राज्यात ५० 'सारस' पक्ष्यांचे वास्तव्य; चंद्रपूरातून 'सारस' नामशेष होण्याच्या मार्गावर

    दिनांक  20-Jun-2020 18:51:22
|

sarus_1  H x W:

 

 
 
 

'सारस गणना' अहवालातून माहिती उघड


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सारस गणनेव्दारे महाराष्ट्रात अंदाजे ५० सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ही गणना पार पडली. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातून सारस पक्षी जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत नाममात्र  वाढ झाल्याने  त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे आहे.

 
 
 

महाराष्ट्रातील केवळ गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या संख्येने सारस या पक्ष्याचे अस्तित्व टिकून राहिले आहे. सारस क्रौंच हा मुख्यत्वे भातशेतीत किंवा छोटय़ा तलावात (याला बोडी म्हणतात) घरटे तयार करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या पक्ष्यांच्या अस्तित्वाला अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वापर आणि मानवी हस्तक्षेपाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात वाघ-बिबट्यांप्रमाणे सारस पक्ष्यांचीही दरवर्षी गणना होते. 'सेवा' (Sustaining Environment and Wildlife Assemblage) ही संस्था २००४ पासून दरवर्षी या पक्ष्यांची गणना करते. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात स्वंयसेवकांच्या मदतीने ही गणना पार पडते. यंदा ही गणना १३ ते १८ जून दरम्यान या जिल्ह्यांमध्ये पार पडली. या गणनेअंती महाराष्ट्रात ४७ ते ५० सारस पक्ष्यांचे वास्तव्य असून मध्यपद्रेशातील बालाघाट जिल्ह्यात ५६ ते ५८ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.

 


sarus_1  H x W:
 

महाराष्ट्रातील सारस पक्ष्यांच्या अधिवासाचा आढावा घेतल्यास केवळ गोंदिया जिल्ह्यामध्ये या पक्ष्यांची संख्या मोठ्या संख्येने असल्याची माहिती 'सेवा'चे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी दिली. २००४ साली राज्यात केवळ चार ते सहा सारस पक्ष्यांचे वास्तव्य होते. यंदा गोंदियात ४५ ते ४७, भंडाऱ्यात २ आणि चंद्रपूर जिल्ह्यात केवल १ सारस पक्षी, असे एकूण अंदाजे ५० पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामधील चंद्रपूर जिल्ह्यात केवळ १ नर सारस पक्षी आढळला असून त्याला प्रजननासाठी मादी न मिळाल्यास या प्रदेशातून सारस पक्षी नामशेष होईल, अशी भीती बाहेकर यांनी वर्तवली आहे. गेल्यावर्षीच्या नोंदीत राज्यात ४१ ते ४२ सारस पक्ष्यांचे वास्तव्य होते. यंदाच्या गणनेमधूनही गोंदिया जिल्ह्यामध्येच मोठ्या संख्येने या पक्ष्यांचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. गोंदिया आणि बालघाट या दोन जिल्ह्यांचे बाघ आणि वैनगंगा या नद्यांमुळे विभाजन होते. या नद्यांमध्ये सारस पक्ष्यांची घरटी आढळतात.

 

sarus_1  H x W: 
 

सारस हा दुर्मीळ आणि राजबिंडा पक्षी आज फक्त दोन आकडी संख्येत फक्त पुर्व विदर्भातील तिन जिल्ह्यापुरता उरलेला आहे. त्यामुळे त्याची आहे ती संख्या वाढविण्यासाठी त्यांचे अधिवास अबाधित राखण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली. यासाठी त्यांचे अधिवास आणि विस्तार नेमका कुठे कुठे आहे हे माहीत असते गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून गोंदिया येथील 'सेवा' व आनखी काही संस्था हे काम करत आहेत. हे अतिशय स्तुत्य आहे. वनविभागाचा सहभाग सुद्धा आवश्यक आहे. अशा गणनेतून त्याची नेमकी स्थिती माहित होत असते जी भविष्यात संवर्धनासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा सारस पक्ष्यांची गणना गोंदिया जिल्ह्यात १३ जून रोजी पार पडली. यावेळी एकूण २३ गटांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ७० ते ८० ठिकाणांहून सकाळी पाच वाजल्यापासून सारस पक्ष्यांच्या नोंदीचे काम केले.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.