गंदा है पर धंदा है! (पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020
Total Views |


OTT_1  H x W: 0


दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिच्या विरुद्ध तिच्या एका वेबसिरीजमधून भारतीय जवानांचा अपमान केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा वेबसिरीज आणि त्यामधल्या कथानकांची चर्चा ऐरणीवर आली आहे.


गेल्या पाच-सहा वर्षांत भारतीय मनोरंजन क्षेत्राची समीकरण पार बदलून गेली आहेत. नेटफिल्क्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांसारख्या OTT Platforms (Over The Top Media Service) चा प्रेक्षकवर्ग दिवसगणिक वाढतोय. याघडीला एकूण ४० ओटीटी प्लॅटफॉर्म्स भारतात कार्यरत आहेत. ‘केपीएमजी’ या आर्थिक संस्थेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये २१.५ अब्ज (२१५० करोड) इतकी एकूण ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मनोरंजन क्षेत्रात उलाढाल होती. २०१९ अखेरीस हीच उलाढाल वाढून जवळपास ३५ अब्ज (३५०० करोड) एवढी वाढली आहे. केपीएमजी मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट रिर्पोट २०१८च्या अहवालानुसार, ओटीटी मार्केटची वाढ हि साधारणतः ४५ टक्क्यांच्या आसपास असून, याच वेगाने २०२३च्या अखेरीस ओटीटी प्लॅटफॉम्सची उलाढाल १३८ अब्ज इतकी होईल. Ernst Youngच्या एका अहवालानुसार ओटीटी प्लॅटफॉर्म्सची एकूण प्रेक्षक संख्या २०२०च्या अखेरीस ५०० दशलक्ष इतकी होईल, ज्याने भारत देश हा सर्व जागतिक ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी जगातील अमेरिकेनंतरची दुसरी मोठी बाजारपेठ होईल. 
 

साधारण २०१८च्या सुरुवातीपासून नेटफिल्क्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसारख्या कंपन्यांनी भारतीय प्रादेशिक विषयावर आधारित असणार्‍या कथानकांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरु केली. एकाच धाटणीच्या मालिका/चित्रपट बघून कंटाळलेला प्रेक्षकवर्ग वेबसिरीजच्या स्वछंद आणि याच्या सो-कॉल्ड वास्तवादी शैलीकडे झपाट्याने आकर्षित झाला. लिव्ह-इन-रिलेशनशिप, समलैंगिक प्रेम कहाण्या, गुन्हेगारी कहाण्यांचे वास्तववादी चित्रण (खरतर याच्या नावाखाली गुन्हेगारांचे उदात्तीकरण) यासारख्या विषयांना वेबसिरीजच्या माध्यामातून थेट हात घालण्यात आला. डेली सोप्स मधला तोच-तोच मेलोड्रामा आणि काल्पनिक जगाला कंटाळलेल्या प्रेक्षकांना, वेबसिरीजमधील कहाण्या त्यांच्या रोजच्या आयुष्यातील समस्यांशी संबधित आढळल्याने वेगाने प्रेक्षक वर्ग याकडे आकृष्ट होत आहे. बीएमएमच्या शेवटच्या वर्षात अजेंडा सेटिंग थेअरी अभ्यासाला असते. या थेअरीनुसार मीडिया किंवा कोणत्याही प्रसारमाध्यमांचा त्यांच्या प्रेक्षकांवर/वाचकांवर विलक्षण प्रभाव असतो याबाबत शिकवले जाते. टेक्निकली, Media tries to influence their audience, by instilling what they should think instead of what they think, असं एक तत्व आहे. सोप्या भाषेत, मीडिया तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने, त्यांना हवा त्या दिशेने विचार करण्याला प्रवृत्त करते, तुमच्या विचार करण्याच्या नैसर्गिक पद्धतीला यामुळे खीळ बसते. यामागचे अर्थशास्त्र लेखाच्या पुढील भागात आपण बघूच.
 
सध्या भारतातील बहुतांश वेब स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून त्यांच्या प्रेक्षकवर्गाला खोटं आणि अर्धसत्य असलेले वास्तव दाखविण्याचा प्रकार सर्रास केला जात आहे, जो अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे सर्जनशील समजल्या जाणार्‍या लेखक/दिग्दर्शकांच्या वर्तुळात या वेबसिरीजचे कथानक लिहिण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या असंवेदशील असणे ही एक पूर्वअट आहे का, असा प्रश्न या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित होतो. कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीमध्ये लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि गुंतवणूकदार हे चार महत्त्वाचे घटक असतात. मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या यांच्यासारख्या पडद्यामागच्या खर्‍या सूत्रधारांची ही नैतिक जबाबदारी आहे की, त्यांनी एकूण समुदायाच्या सामाजिक तसेच सांस्कृतिक समजुती/श्रद्धा याकडे संवदेनशील राहून आपल्या कलाकृतीची निर्मिती केली पाहिजे. यामुळे कोणत्याही प्रकारे लेखक/दिग्दर्शकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत नाही. भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्तिस्वांतत्र्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार जरी दिला असला तरी त्याचा वापर करताना समाजामधील सलोखा आणि शांतता याला कोणतीही बाधा उत्पन्न होणार नाही, याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी. जातीपातीच्या विळख्यातून भारतीय समाजाला मुक्त करण्याचे उद्दिष्ट आता कुठे प्रत्यक्षात येत असताना, केवळ अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली पुन्हा एकदा समाजात तेढ निर्माण होईल, अशा कलाकृतींची खरंच आपल्याला आवश्यकता आहे का? वेबसिरीजमध्ये दाखवल्या जाणार्‍या गोष्टी या आताच्या वास्तविकतेचा भाग आहे का, हा विचार लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि गुंतवणूकदार या चारही घटकांनी करण्याची आवश्यकता आहे. सरकारने सुद्धा याच्या आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यावर दाखविल्या जाणार्‍या वेबसिरीजच नियमन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 
नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रसिद्ध झालेल्या ‘पाताललोक’ वेबसिरीजने पुन्हा एकदा वेबसिरीजच्या स्वंय-नियमनाची गरज अधोरेखित केली आहे. वेबसिरीज, त्यातील हिंसक आणि लौंगिक प्रसंगांचे चित्रीकरण, यावर अनेकदा माध्यमांतून वादविवाद झाले आहेत. नुकत्याच काही प्रदर्शित झालेल्या वेबसिरीज आणि त्यांचा भारताच्या भूराजकीय घटनांशी असलेला संबंध हा काही आता लपून राहिलेला नाही. मात्र, या सगळ्यांमधून अखेर लेखक-दिग्दर्शक नक्की कोणता ‘अजेंडा’ भारतीय प्रेक्षकांच्या मनात रुजवू इच्छितात, हा प्रश्न उपस्थित होतो. माणूस जन्माने गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार व्हायला भाग पाडते, या आधारावर अनेकदा वेबसिरीजमध्ये गुन्हेगारांच्या आयुष्याची दुसरी बाजू दाखवण्याच्या नादात, परिस्थितीमुळे त्याच्यावर झालेला अन्याय दाखवला जातो आणि नकळत त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे समर्थन प्रेक्षकांच्या गळी उतरविण्यात दिग्दर्शक सफल होतात. या सर्व वेबसिरीजचा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग हा देशातील तरुण आणि युवा आहे. दिग्दर्शकाच्या दृष्टीने तथाकथित वास्तववादी चित्रण दाखविण्याच्या अट्टाहासापोटी समाजाच्या एका मोठ्या क्रयशील वर्गाला आपण गुन्हेगारी क्षेत्राकडे तर ढकलत नाही ना, हा प्रश्न आता प्रत्येक लेखक, निर्माता, दिग्दर्शक यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीस विचारण्याची गरज निर्माण झाली आहे ; अन्यथा असे करण्यासाठीच या वेबसिरीजचा वापर करण्याचे एक षड्यंत्र तर नाही ना, असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायला नको.
 
‘पाताललोक’ काय किंवा या आधी आलेल्या ‘लैला’, ‘सेक्रिड गेम्स’ यांसारख्या अनेक वेबसिरीजमधून कलात्मक सृजनशीलतेच्या नावाखाली उजवी विचारसरणी असलेल्या लोकांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या कथित हत्याकांडानंतर अचानक देशातल्या काही स्वयंघोषित बुद्धिजीवी आणि पत्रकार मंडळींना देशात असहिष्णुता वाढीस लागली आहे, असा जावई शोध लागला. त्यानंतर झालेल्या अनेक घटनांचा संबंध हा विनाकारण देशामधील सहिष्णुता कशी धोक्यात आहे, याच्याशी लावण्यात आला. स्वतःला सृजनशील म्हणवून घेण्यार्‍या काही लेखक/दिग्दर्शकांनी आपली कथानकं या ‘फेक अजेंड्या’भोवती रचून त्यातून मुळातच स्वछंदी असणार्‍या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेबसिरीजच्या माध्यमातून प्रदर्शित केला. प्रेक्षकवर्ग वाढविण्यासाठी नेटफिल्क्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्स एका विशिष्ट समुदायाच्या भावनांना दुखावण्याचा प्रयत्न सारखा करत आले आहेत. एका बाजूला दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणारा अनुराग कश्यप ‘सेक्रिड गेम्स’मधून ‘हिंदू दहशतवाद’ या तथाकथित खोट्या संकल्पनेला वाढीस लावण्याचे काम करतो आणि सगळं अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या देशात खपवताही येतं. 'Patriot Act' या एका नेटफिल्क्सच्या कार्य्रक्रमाचा सो कॉल्ड सेक्युलर निवेदक हसन मिन्हाज, जो स्वतः एक अमेरिकन नागरिक आहे, तो भारतात मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुका या मुस्लीम समुदायाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव होता, असा निष्कर्ष काढतो. जो वास्तविकदृष्ट्या खोटा तर आहेच, पण सार्वभौम भारतासाठी अपमानकारकसुद्धा आहे. 
 
वेबसिरीजमध्ये चांगल्या वेबसिरीज नाहीत का?.. तर असं अजिबात नाही. काही हलक्याफुलक्या वेबसिरीज आहेत, ज्यात दोन तरुणांच्या प्रेमाची, त्यांच्यातल्या भावविश्वाचे, जीवनाचे सुंदर चित्रीकरण केल्याचे नक्कीच पाहायला मिळते. Little Things, Permanent Roommates अशा काही वेबसिरीजही खर्‍या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत, पण एकंदरीतच अशा वेबसिरीजचा प्रसार अधिक होणं, चांगल्या विषयांवर वेबसिरीज बनवल्या जाणं आणि अशा सकारात्मकता वाढविणार्‍या वेबसिरीजसाठी प्रेक्षकवर्ग वाढवणं, ही काळाची गरज आहे. अशा चांगल्या वेबसिरीजची सविस्तर माहिती पुढील लेखात जाणून घेऊया. मग अर्थात प्रश्न पडतो, हे सगळे कशासाठी? यासाठीच लेखाचे शीर्षक पुन्हा वाचा. शेवटी हा एक प्रकारे धंदाच आहे आणि कोणत्याही इतर धंद्याप्रमाणे इथे सुद्धा पैसा कमविणे हा पहिला आणि शेवटचा हेतू आहे. जगातली सगळ्यात मोठी ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग असणार्‍या नेटफिल्क्सने २०१६ साली भारतात प्रवेश केला. २०१८ - १९ या आर्थिक वर्षात कंपनीची एकूण उलाढाल ही ४७० कोटी इतकी होती आणि कंपनीचा निव्वळ नफा हा ५.१ कोटी इतका होता. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत ८ पट इतकी जास्त आहे. ‘नेटफिल्क्स’च्या प्रतिस्पर्धी असणार्‍या ‘हॉटस्टार’ने २०१९ मध्ये १२० कोटी रुपयांची गुंतवणूक ही भारतीय प्रादेशिक विषयावर आधारित असणार्‍या कथानकांवर करण्याची घोषणा केली. यातूनच या क्षेत्राचा आर्थिक आवाका तुम्हाला लक्षात येईल. परंतु, अभ्यासाअंती बहुतांश वेबसिरीज बघून हेच लक्षात येते की, या सगळ्या प्लॅटफॉर्म्सचा हेतू केवळ पैसा कमविणे हा इतकाच आहे, मग त्यामुळे समाजाच्या भावभावना दुखावल्या जात आहे की नाही, याचा विचार नाही करायचा. म्हणूनच मी म्हणतो, गंदा है, पर धंदा है.
 

- सुमेध हिंगे

 
 
@@AUTHORINFO_V1@@