खरे मृत कोण? उत्खननातले सांगाडे की युरोपीय मानववंशशास्त्रज्ञ?

    05-Sep-2020
Total Views | 160

ARYAN_1  H x W:


यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण 'Linguistics' अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेच्या दृष्टिकोनातून आर्यांचे स्थलांतर किंवा आक्रमणाच्या संदर्भात विचार केला. पण, त्यातही आर्य स्थलांतराच्या बाजूने निर्विवादपणे कुठलाच पुरावा सापडलेला नाही. या ज्ञानशाखेद्वारे जी वैचारिक मांडणी यात करण्यात आली, त्याच्याच जोडीने अजून एक शब्द युरोपीय विद्वानांनी अतिशय यशस्वीपणे पेरून दिला, तो म्हणजे ‘आर्यवंश.’ दोन अमेरिकन विद्यापीठांच्या पुरस्काराने चालवण्यात आलेल्या, परंतु मूळ भारतीयच असलेल्या एका संस्कृत-इंग्रजी शब्दकोशात ‘आर्य’ शब्दाच्या नोंदीत ‘वंशवाचक’ अर्थ कशा पद्धतीने घुसडून देण्यात आला, ते सुद्धा आपण मागे एका लेखात पाहिले. या वंशवाचक अर्थात सुद्धा कितपत तथ्य आहे, ते जरा स्वतंत्रपणे पाहणे गरजेचे आहे. त्याचा विचार या आणि आगामी काही लेखांमध्ये करूया.



भाषाशास्त्रीय तर्काला कवटीचा धक्का


डॉ. पॉल ब्रोका (१८२४-१८८०) या एका फ्रेंच डॉक्टरचे शरीरशास्त्रातले बरेच संशोधन प्रसिद्ध आहे. त्याच्या हयातीत युरोपातले भाषाशास्त्रीय संशोधन भराला आले होते. त्या प्रभावातून त्याने मानवी मेंदू आणि भाषा यांच्या संबंधाचा सखोल अभ्यास केला. मानवी हाडांच्या मोजमापांवरून त्यांची विविध वंशांमध्ये विभागणी करण्याचे त्याचे जसे संशोधन आहे, तसेच भाषा आणि बोलण्याच्या नियंत्रणाचे मानवी मेंदूमधले केंद्र शोधून काढण्याचे संशोधनसुद्धा त्याच्याच नावावर आहे. मेंदूत कपाळाच्या डावीकडे असलेल्या या केंद्राला त्याच्या सन्मानार्थ ‘ब्रोका केंद्र’ (Broca's Area) असे नाव दिले गेले आहे. त्याचे एकूणच असे मत बनले होते की, मानवाच्या विविध वंशांची म्हणून जी वैशिष्ट्ये सांगता येतात, ती भाषाविषयक नसून मुख्यत: शरीराच्या रचनेशी निगडित असतात. नवाश्मयुगीन (Neolithic Age) लोकांची भाषा कशी असेल, हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही.... असे सांगताना तो ‘इंडो-युरोपीय-पूर्व’ (Proto-Indo-European PIE) भाषेच्या थोतांडाचे जे पाठीराखे आहेत, त्यांना एका अर्थाने घरचा आहेरच देतो. पुढे तो म्हणतो, “....परंतु, या लोकांची शारीरिक वैशिष्ट्ये कशी असतील, हे मात्र आपण नक्की सांगू शकतो. कारण, तसे मुबलक आणि निर्णायक पुरावे उपलब्ध आहेत. मानवी कवटीची मोजमापे हे वंशाची माहिती सांगण्यासाठी अगदी अचूक असे साधन आहे.” ‘आर्य’ नावाचा एक ‘वंश’ होता, असे भाषाशास्त्राच्या आधारे मानणार्‍या समकालीन युरोपीय विद्वानांना अशा पद्धतीने ब्रोकाने सरळसरळ प्रत्युत्तर दिले, ते ही पुराव्यांच्या आधारावर!

हाडांची मोजमापे आणि वंश


ब्रोकाचा समकालीन असलेला ‘चार्ल्स डार्विन’ आपल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताची मांडणी करताना म्हणत असे की, जगातले सगळे मनुष्यप्राणी अगदी प्राचीन काळात कधीतरी एकाच प्राण्यापासून तयार झालेले असावेत. त्यातूनच पुढे माणसांचे वेगवेगळे वंश तयार होत गेले. मानववंशाची एकूणच सुरुवात आफ्रिकेतून झाल्याचा आणि त्यानंतर ते पुढे जगात इतरत्र पसरल्याचा जो एक सिद्धांत ('Out of Africa' Theory) काही विद्वानांमध्ये दिसतो, त्याच्या पुष्टीसाठी ते डार्विनच्या या सिद्धांताकडे बोट दाखवतात. याउलट ब्रोकाने मात्र या गृहीतकाचा सातत्याने विरोध केला. त्याच्या मतानुसार, मानवाचे असे वेगवेगळे वंश मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात असलेले दिसतात. त्यांचा सर्वांचा पूर्वज एकच असल्याची कसलीच चिह्ने दिसत नाहीत. हे सांगताना त्याने तत्कालीन युरोपीय मानववंशशास्त्रज्ञांची नाराजीच ओढवून घेतली. ब्रोकाने आपले म्हणणे अधिक तपशीलात जाऊन मांडले. त्यासाठी त्याने मानवी कवटीच्या मोजमापांचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढला की, मानवी मस्तकाची रुंदी आणि लांबी यांचे गुणोत्तर त्या माणसाच्या ‘वंशाचा’ निर्देश करते. ब्रोकाने दाखवून दिलेल्या या गुणोत्तरावर पुढच्या काळात अजून संशोधन होऊन त्याचा एक ‘मस्तक निर्देशांक’ (Cephalic Index) बनला. हे गुणोत्तर किंवा निर्देशांक जगभरात सुमारे पन्नास ते नव्वद अशा पल्ल्याचे आढळून येतात. कृष्णवर्णीय वंशाच्या (Negroid) लोकांमध्ये हा निर्देशांक ५० ते ७५ इतका कमी आढळतो. अर्थात, त्यांचे मस्तक कमी रुंद आणि जास्त लांब आढळते. या लंबशीर्ष लोकांना ‘डोलिकोसेफालिक’ (Dolichocephalic) असे जैविक मानववंशशास्त्रात (Physical Anthropology) नावच आहे. याउलट पीतवर्णीय वंशाच्या (Mongoloid) लोकांमध्ये हा निर्देशांक 83 हून अधिक मोठा असलेला आढळतो. अर्थात त्यांचे मस्तक जास्त रुंद आणि सुमारे तितकेच लांब आढळते. या रुंद डोक्याच्या लोकांना ‘ब्रॅशिसेफालिक’ (Brachycephalic) असे नाव आहे. गौरवर्णीय वंशाच्या (Caucasoid / Europid) लोकांचा मस्तक निर्देशांक या इतर दोन वंशांच्या दरम्यान म्हणजे सुमारे ७५ ते ८३पर्यंत असलेला आढळतो. या लोकांना ‘ऑर्थोसेफालिक’ (Orthocephalic) असे नाव आहे. अशा तीन प्रमुख वंशांची वैशिष्ट्ये कवटीत दिसतात.



मांडीचे हाड आणि गुडघ्याच्या खालचे हाड यांच्या लांबीचे गुणोत्तर सुद्धा वंशाचे निदर्शक ठरते, असाही एक निष्कर्ष ब्रोकाने काढला होता. याखेरीज ‘कवटीचा (किंवा चेहर्‍याचा) कोन’ हे सुद्धा असेच अजून एक वैशिष्ट्य म्हणून सांगितले जाते. यामध्ये मस्तकाच्या पातळीच्या तुलनेत जबडा किती पुढे आलेला आहे, तो कोन विचारात घेतला जातो. यातही असे तीन प्रमुख प्रकार या तीन वंशांचे म्हणून सांगता येतात. पुढच्या काळात डोळ्याच्या खोबणीचा सुद्धा असाच एक निर्देशांक ठरवला गेला. तो सुद्धा वंशनिदर्शक ठरला. केसाच्या काटछेदाचा (Cross Section) सुद्धा एक निर्देशांक लक्षात आला. हे सगळे संशोधन ब्रोकाने केलेल्या अभ्यासावर आणि त्यातल्या नोंदींवर उभे राहिलेले आहे.वर उल्लेख केलेल्या वंशांपैकी अशा मधल्या प्रकारात मोडणारे जे Caucasoid वंशांचे लोक आहेत, त्यातही हे शास्त्र अनेक उपप्रकार मानते. त्यात युरोप, पश्चिम आशिया, मध्य आशिया, दक्षिण आशिया, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका, अशा नावांनी हे उपप्रकार ओळखले जातात. भारतीय लोकांत यापैकी दक्षिण आशियन प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात, असे या शास्त्राचे अभ्यासक मानतात.



मग यात आर्यांचा काय संबंध?


मोहेंजोदरो, हडप्पा आणि सिंधूच्या खोर्‍यात विविध ठिकाणी जी उत्खनने झाली, त्यात असंख्य मानवी सांगाडे मिळालेले आहेत. युरोपीय संशोधकांच्या मतानुसार - ते सगळे तत्कालीन मूलनिवासी लोकांचे आहेत. त्यांना परकीय आगंतुक आर्यांनी मारले आणि त्यामुळे उरलेल्या मूलनिवासींना तिथून निघून जावे लागले. ते लोक दक्षिण भारतात येऊन स्थायिक झाले. आज ते ‘द्रविड’ म्हणून ओळखले जातात. आजचे उत्तर भारतातले लोक हे मूळचे युरोप आणि मध्य आशियाच्या परिसरातून आलेले परकीय आर्य लोक आहेत. या सगळ्या गृहीतकात एक गोष्ट सोयीस्करपणे विसरली जाते. वर वर्णन केलेली वंशवाचक वैशिष्ट्ये जशी आजच्या विद्यमान उत्तर भारतीय लोकांच्या शरीररचनेत दिसतात, तशीच ती त्या सांगाड्यांवरही दिसतात. युरोप किंवा मध्य आशियन वंशाच्या लोकांसारखी दिसत नाहीत. अर्थात, उत्खननात सापडलेले मृतदेह आणि आजचे सिंधूच्या खोर्‍यात अथवा उत्तर भारतात राहणारे लोक हे सर्व एकाच वंशाचे असलेले दिसतात. या मृतदेहांपैकी अनेक मृतदेह तर अनेक सहस्रकांपूर्वीचे आढळून आलेले आहेत. अर्थात, आजच्या उत्तर भारतीय लोकांचे पूर्वज किमान तितकीच सहस्रके तरी उत्तर भारतातच राहत आलेले आहेत, कुणी मध्य आशिया किंवा युरोपातून आलेले नव्हेत. जमिनीतून उकरून वर काढलेले ते मृतदेह ओरडून ओरडून हे सत्य जगाला सांगत आहेत. पण, या पाश्चिमात्य विद्वानांना आणि त्यांच्या प्रत्येक अभिव्यक्तीवर माना डोलावणार्‍या त्यांच्या भारतीय अनुयायांना मात्र ही ओरड अजिबातच ऐकू येत नाहीये. कशामुळे बरे? शहामृगाप्रमाणे त्यांनी आपली डोकी वाळूत खुपसल्यामुळे? की आपली अस्मिता आणि आत्मगौरव दुसर्‍या कुणाला विकल्यामुळे? की मेलेल्याहूनही मुर्दाड मनाचे झाल्यामुळे?



- वासुदेव बिडवे
(क्रमश:)
vkbidve@gmail.com
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121