भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिर!

    दिनांक  04-Aug-2020 23:53:36
|


ram mandoir_1  भारतात श्रीराम मंदिराच्या उभारणीचा शुभारंभ होणे म्हणजे भारताची अस्मिता आणि स्वाभिमानाची पुनर्स्थापना आहे. त्यामुळे अनेक शतकांपासून आक्रमकांनी दमन केलेल्या हिंदू भावनेचा आणि राष्ट्रभक्तीचा अखेर विजय झाला आहे. “रामजन्मभूमीविषयी बहुसंख्याक हिंदू समाजाच्या भावना किती घट्ट आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९२ साली संसदेत केले होते. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक गिरीलाल जैन म्हणाले होते की, “गेल्या २०० वर्षांपासून हिंदू समाज ज्याचे पुनरुत्थान करण्यासाठी प्रयत्न करीत होता, त्याची परिणती म्हणजे रामजन्मभूमी आंदोलन होय.” त्याचप्रमाणे परजमपूज्य देवरहा बाबा ठामपणे म्हणाले होते की, “प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहणार यात कोणतीही शंका नाही.” आज त्यांचे म्हणणे खरे ठरले आहे. पूज्य बाळासाहेब देवरस ९ नोव्हेंबर, १९८९ साली श्रीरामजन्मभूमीस्थळी झालेल्या शिलान्यासप्रसंगी म्हणाले होते की, “मंदिर उभारणीचे कार्य हे सांप्रदायिक नसून रामराज्याच्या स्थापनेची ती सुरुवात आहेगेल्या २०० वर्षांमध्ये संपूर्ण जगात एवढे मोठे आंदोलन झालेले नाही आणि या ऐतिहासिक आंदोलनाचे प्रणेते होते अशोक सिंघल. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी हेच त्याचे जीवनध्येय होते. आज अशोकजी हयात असते, तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. महंत रामचंद्र परमहंस दास हे १९४३ ते जीवनाच्या अखेरपर्यंत रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय होते. त्यांच्या प्रयत्नांनीच रामजन्मभूमी न्यासाची स्थापना झाली होती. सीतामढी ते अयोध्या अशी राम-जानकी रथयात्रादेखील त्यांनीच सुरू केली होती. अयोध्या आंदोलनात प्राण फुंकण्याचे काम मोरोपंत पिंगळे यांनी केले. श्रीराम शिलापूजन करण्याची कल्पना त्यांचीच होती. पी. व्ही. नरसिंहराव यांनी आंदोलनाचे अग्रदूत उडपीचे पेजावर स्वामी रामतीर्थ यांना अयोध्येतील विवादित ढाँच्यापासून २० फूट अंतरावर राम मंदिर उभारणीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, स्वामींनी तो प्रस्ताव नाकारला होता. रामजन्मभूमी मुक्ती समितीचे पहिले अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचेही योगदान अनन्यसाधारण होते. “भारतीय संस्कृतीसाठी राम मंदिर अत्यंत गरजेचे आहे,” असे स्वामी परमानंद सांगत असत. त्यांनी मुस्लीम समाजाला अनेकदा आवाहनही केले होते की, त्यांनी सहमतीच्या आधारावर रामजन्मभूमीचा ताबा हिंदूंकडे द्यावा. आपल्या कार्यकाळात नरसिंहराव यांनी संतसमुदायामध्ये मतभेद निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी ते प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर शंकराचार्यांच्या आशीर्वादानेच आंदोलन आणखी भक्कम झाले होते.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दाऊ दयाल खन्ना यांनी यांनी ६ मार्च, १९८३ साली मुझफ्फरनगरच्या संमेलनात अयोध्या-मथुरा-काशीमुक्तीचा प्रश्न सर्वप्रथम ऐरणीवर आणला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच हा मुद्दा सार्वजनिक व्यासपीठावर पुढे आणला गेला होता. त्याचप्रमाणे धर्माचार्य महंत नृत्यगोपालदास आंदोलनातील नायकाच्या भूमिकेत होते. त्याचप्रमाणे ज्योतिषपीठाचे प्रमुख शंकरायचार्य वासुदेवानंद सरस्वती, नानाजी देशमुख, शेषाद्री, श्रीचंद दीक्षित, विष्णुहरी डालमिया यांचेही नेतृत्व आंदोलनात यशस्वी करण्यात महत्त्वाचे ठरले. आंदोलनाच्या कालखंडात अशोक सिंघल, आचार्य गिरीराज किशोर, आचार्य धर्मेंद्र, लालकृष्ण अडवाणी, सिकंदर बख्त, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, उमा भारती यांच्या ओजस्वी भाषणांनी देशात अभूतपूर्व ‘रामज्वर’ निर्माण झाला होता. अनेक शतकांपासून अत्याचार सहन करणारी जनता आपले दु:ख बाजूला सारून हनुमानाप्रमाणे रामासाठी हुंकार भरला आणि मैदानात उतरले, त्याचे परिणाम आज आपल्यासमोर आहेत. जवळपास ४९२ वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर आज, दि. ५ ऑगस्ट, २०२० साली अखेर भव्य राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ होत असून देवराहा बाबांचे भाकितही सत्य ठरणार आहे.
 
न्यायालयात प्रभू श्रीराम स्वत: गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयात अखेर श्रीरामाचा विजय झाला. त्यामुळे रामाचे पक्षकार आणि रामाचे विरोधी यांचे खरे स्वरूप सर्वांसमोर आले. देशातील मार्क्सवादी खोट्या इतिहासकारांचेही ढोंग उघडकीस आले. त्याचप्रमाणे भारतातील अनेक राजकीय नेत्यांचाही रामद्रोह सर्वांसमोर आला. काही लोक म्हणाले की, राम काल्पनिक आहे, तर काहींनी रामसेतू उद्ध्वस्त करण्याचा अथक प्रयत्न केला. कोणाला अयोध्या दिसत नव्हती, तर कोणाला रामजन्मभूमी आणि राममंदिर दिसत नसे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मस्थान म्हणून केवळ रामकोटचाच दावा मान्य केला नाही, तर श्रीराम मंदिरासह संपूर्ण अयोध्येस श्रीराम तीर्थक्षेत्राच्या रुपात विकसित करण्याचे आदेश दिले. सरकारला तीन महिन्यांच्या आत ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीसाठी योजना तयार करण्याचे आणि उभारणी प्रारंभ करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाचे पालन करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी रामजन्मभूमीस्थळी भूमिपूजन करणार आहेत. न्यायालयीन आदेशानुसार आता मंदिर उभारणीची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.
 
संतसमुदाच्या सल्ल्याननुसार आता मंदिराचा नकाशा आणखी भव्य करण्यात आला आहे. प्रथम मंदिरात तीन शिखरांची योजना होती. मात्र, पूज्य शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यासह अनेक संतांनी मंदिरात भव्य स्वरूप देण्याची मागणी केली. ट्रस्टने ती मागणी मान्य केली. आता मंदिरासोबतच गोशाळा, वेदशाळा, यज्ञशाळा, मंदिर स्मारकदेखील उभारण्यात येणार आहे. वैभवशाली रामराज्याच्या संकल्पनेप्रमाणे संपूर्ण नगरीस रामतीर्थाच्या रूपात विकसित केले जाणार आहे. अयोध्येत जागतिक स्तरावरील सर्व सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने त्वरित निर्णय घेतले आहेत. आता अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ, जागतिक स्तराचे रेल्वे स्थानक, बस स्थानक यासह अनेक विकासकामांना प्रारंभ झाला आहे. ही सर्व कामे येत्या तीन ते चार वर्षांत पूर्ण होतील. मंदिर आणि तीर्थक्षेत्र उभारणी हे एकाच वेळी पूर्णत्वास येतील. रामल्ला त्यांच्या जन्मस्थानी उभारलेल्या मंदिरात विराजमान झाल्याची शेकडो वर्षांपासूनची हिंदू समाजाची इच्छा आता पूर्ण होणार आहे, याचे समाधान वाटते.
 

- विजय शंकर तिवारी
 
(लेखक ‘हिंदू विश्व’चे संपादक असून ‘विश्व हिंदू परिषदे’चे प्रवक्ता आहेत.)
 
(अनुवाद : पार्थ कपोले)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.