अभिव्यक्तीची 15 सेकंद

    दिनांक  30-Mar-2020 21:47:23   
|


whats app_1  H
व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या चिनी अ‍ॅप्सचीच मोफत ब्रॅण्डिंग होते. या अ‍ॅप्सनेदेखील व्हॉट्सअ‍ॅपच्या हिशोबाने आपले व्हिडिओ ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी सेकंदाचे तयार केलेले असतात. आता मात्र, असे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपचे वापरकर्ते स्टेटसला अपलोड करू शकणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपच्या या निर्णयामुळे वापरकर्त्यांना स्वतःचा वैयक्तिक व्हिडिओ कंटेंट तयार करण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे, हे मात्र खरे.
कोरोना महामारीमुळे जगातील कितीतरी देशांतील नागरिक घरात बंदिस्त झाल्याचे समजते. मानवाकडून मानवाला होणार्‍या कोरोनापासून बचावाचा ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच एक मार्ग असल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांनी ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला. भारतात हा ‘लॉकडाऊन’चा काळ २१ दिवसांचा असणार आहे, परंतु, त्याआधीच अनेक लोक घरात थांबण्यास कंटाळल्याचे दिसते. आतापर्यंत दररोज घराबाहेर राहणे, काम करणे, मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, हॉटेल-कॅफेटेरियामध्ये खाणे-पिणे, थिएटरमध्ये सिनेमा-नाटक पाहणे तसेच विविध पर्यटन-धार्मिक स्थळांना भेटी देणे, वस्तुसंग्रहालय-प्राणीसंग्रहालय, बाग-बगिचांत जाणे आणि शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणे अशा निरनिराळ्या कामांत व्यक्ती व्यस्त राहत असे. मात्र, कोरोनाच्या साथीने व्यक्तीच्या या सगळ्याच गतिविधी बंद झाल्या. अशा परिस्थितीत पुस्तक वाचणे, घरगुती खेळ खेळणे याबरोबरच घरात बसलेल्या लाखो लोकांकडे मनोरंजनाचा मार्ग उरला तो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वापरण्याचा आणि ऑनलाईन सर्फिंगचा. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा अतिरिक्त वापर करत असल्याचे दिसते. कारण, हाताशी असलेला भरपूर वेळच वेळ. तरीही आपल्या परिचितांशी, मित्रमैत्रिणींशी संपर्क साधण्याचे व्हॉट्सअ‍ॅप हे माध्यम इतरांपेक्षा जरा जास्तच लोकप्रिय आणि त्यातही व्हॉट्सअ‍ॅपच्या विविध वैशिष्ट्यांपैकी स्टेटस अपडेट हे अनेकांच्या पसंतीस उतरलेले.‘लॉकडाऊन’मुळे घरात राहणार्‍यांकडून हे वैशिष्ट्यही मोठ्या प्रमाणात वापरले गेले. परंतु, आता यातही एक नवीच अडचण निर्माण झाली आहे. आपल्याला माहीतच आहे की, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ असे पर्याय असतात व त्याद्वारे आपण आपले म्हणणे इतरांना सांगू शकतो. त्यापैकी व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओचा पर्याय वापरणे कित्येकांना आवडते, मात्र, या व्हिडिओ स्टेटस अपडेटसंबंधीच व्हॉट्सअ‍ॅपने एक निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांचे चेहरे हिरमुसून जाऊ शकतात. कारण, व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडिओ स्टेटसच्या लांबीत कपात करण्याचे ठरवले आहे. म्हणजे आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये वापरकर्ते ३० सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करू शकत असत. इथून पुढे मात्र ही मर्यादा १५ सेकंद इतकीच असेल. १५ सेकंदांपेक्षा अधिक कालावधीचा व्हिडिओ एकावेळी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये अपलोड करता येणार नाही. त्याला कारणही तसेच ठरले आहे. बहुसंख्य वापरकर्ते हे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ स्टेटस अपलोड करण्यासाठी टिकटॉक, विबो आणि विमेट या अ‍ॅपद्वारे तयार केलेले व्हिडिओ वापरतात. उल्लेखनीय म्हणजे, हे अ‍ॅप चिनी कंपन्यांनी तयार केलेले असून व्हॉट्सअ‍ॅपला हीच बाब रुचलेली नाही. कारण, अशाप्रकारच्या व्हिडिओत संबंधित अ‍ॅप्सचे नावही ठळकपणे दिसत असते. परिणामी, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या चिनी अ‍ॅप्सचीच मोफत ब्रॅण्डिंग होते. या अ‍ॅप्सनेदेखील व्हॉट्सअ‍ॅपच्या हिशोबाने आपले व्हिडिओ ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी सेकंदाचे तयार केलेले असतात. आता मात्र, असे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपचे वापरकर्ते स्टेटसला अपलोड करू शकणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपच्या या निर्णयामुळे वापरकर्त्यांना स्वतःचा वैयक्तिक व्हिडिओ कंटेंट तयार करण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे, हे मात्र खरे. दरम्यान, भारतीय लोकही ‘लॉकडाऊन’ काळात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर नेहमीपेक्षा अधिक करत आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचा वापरही अधिक होऊ लागला आहे. मात्र, यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवरील ताणही वाढत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तर गेल्या महिनाभरात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केल्या जाणार्‍या ऑडिओ व व्हिडिओ कॉलिंगमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर भारतातील इंटरनेटचा वेगही कमी झाल्याच्या तक्रारी अनेक शहरांमधून समोर येत आहेत. याचाच अर्थ घरबसल्या लोकांचा इंटरनेटचा वापर हा निश्चितच वाढला असून संपर्क आणि मनोरंजनाचे साधन म्हणून साहजिकच पसंती मिळते ती व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांना. तेव्हा, व्हॉट्सअ‍ॅपने घेतलेल्या या निर्णयामुळे जरी युझर्सचा हिरमोड झाला असला तरी हा निर्णय स्वीकारण्याशिवाय आता पर्याय नाहीच.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.