'कोरोना’ने खूप काही शिकवले...

    दिनांक  04-Jun-2020 22:51:22
|


corona nature_1 &nbs


कोरोनाचे संकट हे खूप काही शिकवणार असून यातून वेळोवेळी खूप काही बदल होणार आहे. जसे आपण स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करतो, त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालचा निसर्ग अबाधित राहण्यासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे.आपण सारे आहोत ‘लॉकडाऊन’वासी.. गेल्या दोन महिन्यांपासून फक्त रुग्णांची संख्या मोजणारे. सगळी माध्यमे, सोशल मीडिया जिकडे तिकडे चहुकडे कोरोना... कोरोना... आणि फक्त कोरोना... बरं तो डोळ्याने तर दिसत नाही इतका सूक्ष्म, पण त्याचा प्रताप इतका मोठा की, त्याने जगाला वेठीस धरलं. ‘मी मी’ म्हणणार्‍या महासत्ता अगदी लोळागोळा झाल्या. ‘आम्ही नाही भीत’ म्हणणारे महाभाग कोरोना प्रतिबंधाचे औषध घेऊ लागले. मग सकाळी गरम पाणी तुळस टाकून, लिंबूपाणी, व्हिटॅमिन सी, ई असे बरेच काही. संगणकाच्या सगळ्या साईटवर हा भडिमार. कोरोना कसा होऊ शकतो, कसा नाही, त्यापासून बचाव कसा करायचा, कोणता प्राणायाम, कपालभाती योग्य, पाणी तेही गरम किती वेळा प्यायचे इथपासून लसूण, दालचिनी, गवती चहा, मध ते होमियोपॅथी औषधांपर्यंत सगळं सांगणारे घरगुती डॉक्टर सगळीकडे दिसू लागले आहेत. काल-परवापर्यंत भेटीसाठी आसुसलेले सगळे जण तोंड फिरवू लागले आहेत. हातात हात मिळवणे तर दूर, ‘तू दोन महिने फोनवर किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा फेसबुकवर अगदी गेला बाजार इन्स्टाग्राम, ट्विटरवर, अगदी नाही जमले तर तुझा निरोप नाही म्हणजे तू ठीक आहेस,’ असे समजेन इथपर्यंत अथांग माणुसकीचे दर्शन सगळीकडे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पूर्वी गावी मनिऑर्डर पाठवणारे आज गावी नकोसे झालेत. ‘शहरातच राहा, गावाकडे नको रे बाबा तुझी ब्याद.’ असे सगळे सामाजिक चित्र आज पाहायला मिळत आहे. काल-परवापर्यंत हवाहवासा वाटणारा प्रत्येकजण आज नको नकोसा झालाय. ही किमया कोणाची मायक्रॉनमध्ये अस्तित्व असलेल्या एका विषाणूची.
 
पूर्वी एक कथा नेहमी सांगितली जायची की, मुंगीला लहान समजू नका ती जेव्हा हत्तीच्या कानात जाते, तेव्हा बलाढ्य हत्ती पण कासावीस होतो. इथे तर मुंगीपेक्षा हजारो पट लहान मृत विषाणू नाकात, डोळ्यात जातो काय आणि जिवंत होऊन हैदोस घालतो काय. मग आपण या परिस्थितीवर काय म्हणतो, ‘आता काही खरं नाही, माणसाचा काही भरवसा नाही, आज आहे तर उद्या नाही, हे असेच चालायचं, जातील तितके दिवस आपले, उद्याचं कोणी बघितले, काळ क सा झपाट्याने बदलतोय...’ असे म्हणत हातात असलेला कागदाचा बोळा रस्त्यावर किंवा तोंडातील पिचकारी धरतीमातेच्या अंगावर, अगदीच सज्जन असू तर देवाच्या फुलांचे निर्माल्य प्लास्टिक पिशवीतून निर्मल नदीत, स्वच्छ तळ्यात टाकून दिले की आपला कार्यभाग संपला आणि देव पावला असे समजायचे. पण, या सर्व वर्तमानाचा विचार केला तर माणूस म्हणून आपण या निसर्गाची किती वाताहत केली आहे, याचे तिळमात्र दुःख आपल्या चेहर्‍यावर नसते. आपण प्रत्येक जण स्वतःला खूप सज्जन, निर्मल, परोपकारी, नि:स्वार्थी वगैरे समजत स्वतःची खोटी समजूत काढत असतो.
 
पण, गेल्या किमान पाच दशकांचा आढावा घेतला, तर आपल्याला निश्चित समजून येईल की, या बदलत्या ऋतुचक्राला, हवामानाला माणूसच जबाबदार आहे. विकासाच्या हव्यासापोटी तंत्रज्ञानाची प्रगती करत वैज्ञानिक संशोधनाने आपण मस्त वाहत गेलो. मानव हाच सर्वश्रेष्ठ असे समजू लागलो. विकासासाठी वृक्षांची तोड, प्रगतीचा वेग साधण्यासाठी नैसर्गिक संसाधनाची अमर्याद लूट, शहरांच्या विकासासाठी जंगलांची कत्तल, स्वच्छंदी, गोड पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत यांचे प्रदूषण आणि प्रचंड उत्साहाच्या नादात वर्षभरातील सणउत्सवात जमेल तितके जास्त प्रदूषण हेच आमचे ध्येय झाले आहे. शहरात राहणार तो मोठा आणि गावाकडचा छोटा, असे सूत्र मात्र कोरोनाने उलटे केले आहे. आज शहरातील कर्तेकरविते महापुरुष जीव मुठीत घेऊन गावाकडे पळतात. कोरोनाला चुकवण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आता गावाकडचा निसर्ग आठवतोय सर्वांना. कुठे गेला आवडणारा शहरातील झगमगाट, गुळगुळीत डांबरी रस्ते, मेट्रो, ट्रेन, चवदार हॉटेल्स, हे तर गावाकडे काहीच नाही. कालपर्यंत मागास गाव आज राजेशाही वाटू लागले आहे. तिथली शेते स्वर्ग वाटू लागली आहेत. ‘काय आहे त्या गावाकडे, एक-दोन दिवस ठीक आहे,’ म्हणणारे आज ‘काययचे गावाला जाऊ, अर्धी भाकर खाऊ,’ असे म्हणू लागले आहेत.
 
आपल्याला आठवत का महात्मा गांधी म्हणाले होते की, ‘खेड्याकडे चला.’ कारण, जर खेडी स्वयंपूर्ण झाली तर शहरांकडे जाणारे लोंढे वाढणार नाहीत. आज पुन्हा एकदा लोकांचे स्थलांतर शहराकडून खेड्याकडे सुरु झाले आहे. शहरामध्ये पोटापाण्याच्या गरजेपोटी कुंठित जीवन जगणारी माणसे गावाला महत्त्व देऊ लागली आहेत. हे स्थित्यंतर केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातही आढळून आले आहे. आज भारताप्रमाणे अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’करीत आहेत. गुगलसारख्या नामांकित कंपन्यांनी २०२१ सालापर्यंत त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. एकीकडे संगणकीय क्रांतीने सारे जग बोटाच्या कळेवर सामावले आहे असे म्हणायचे आणि प्रचंड वाहतूककोंडीशी सामना करत ऑफिस गाठायचे याची कोणतीही गरज नाही, याचे नवे भान कोरोनाने दिले आहे. जगातील आयटी कंपन्यातील पाच कोटींपेक्षा जास्त लोक आता ‘वर्क फ्रॉम होम’करणार आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात राहणारे हे नागरिक आपल्या कुटुंबासहित गावाकडे जाऊन काम करण्याचे धोरण पाश्चिमात्य देशात अवलंबत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा कार्यालयीन खर्च, कार्यालयीन भाडे, वीजबिल, हाऊसकीपींग स्टाफ यांचा ३० टक्के खर्च वाचणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील एकूणच जीवनशैली ही कोरोनापश्चात खूपच बदलणार आहे. कोरोनाचे संकट हे खूप काही शिकवणार असून यातून वेळोवेळी खूप काही बदल होणार आहे. जसे आपण स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करतो, त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालचा निसर्ग अबाधित राहण्यासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे. पृथ्वीवर मानव हा जैवसाखळीतील प्रमुख घटक आहे. म्हणूनच त्याने बुद्धीच्या जोरावर प्रगती केली, पण निसर्गाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले. कोरोनाच्या साथीने माणसाचे खुजेपण दिसून आले आहे. आणि निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे, हे कोरोना संकट टळून गेल्यावर विसरता कामा नये. इतकेच नव्हे तर या पुढील जीवन गरजेपुरतीच साठवणूक आणि निसर्ग, प्राणिमात्रांठायी प्रेम व्यक्त करणारे असावे इतकीच सदिच्छा!
 
 

- संजय भुस्कुटे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.