानांना सुखावणारी नाहीत, तर मनात एक वेगळेच स्फुरण निर्माण करणारी आहेत. या गाण्यांमधून पात्रांच्या अंतर्मनातल्या वेदना, तडफड आणि आदर्शांना जागवण्याची शक्ती आहे. कौशल इनामदार यांच्या संगीत दिग्दर्शनाने या गाण्यांना आजच्या काळाशी जोडून ठेवलं आहे, तर पार्श्वसंगीताची सूक्ष्म नोंद अभिनयाला वेगळ्या उंचीवर नेते.
हृषिकेश जोशी यांनी नाट्यदिग्दर्शक म्हणून केलेली पुनर्रचना अत्यंत प्रभावी ठरते. मूळ पाच तासांच्या दीर्घ रचनेला संक्षिप्त करत, त्यांनी नाटक अडीच तासांमध्ये असं गुंफलं आहे की, प्रेक्षक क्षणभरही नजर हटवू शकत नाहीत. संक्षिप्ततेतून सुस्पष्टता आणि सुस्पष्टतेतून सौंदर्य हाच त्यांचा दृष्टिकोन म्हणता येईल. नेपथ्याचा साधेपणा, प्रकाशयोजनेचा नेमकेपणा आणि नृत्याचे सौंदर्य नाटकाला एक वेगळेच दृश्यमान प्रदान करतात.
‘संगीत संन्यस्त खड्ग’मधील गौतम बुद्ध हे पात्र शांततेचं प्रतीक असूनही, संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. सावरकरांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आदर राखूनही, त्यांच्या संन्यासाच्या निवडीवर विचारप्रवृत्त करणारा प्रश्न उपस्थित केला आहे, शांततेसाठी शस्त्र सोडणं योग्य की रक्षणासाठी तलवार उचलणं आवश्यक? बुद्ध या नाटकात मौनातही बोलतात आणि त्यांच्या शांततेतही संघर्षाचे प्रतिबिंब उमटतात. सावरकर बुद्धांचा विरोध करत नाहीत; त्यांच्या अहिंसेच्या मार्गाला प्रश्न विचारतात. नाटकातील बुद्ध केवळ शांततेचा उपदेश करत नाहीत, तर त्यांची निःशब्दता आणि संन्यास या दोन गोष्टी समाजाच्या रक्षणासमोरील कर्तव्यातील गोंधळ दाखवतात. त्यामुळेच हे पात्र प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतं. धर्म जर शांती साकारत असेल, पण त्या शांतीसाठी राष्ट्र, संस्कृती आणि समाजच गमावावा लागला, तर तो धर्म किती उपयुक्त?
कलाकारांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं, तर ओंकार कुलकर्णी, मयुरा रानडे, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि स्वयं दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या अभिनयात प्रगल्भता आणि सात्विकता ठायी ठायी दिसून येते. विशेषतः विक्रम, वल्लभ आणि सुलोचना यांची त्रिकोणी नाट्यमांडणी या नाटकातला भावनिक कोंडमारा अधिक तीव्रतेने समोर आणते. या पात्रांतून प्रेम, कर्तव्य आणि राष्ट्रहित यांचा संघर्ष वाचकाला अंतर्मुख करतो.
असे हे नाटक म्हणजे केवळ इतिहासकथनाची गोष्ट नाही, तर हे आहे आजच्या समाजालाही भिडणारं आत्मभान. आपल्या सांस्कृतिक मूल्यांना आजही किती सामर्थ्य आहे, हे नाटक दाखवून देते. तलवार आजही आवश्यक आहे का की ती शरण जावी शांतीच्या पायाशी, असा प्रश्न हे नाटक उभं करतं आणि त्या उत्तरांचा शोधाचा प्रवास प्रेक्षकांच्या मनात उभा राहतो. हे नाटक नव्याने रंगमंचावर येणं ही एक सांस्कृतिक पुनरुत्थानाची खूण आहे. सावरकरांसारख्या विचारवंत क्रांतिकारकाने लिहिलेलं हे नाटक, आजच्या तरुण पिढीसमोर भाष्य करतंय केवळ इतिहासाच्या गौरवगाथेवर नव्हे, तर भविष्याच्या वाटेवरही.
‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक केवळ गाण्यांनी सजलेलं नाही, तर भावनांच्या सूक्ष्म स्तरावर भिडणारं तत्त्वचिंतनही आहे. या नाटकात अभिनय ही केवळ संवादफेक नव्हे, तर आत्म्याचा आविष्कार आहे. प्रत्येक कलाकाराच्या हालचाली, देहबोली, नेत्राभिनय आणि मौनातली अर्थवाही उपस्थिती या सगळ्यांनी मिळून रंगमंचावर इतिहास जिवंत होतो.
‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक म्हणजे, कलाविष्कारातून प्रकटलेली वैचारिक क्रांती आहे. जिथे गाणी फक्त ऐकली जात नाहीत, ती अंतःकरणावर अक्षरश: कोरली जातात. जिथे नाट्य केवळ रंगमंचावर साकारत नाही, तर अंतर्मनात निर्माण होतं. हृदयस्पर्शी गीतरचना, दर्जेदार अभिनय आणि तात्त्विक खोली यांमुळे हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक अमूल्य खजिना ठरते. आजच्या धावत्या काळात, अडीच तास ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पाहणं म्हणजे केवळ एक सांस्कृतिक अनुभव नाही, तर आत्म्याच्या गाभ्याशी साधलेली नाळ आहे, जी विचार, शब्द आणि सुरांच्या तलवारीतून आपल्याशी बोलते.
रंगावृत्ती आणि दिग्दर्शक : हृषिकेश जोशी
निर्माते : रवींद्र माधव साठे
सहनिर्माते : अनंत वसंत पणशीकर
पार्श्वसंगीत : कौशल इनामदार
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाशयोजना : अमोघ फडके
नृत्य : सोनिया परचुरे
वेशभूषा : मयुरा रानडे
सूत्रधार : दीपक गोडबोले
कलाकार : ओमप्रकाश शिंदे, मयुरा रानडे, केतकी चैतन्य, ऋत्विज कुलकर्णी, श्रीराम लोखंडे, गौरव निमकर, प्रद्युम्न गायकवाड, शंतनू अंबडेकर, परमेश्वर गुट्टे, निरंजन जाविर, आशिष वझे, ओंकार कुळकर्णी आणि हृषिकेश जोशी