मातीशी नाळ जोडलेला 'आपला माणूस'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2020
Total Views |


nana patekar_1  


एक उत्तम अभिनेते, तितकेच संवेदनशील साहित्यप्रेमी वाचक, कवितांचा प्रभावी जाणकार, हरहुन्नरी कलावंत आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून मदत करणारा मनस्वी 'देवमाणूस' म्हणजे दस्तुरखुद्द मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा जबराट अभिनेता 'नटसम्राट नाना पाटेकर'


मुंबई ही मायानगरी. इथे सगळेजण 'स्टार' बनायला येतात. पण 'झिरो ते हिरो' होण्याचा हा प्रवास सोपा नसतो. त्यासाठी कठोर मेहनत लागते. बरोबर १० वर्षांपूर्वी सांताक्रुझच्या 'आजीवासन स्टुडिओ' मध्ये 'मनमोहना' या अल्बमचे प्रकाशन होते. कार्यक्रमाची वेळ सायंकाळच्या ७ वाजताची होती. मी मुंबईत आणि एकूणच या क्षेत्रात नवखा असल्याने सायंकाळी ६ वाजताच कार्यक्रमस्थळी पोहोचलो. तिथे तेव्हा कार्यक्रमाचे नियोजन सुरु होते. काही वयस्कर मंडळी गप्पा मारत बसली होती. मी लवकर आलेलो पाहून, त्यांनी मला जवळ बोलावले. माझी विचारपूस सुरू केली. मी त्यांना नमस्कार केला. पुढे आमच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. मी माझ्याबद्दल त्यांना माहिती दिली. एक कविता ऐकवली. त्यांनी मनापासून दाद दिली. काहीवेळाने तिथे दोन दिग्गज व्यक्तिमत्व आले. त्या दोघांना लांबून पाहून मी जागेवर तडक उभा राहिलो. पहिल्यांदा इतके मोठे कलावंत मी जवळून बघत होतो. परंतु, माझ्या बाजूला असणारी वयस्कर मंडळी मात्र जागची हललीदेखील नाहीत. मला उगाचच वाईट वाटले आणि त्यांच्याबद्दल मनात राग आला. ते दोन मोठे कलावंत आमच्याकडेच येत होते. मी भारावून गेलो होतो. तेव्हा ते दोन कलावंत माझ्या बाजूला असणाऱ्या वयस्कर व्यक्तींच्या पाया पडले आणि मग त्यांची ओळख सुरु झाली. मीदेखील तिथे उभा असल्याने या दोन वयस्कर मंडळींनी माझ्या नावासहित माझी ओळख करून दिली आणि माझ्या कवितेचे त्यांनी कौतुक केले. ज्या दोन दिग्गज व्यक्तींना माझी ओळख करून देण्यात आली होती; त्यातील एक होते, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि दुसरे कलावंत होते प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर. ज्या वयस्कर मंडळींनी माझी ओळख करून दिली होती, ते सुरेश वाडकर यांचे नातेवाईक होते. हे सगळं समजायला मला थोडा वेळ गेला. पण, त्यावेळी नाना पाटेकर यांच्या मी पाया पडायला लागलो, तर त्यांनी मला मिठीत घेतले आणि “मला कविता ऐकवशील ना?” असा प्रश्न केला. मी तेव्हा त्यांना फक्त बघतच राहिलो. शुभ्र पांढरा शर्ट, काळ्या कलरची पँट असा साधा पेहराव नानांचा होता. कार्यक्रम झाल्यानंतर ते माझ्याशी आपुलकीने बोलले आणि त्यांनी माझी कविता मनापासून ऐकली. एक एवढा मोठा कलावंत असून, त्यांनी माझ्यासारख्या नवीन ओळख झालेल्या माणसाला दिलेला आदर आणि प्रेम कौतुकास्पद होते. लहानपणापासून मी त्यांच्या 'अभिनयाचा भक्त' होतोच ; पण भेट झालेल्या दिवसापासून मी त्यांचा 'माणूस' म्हणून 'भक्त' झालो. 'मुंबईत आल्यानंतर काय होईल? कसे होईल? मला मार्ग कसा मिळेल?' अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला त्यादिवशी मिळाली. जगात काहीही अशक्य नाही, हे तेव्हा मला नानांना भेटल्यावर जाणवले. त्यानंतर अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नाना मला भेटत गेले. त्यांची ही पहिली भेट आणि नंतरच्या भेटीत नाना कधी वेगळे वाटलेच नाहीत. एक उत्तम अभिनेता, हरहुन्नरी कलावंत आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा 'देवमाणूस' म्हणजे दस्तुरखुद्द मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा जबराट अभिनेता 'नटसम्राट नाना पाटेकर.'

 

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लखलखणारा तारा म्हणजे नाना. नाना मातीशी नाळ जोडलेला 'आपला माणूस' आहे. नाना पाटेकर यांना ओळखत नाही, असा माणूस सापडणार नाही. भारतातच नव्हे, तर भारताबाहेरदेखील त्यांचे चाहते प्रचंड आहेत. कॉमेडी ते गंभीर अशा सर्व प्रकारच्या अभिनयाचा नाना हुकुमी एक्का आहे. वयाच्या ६९व्या वर्षीही नाना पाटेकर अगदी 'फिट अ‍ॅण्ड फाईन' आहेत. हिंदी, मराठी, तामिळसह अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नानांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला आणि त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा अभिनेता. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट. नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म १ जानेवारी, १९५१ रोजी रायगडच्या 'मुरुड-जंजिरा' या गावी झाला.नानाचे वडील दिनकर पाटेकर हे 'टेक्सटाईल प्रिंटर बिझनेसमन' होते. आईचे नाव संजनाबाई पाटेकर, तर पत्नी नीलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. नाना मुंबईतील 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा छंद होता. तेव्हा नाना पोलिसांना मदत करायचे. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे पोलिसांना करून दिली आहेत. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी नाना 'जाहिरात एजन्सी'मध्ये काम करत होते. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांमध्ये कामे करू लागले. नाना पाटेकर यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षीच बंद पडला. त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये चित्रपटाच्या प्रचाराचे काम करावे लागले. ते चित्रपटाचे पोस्टर चिकटवण्याचे काम करत असत. त्यावेळी त्यांना दिवसातील एका वेळेच्या जेवणासह महिन्याला ३५ रुपये मिळत. मात्र, अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास हा त्यांनी निवडलेला नाही. अपघाताने ते या क्षेत्रात आले. ७०च्या दशकात ते एकदा 'रिहर्सल' पाहायला गेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी नाटकात काम करण्याची 'ऑफर' देण्यात आली. तेथून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. आपल्या मुलाला म्हणजेच मल्हारलादेखील त्यांनी चित्रपटात येण्यासाठी 'फोर्स' केला नाही किंवा निर्मात्याच्या पाया पडले नाहीत. त्यामुळे ते स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवतात. मुलांनी आपले रस्ते स्वतः तयार करावेत, असे त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका खूप लोकप्रिय झाल्या आहेत. 'सर्वश्रेष्ठ अभिनेता', 'सर्वश्रेष्ठ साहाय्यक अभिनेता' आणि 'सर्वश्रेष्ठ खलनायक' या तिन्ही श्रेणींमध्ये 'फिल्मफेअर पुरस्कार' जिंकणारे ते एकमेव कलाकार आहेत. त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये अष्टपैलू अभिनेता म्हटले जाते.

 

नाना पाटेकर यांनी 'गमन' १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. त्याच दरम्यान त्यांनी 'हमिदाबाईची कोठी' या नाटकामध्ये काम केले व मोठे यश मिळवले. अगदी सुरुवातीला 'दमन,' 'गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटात त्यांनी काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला 'माफीचा साक्षीदार' हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की, या चित्रपटाची हिंदी आवृत्ती 'फांसी का फंदा' हीसुद्धा खूप गाजली. 'मोहरे' आणि 'सलाम बॉम्बे ' या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकाची कामे मिळायला सुरुवात झाली. 'गिद्ध', 'भालू', 'शीला' या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांमध्ये नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही. प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आज की आवाज' चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला. नानाची पहिली यशस्वी भूमिका 'एन.चंद्रा' यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला 'अंकुश' हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. १९८७ मध्ये आलेल्या एन. चंद्रा यांच्या 'प्रतिघात'मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती. १९८९ साली 'परिंदा'मध्ये केलेल्या खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्या'चा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाला. १९९२ मध्ये रिलीज झालेला 'तिरंगा' हा मुख्य अभिनेत्याच्या रुपात नाना पाटेकर यांच्या सिनेकरिअरमधील पहिला 'सुपरहिट सिनेमा' आहे. तसेच त्याच वर्षी आलेल्या 'अंगार' या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट खलनायका'चा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाला. १९९४ साली 'क्रांतिवीर' चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाला. नाना पाटेकर यांनी 'प्रहार : द फायनल अटॅक' हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी काम केले आहे. नानांनी 'प्रहार' या चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना काही दिवस सैनिकांसोबत राहिले. विशेष म्हणजे, ते त्यावेळी एक कलाकार म्हणून नाही, तर एक सैनिक म्हणून राहिले होते. नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून 'प्रहार'मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.

 

नाना पाटेकर यांनी खलनायकी भूमिकेबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका साकारली आहे. 'अंधायुद्ध', 'परिंदा', 'अंगार', 'तिरंगा', 'क्रांतिवीर', 'वजूद', 'अब तक छप्पन', 'अटॅक ऑफ २६/११', 'गुलाम-ए-मुस्तफा','टॅक्सी नं. ९२११', 'यशवंत', 'युगपुरुष', 'खामोशी', 'अपहरण', 'वेलकम', 'वेलकम बॅक', 'काला' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. 'अपहरण' या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी भूमिकेला 'सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार' आणि 'स्टार स्क्रीन' पुरस्कार मिळाले. 'बंगाल फिल्म पत्रकारिता संघा'तर्फे 'बेस्ट अ‍ॅक्टर पुरस्कार' हा नानांना 'अब तक छप्पन' या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली, चेहऱ्यावर येणारे चढउतार, मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहऱ्यावर येणारा संताप सहजरित्या त्यांच्या अभिनयातून पाहावयास मिळतो. अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले. चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार, अभिनयसम्राट राजकुमार, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आणि 'अ‍ॅन्ग्री यंगमॅन' अमिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी आहे. या महान नायकांच्या अभिनय क्षमतेला नानांची अभिनय क्षमताच टक्कर देऊ शकते, असं म्हणायला हरकत नाही. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खामोशी' या सिनेमात त्यांनी मनीषा कोईरालाच्या मूकबधिर वडिलांची आव्हानात्मक भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. ही भूमिका कोणत्याही अभिनेत्यासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतीकेवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून नानांकडे बघितले जाऊ लागले होते. मात्र, २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' आणि त्यानंतर २०१५ मध्ये आलेल्या 'वेलकम बॅक' या सिनेमातून त्यांनी विनोदी भूमिकासुद्धा ते ताकदीने पेलू शकतात, हे सिद्ध केले. त्यांच्या चित्रपटातून आपल्याला जीवंत अभिनय पाहायला मिळतो. टेलिव्हिजन कार्टून मालिका 'जंगल बुक' याकरिता त्यांनी स्वतःचा आवाज दिला आहे. 'यशवंत', 'आंच', 'वजूद' या चित्रपटांमधून त्यांनी गाणी ही गायली आहेत. 'सिंहासन', 'भालू', 'राघू मैना', 'सावित्री', 'गड जेजुरी जेजुरी', 'माफीचा साक्षीदार', 'पक पक पकाक', 'देऊळ', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हीरो', 'आपला माणूस' आणि 'नटसम्राट' या सर्व मराठी चित्रपटातील नानांच्या भूमिका विशेष होत्या आणि त्या गाजल्या आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' चित्रपटाचे खूप कौतुक झाले. नाना या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मातेही बनले. नटसम्राट गणपतराव बेलवलकरची भूमिका साकारताना नानांचा अभिनय, संवादफेक आणि हावभाव या सर्वच बाबी शंभर टक्के जुळून आल्या आहेत. नानांच्या रुपाने रुपेरी पडद्यावरचा 'नटसम्राट' प्रेक्षकांना पाहायला मिळतो असे म्हटले तर अतिशयोक्ती नसेल.

 

नाना जेव्हा पुण्यात काम शोधत होते. तो संघर्षाचा काळ होता. पण, नाना चिवट होते.नाना तेव्हा रस्त्यावर पांढरे पट्टे ओढण्याचे काम करत. त्याचे त्यांना फार कमी पैसे मिळत असे. हळूहळू नानांना नाटकात काम मिळू लागले आणि संघर्ष कमी होत गेला. 'हमीदाबाईची कोठी' या नाटकादरम्यान प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांची मैत्री झाली. अल्पावधीतच ते दोघे जिवलग मित्र बनले. अशोकमामांना तेव्हा नाटकाचे २५० रुपये मिळत, तर नानाला फक्त ५० रुपये मिळायचे. मित्र असल्याने नानांची परिस्थिती अशोक मामाला माहिती होती. नाटक झाल्यावर किंवा सुरू होण्यापूर्वी ही मंडळी पत्ते खेळायची.त्यात अशोक मामा हे नानाबरोबर मुद्दाम हरायचे आणि नानाला १०-२० रुपये मिळायचे. नानाला हे कळायचं बरं, पण पैशांची गरज असल्याने तोही ते घ्यायचा. या मैत्रीत आणखी एक गंमतीदार गोष्ट होती. अशोकमामा कुठेही निवांत बसलेले असले की, नाना त्यांचे पाय चेपत असत. नंतर डोक्याला तेल लावून मालीश करून देत. मालीश झाल्यावर मामा हे नानाला पाच रुपये देत. नानाही ते आनंदाने घेत. आजही नाना एवढा मोठा नट झाल्यावरही नाना हे अशोकमामाला 'चंपी' मालीश करून देतात.तेव्हा आजही मामा दहा रुपये काढून देतात आणि म्हणतात, ''नान्या ठेव, महागाई वाढली आहे.” एवढी सहजता आणि प्रामाणिकता त्यांच्या मैत्रीत आहे. अशोकमामांनी वेळोवेळी नानाला मदत केली आहे, याची जाणीव नानांनी ठेवली आहे. नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते असून त्यांनी आतापर्यंत शेकडो चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर हे पुण्याजवळील त्यांच्या गावात शेतीदेखील करतात. त्याठिकाणी त्यांचे घर असून ते तांदूळ, गहू आणि इतर पिकांचे उत्पादन घेतात. त्याचबरोबर आपल्या पिकांच्या विक्रीसाठीदेखील ते स्वतः बाजारात जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतदेखील करतात. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या मदतीने 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना मदतदेखील करत असतात. त्याचबरोबर शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचादेखील ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर अनेकांना त्यांनी मदत केली असून काही गावेदेखील दत्तक घेतली आहेत. हे सामाजिक क्षेत्रातील त्यांचे फार मोठे योगदान आहे. नाना दानशूर आहेत. त्यांना राज कपूर पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी त्या पुरस्काराची १० लाख रूपये रक्कम शेतकऱ्यांना दिली. 'पद्मश्री'सहीत त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

माणसामध्ये खलनायकही असतो आणि नायकही असतो. खलनायक व्हायचे की नायक व्हायचे, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. नायक होऊन आपल्यातील माणुसकी जगवण्याचा प्रयत्न केला तर माणूस म्हणून जीवन जगल्याचे समाधान मिळेल. आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण करतो, ते थांबले तरच भारतीय संस्कृतीची जोपासना होईल. माणसात देव शोधा. आपल्या हृदयात देव असतो. आपल्या कामाला देव माना, मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत. या जगात येताना आपण हे धर्म घेऊन आलो होतो का? सर्व धर्मातील श्लोक, कलम याचा अर्थ एक आहे. मुळात धर्म ही संकल्पनाच नानांना मान्य नाही. आपण भारतीय असून धर्म व जात भारतीय आहे असे त्यांचे मत आहे. 'सध्या देशात निराशेचा सूर आळवला जात आहे. पण विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या हाती देश सुरक्षित राहील, असा विश्वास वाटतो. आपण देश आणि समाजाचे देणे लागतो, याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिका. दररोज देवपूजा करण्यापेक्षा आपल्या हातून सत्कार्य कसे घडेल याची जाणीव ठेवा. शेवटी सत्कार्य हीच खरी देवपूजा आहे', असे मानणारा नाना खऱ्या अर्थाने 'देवमाणूस' आहे. पडद्यावर थरकाप उडवणाऱ्या भूमिका करणारा नाना आतून खूप संवेदनशील माणूस आहे. एक उत्तम अभिनेते, तितकेच संवेदनशील साहित्यप्रेमी वाचक, कवितांचा जाणकार, हरहुन्नरी कलावंत आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून मदत करणारा मनस्वी 'देवमाणूस' म्हणजे दस्तुरखुद्द मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा जबराट अभिनेता नाना पाटेकर.

 

त्यांच्या डायलॉगमध्ये सांगायचे ठरले तर, "भगवान का दिया हुआ सब कुछ है दौलत है, शोहरत है, इज्जत है” अशा शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आभाळाएवढ्या 'नटसम्राट' कलाकाराला मानाचा मुजरा...

 
 

- आशिष निनगुरकर

@@AUTHORINFO_V1@@