साहित्याच्या पाटीवर...

    दिनांक  21-May-2020 20:52:38   
|
JP _1  H x W: 0

साहित्य हे एकमेव असे साधन आहे, ज्याच्या मजकूरसेवेत कोरोना कोणताही खंड पडू देऊ शकले नाही. कारण, त्याच्या उपभोगाची पद्धत एकल आहे. समूहाचा संबंध त्यात फार नाही. त्यामुळे जगभरातील नामवंत लेखकांनी या संकटकाळात मानवाजातीच्या सेवेसाठी लेखण्या सरसावल्या.
जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्यामुळे मानसिक तणाव सर्वजण अनुभवत आहेत. प्रचंड अनिश्चितता, अस्वस्थता याचे एकंदर परिणाम माणसाच्या विचारांवर होतात. मुख्यत्वे माणसाचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी केल्या जाणार्‍या सर्वच हालचालींवर बंदी आहे.


मोकळेपणाने चालायला जाणे, व्यायाम म्हणून धावायला जाणे, निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवणे आता शक्य नाही. सगळ्या जगाला एकप्रकारे कारागृहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपली न केलेल्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागल्यावर काय मनस्थिती होते, हे प्रत्येकाने कधीतरी अनुभवले असेलच. आज प्रत्येकजण नव्याने त्याच अनुभवांची उजळणी करतो आहे. मनोरंजन उद्योगावर संक्रात ओढवली आहे. ‘लॉकडाऊन’ उठवताना सिनेमागृह, नाट्यगृह प्राधान्यक्रमात शेवटी असतील.


कला, नाट्य, संगीत, साहित्य हे मानवाच्या मनस्थितीला सांभाळणारी औषधे आहेत. त्या सगळ्यात साहित्याचे वैशिष्ट्य असे की, ‘लॉकडाऊन’च्या काळातही त्याचा उपभोग पूर्वीसारखाच घेतला जाऊ शकतो. म्हणजे संगीताचे कार्यक्रम, सिनेमागृहात चित्रपट या सगळ्याचा पूर्वीसारखा आस्वाद घेणे आता शक्य नाही. त्याकरिता नवे प्रयोग केले जात आहेत. मात्र, साहित्य हे एकमेव असे साधन आहे, ज्याच्या मजकूरसेवेत कोरोना कोणताही खंड पडू देऊ शकले नाही. कारण, त्याच्या उपभोगाची पद्धत एकल आहे. समूहाचा संबंध त्यात फार नाही. त्यामुळे जगभरातील नामवंत लेखकांनी या संकटकाळात मानवाजातीच्या सेवेसाठी लेखण्या सरसावल्या.


दोनच दिवसांपूर्वी आपला ८६वा वाढदिवस साजरा केलेल्या रस्किन बॉण्ड या विश्वविख्यात साहित्यिकाच्या कथा त्यांच्याच आवाजात ऐकवण्याचा प्रयोग आकाशवाणीने केला आहे. २० दिवसांपूर्वी याबाबतची घोषणा ‘ऑल इंडिया रेडिओ’च्यावतीने करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या ८६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पुस्तकाचे डिजिटल स्वरूपात प्रकाशन बॉण्ड यांनी केले आहे.


प्रवासवर्णनाच्या स्वरूपाचे ते पुस्तक आहे. ओलिव्हर जेफर्स या बालसाहित्यिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कथा बालकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘अलकेमिस्ट’, ‘वेरोनिक डीसाईड्स टू डाय’, ‘पिलग्रीमेज’ या जगप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक पॉलो कोएलो यांनीही दोन पुस्तके प्रकाशित केली. ‘एबीसीडी’ व ‘द मिनींग ऑफ पीस’ अशी त्या पुस्तकांची नावे आहेत. मनुष्याच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवून लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळी त्यांनी कागदावर काय उतरवले याला जास्त महत्त्व असेल. युवा नोआ हरारी या लेखकाने कोरोनाच्या अनुषंगाने एक लेखही लिहिला होता. जगभरात तो लेख असंख्य लोकांनी वाचला.


भारतातही ‘राजकमल प्रकाशन’ या हिंदी भाषिक संस्थेने फेसबुकवर लेखकांना ‘लाईव्ह’ घेऊन येण्याचे प्रयोग केले. मात्र, त्यापलीकडे अभिनव असे काही झालेले नाही. मराठी साहित्यसृष्टीचा विचार केल्यास नवे काही होताना दिसत नाही. डिजिटल माध्यमातून लेख, दीर्घलेख इथपर्यंत आपले प्रयोग मर्यादित झाले आहेत. जगभरात ‘लॉकडाऊन’च्या काळातही पुस्तके प्रकाशित केली गेली. भारतात तसे काही घडताना दिसत नाही. प्रकाशकांनी मध्यंतरी पायरसी करणार्‍यांना दम भरला. त्याऐवजी दुसरे काही झालेले नाही.

तरीही पायरसी व लबाडी काही थांबत नाही. नुकतेच एका सर्वज्ञ संपादकांचे मजकूरचोरी प्रकरण गाजले होते. मूळ लेखकाने समाजमाध्यमातून त्याविषयी व्यक्त होऊन असल्या पत्रकारितेचे वाभाडे जगासमोर काढले आहेत. मराठी साहित्य संमेलनासंबंधी मित्राच्या स्टुडिओत गप्पा मारणारे लोक स्वतः ‘मजकूर चोर’ असले की नवे घडण्याची आशाच सोडून दिली पाहिजे. पण, तरीही आपल्या मायभाषेवरील प्रेम म्हणून झाल्या प्रकारची खंत वाटते. जगाच्या पाठीवर साहित्यक्षेत्रात अभिनव प्रयोग होत असताना मराठीने मागे राहू नये इतकेच वाटते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.