विराज जगतापच्या हत्येनिमित्त दु:ख आणि काही प्रश्न...

    दिनांक  13-Jun-2020 21:47:39
|


jagtap honor killing_1&nb


विराज जगताप या मुलाचा पिंपरीच्या पिंपळे सौदागर येथे खून झाला. जातीयवादाच्या विषवल्लीने निर्दोष विराजचा हकनाक बळी घेतला. ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली चालणारे हे क्रौर्य कधी थांबणार? या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच! या असल्या घटनांचे राजकारण केले जाते. पण, त्याचा समाजावर काय परिणाम होतो, प्रत्यक्ष गुन्हेगार आणि बळी यांच्या घरातल्या आई-बहिणी, लेकी-सुनांचे काय होते? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?


जगात ‘प्रेम’ हे शाश्वत सत्य आहे. पण, याच प्रेमासाठी आजवर कित्येक जणांचा बळी घेतला गेला. पुरोगामी महाराष्ट्रामध्येही अशीच सभ्य समाजाच्या मानवतेला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच घडली. पिंपरीच्या पिंपळे सौदागर येथे विराज जगताप या युवकाचीही निर्घृण हत्या करण्यात आली. प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे घटना अशी की, त्याचे काते कुटुंबातील मुलीवर प्रेम होते. काते आणि जगताप कुटुंबे जातीने समान नव्हती. त्यामुळे काते कुटुंबाला हे प्रकरण मान्य नव्हते. त्यांनी विराजवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. दुसर्‍या दिवशी विराजचा मृत्यू झाला. भयंकर! नुकत्याच तारूण्यात पदार्पण केलेल्या आणि आपल्या विधवा आईच्या स्वप्नांचा राजा असणार्‍या विराजचे आयुष्य भयंकर रितीने संपले. संताप येतो अशा रूढी-रितीरिवाजांचा की जिथे माणसाला किंमत नाही. जिथे जातीच्या, इज्जतीच्या नावावर केवळ आणि केवळ राक्षसवृत्ती जोपासली जाते.

कधी संपणार हे? समाजातील काही विचारवंतांशी याबाबत चर्चा केली. त्यापैकी रा.स्व.संघाचे ज्येष्ठ विचारवंत आणि समाजअभ्यासक रमेश पतंगे या घटनेबद्दल म्हणतात, “रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आणि सामाजिक समरसता मंचचा संस्थापकीय सदस्य म्हणून मी मनापासून या घटनेचा तीव्र शब्दांत निंदा करतो. प्रेम कोणत्याही समाज किंवा व्यवस्थेला विचारून होत नाही. विराजला मारून काय मिळवले? उलट विषम जातीतील अनुरूप आणि दोघांच्या संमतीने झालेले विवाह सामाजिक तेढ संपवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जातीय विद्वेषातून घडणार्‍या घटना समाज मानसिकतेच्या विकृतीतून होतात. ही विकृती असल्या घाणेरड्या राजकारणामुळे बळावते. हे थांबवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. या घटनांना मानवी दृष्टीने हाताळायला हवे, जातीय तेढीने नव्हे.”
तर विद्रोही चळवळीचे नेते अभ्यासक ज. वि. पवार यांना या घटनेवर प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणतात की, “सत्तांतर झाले. राज्यात एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता आली. मात्र, समाजाची परिस्थिती बदलली नाही. याचाच अर्थ राज्यात सत्तांतर नव्हे, तर मानसिक स्थित्यंतर होणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे मानसिक स्थित्यंतर समाजात व्हायला हवे.
समतावादी दृष्टिकोन बाळगणारे समाजनेते बाबा आढाव यांच्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, “अशा घटना सर्वस्वी निंदनीय आहेत. या थांबायलाच हव्यात. या घटनेमध्ये कुणीही समाजगटाने संघटित होऊन आरोपीला पाठीशी घालू नये. न्यायालयीन प्रक्रियेनुसार आणि संविधानाच्या मानवतेच्या चौकटीनुसार गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. मग गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असो.
विराजच्या मृत्यूबद्दल आता कदाचित राजकीय, सामाजिक वातावरण तापवण्याचा, दूषित करण्याचा विचार होईल. पण, या पार्श्वभूमीवर वाटते, कोणत्याही जातीचा माणूस मरतो. तेव्हा माणूस मेल्यापेक्षा तो अमुक जातीचा होता म्हणून मेला किंवा अमुक वंशाचा होता म्हणून मेला, हाच विचार समाजाच्या डोक्यात पहिल्यांदा का येतो? कुणीतरी माणूस अन्याय-अत्याचाराने मृत्युमुखी पडला, हा विचार का मनात येत नाही? याच पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर काय चालू आहे? ‘जर का पुन्हा केला गुन्हा त्याला तेथेच गाडायचे’ म्हणत आम्ही ‘पिंपरी-चिंचवड पॅटर्न’ या हेडलाईनखाली काही लोक व्हिडिओ प्रसिद्ध करत आहेत. काहीजण विराजचे ज्या मुलीवर प्रेम होते असे सांगितले जाते, त्या मुलीचा फोटो टाकून तिला अर्वाच्च शिव्या देत हिला फासावर द्यायची गाणी टाकत आहेत. ते गाणेही कोणते तर बाबा भीमाचा कायदा नटवला हिने जयभीमवाला पटवला...तसेच विराजच्या आईचा त्याच्या मृत्यूवरचा विलाप समाजमाध्यमांवर टाकून त्याद्वारे भयंकर विघातक उद्गार प्रसिद्ध करणारे व्हिडिओसुद्धा काही लोक टाकत आहेत. हे सगळे लोक माझ्या मते विराजचा खून करणार्‍यांइतकेच राक्षसी आणि समाजविघातक मानसिकतेचे आहेत.
कुठेतरी वाचलेले नव्हे, तर कळत्या वयापासून अनुभवलेले सत्य हेच की, कुणीही गुन्हा केला तरी त्याचे भयंकर परिणाम होणार ते स्त्रियांवरच! आज विराज या जगात नाही. विराजच्या मृत्यूचा सगळ्यात भयंकर परिणाम झाला असेल तर तो त्याच्या आईवर. दुसरीकडे विराजच्या मृत्यूनंतर अवघ्या सोशल मीडियावर काते कुटुंबातल्या त्या मुलीला गुन्हेगार ठरवले गेले. तिचा गुन्हा काय? विराजचा असा मृत्यू व्हावा, असे तिचे म्हणणे असेल का? की आपले वडील, भाऊ आपले हसते-खेळते घर तुरूंगात सडावे असे तिला वाटत असेल का?
मी विराजचा खून करणार्‍यांचा अगदी मनापासून निषेध करते, पण मला त्या कुटुंबातल्या त्या मुलीबद्दल खरंच मनापासून वाईट वाटते. हिंगणघाटच्या जळीत हत्याकांडाचा गुन्हेगार विकी नगराळे याच्या पत्नीबद्दल आणि सात महिन्याच्या मुलीबद्दलही माझे हेच मत आहे. विकी नगराळे या क्रूरकर्म्याने प्रेम प्रकरणातून एका मुलीला पेट्रोल टाकून जाळून मारले. यातही विकी आणि त्या मुलीची जातपात शोधून जातीय संघर्ष करण्याचा प्रयत्न झाला. त्याला सजा झाली. पण, त्याची तरूण निष्पाप पत्नी आणि अवघी सात महिन्यांची मुलगी या दोघींचे काय? त्यांचा काहीही दोष नसताना त्यांच्या नशिबी जे काही आले असेल, ते भयंकरच! आताही विराजचा खून केला. पण, त्याचे परिणाम भोगणार कोण? विराजची आई आणि त्यांच्याच घरातली मुलगी. जिचे राजकुमारी म्हणून लाडकोड केले होते ती मुलगी... प्रेम आणि कशाकशासाठी खुनाखुनी करणार्‍यांनो, उत्तर द्या! तुमच्या वैयक्तिक हेवेदावे, रागलोभ आणि मत्सरामुळे समाजातल्या आयाबायांनी, मुलीबाळींनी कुठवर भोगायचं? समाजाने कुठवर विद्वेषाचे भार वाहायचे ते सांगा? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.