समर्थांचे प्रपंचविज्ञान

    दिनांक  18-Mar-2020 18:52:17
|


samarth_1  H x


तत्कालीन परधर्मीय म्लेंच्छांनी हिंदू धर्म, देवळे यांची मोडतोड, त्यांचे वित्तहरण, जीवितहरण, स्त्रियांची विटंबना वगैरे अत्याचार सर्रास चालवले होते आणि त्या अत्याचारांना पाठीशी घालणारे म्लेंच्छ राजे व त्यांची राज्यसत्ता होती. त्यावरून राजाला आणि राज्यसत्तेला किती महत्त्व आहे हे ध्यानात येते. राजा आणि त्याची सत्ता चांगली नसेल तर माणसाला धडपणे जगता येणार नाही, हे ओघाने आलेच!आधी प्रपंच नेटका करावा आणि मग परमार्थाचा विवेक पाहावा
,’ असे समर्थांनी दासबोधात प्रतिपादित केले आहे. तरीही एवढ्याने समर्थाना अभिप्रेत असलेले प्रपंचविज्ञानाचे तत्त्वज्ञानस्पष्ट होत नाही. व्यक्तिगत प्रपंच आणि परमार्थाचे आचरण करून समर्थांचे प्रपंचविज्ञान दृष्टिपथात येत नाही. कारण, व्यक्तीला समाजात राहायचे असते, समाजाशिवाय व्यक्तीला वेगळेे असे स्थान असत नाही. त्यामुळे समाजाचा प्रपंच म्हणजेच एकमेकांशी वर्तवणूक आणि समाजाला आवश्यक असा परमार्थ म्हणजे न्याय, नीती, चारित्र्य संस्कृतिरक्षण यांतील विवेक सांभाळून माणसाची जी जीवनशैली तयार होते त्याला महत्त्व असते. या दृष्टीने व्यक्तिगत जीवनचारित्र्यबरोबर वरील आशयाचा सामाजिक प्रपंच व परमार्थ कसा साधता येईल, हे स्वामींना प्रपंचविज्ञानात सांगायचे आहे. त्यापुढे जाऊन व्यक्ती व समाज या दोघांचेही भवितव्य राज्यसत्तेवर अवलंबून असते, हे मान्य करावे लागते. त्यामुळे राजा, राज्यकर्ता कोण हे प्रपंचविज्ञानात महत्त्वाचे असते. समर्थांच्या काळाचा विचार केला तर राजा कोण, राज्य कुणाचे, याला अतिशय महत्त्व होेते. तत्कालीन परधर्मीय म्लेंच्छांनी हिंदू धर्म, देवळे यांची मोडतोड, त्यांचे वित्तहरण, जीवितहरण, स्त्रियांची विटंबना वगैरे अत्याचार सर्रास चालवले होते आणि त्या अत्याचारांना पाठीशी घालणारे म्लेंच्छ राजे व त्यांची राज्यसत्ता होती. त्यावरून राजाला आणि राज्यसत्तेला किती महत्त्व आहे हे ध्यानात येते. राजा आणि त्याची सत्ता चांगली नसेल तर माणसाला धडपणे जगता येणार नाही, हे ओघाने आलेच!
त्या पडत्या काळातही भागवत धर्माने हिंदू संस्कृतीरक्षणाचे महत्त्वाचे कार्य केले, याबद्दल दुमत नाही. तथापि म्लेंच्छांच्या प्रादेशिक, राजकीय व सांस्कृतिक आक्रमणांना थोपवण्याचे कार्य भागवत धर्माला करता आले नाही. त्या आक्रमणांचा प्रतिकार करण्याच्या कामात भागवत धर्माला यश आले नाही. भागवत धर्मात ‘समत्वबुद्धी’चा अतिरेक झाला. त्यामुळे ‘कोण आपला’ आणि ‘कोण परका’ याचे भान राहिले नाही. कोण खरा मित्र आणि कोण शत्रू हा आपपर भाव मावळला. परिणामत: समाजात उदासीनतेची, वैफल्याची लाट पसरली. अशा रीतीने प्रपंचाबरोबर परमार्थाचीही अपरिमित हानी झाली. हे रामदासांनी तीर्थाटनाच्या व भ्रमंतीच्या काळात पाहिले, अनुभवले. त्यामुळे रामदासांनी प्रपंचविज्ञानात राजकारणाचाही समावेश केला. रामदासांचा ‘प्रवृत्तीवाद’ त्यांनी व्यापक स्वरुपात मांडून त्यात राजकारणही आाणले. रामदास मूलत: भक्तिमार्गी संत असले तरी त्यांनी ‘समत्वबुद्धी’चा व्यवहारात अतिरेक केला नाही. प्रवृत्ती व निवृत्ती यामधील भेद स्पष्ट करताना रामदास सांगतात,प्रवृत्तीस पाहिजे राजकारण ।

निवृत्तीसी पाहिजे विवरण ।

जेथे अखंड श्रवणमनन ।

धन्य तो काळ ॥यात प्रवृत्तीसाठी राजकारणाचा स्पष्टपणे उल्लेख आहे. दुसर्‍या एका ठिकाणी रामदासांनी हाच विचार पुढे नेला आहे. ‘प्रपंची जाणे राजकारण । परमार्थी साकल्य वितरण।‘ असे ते म्हणतात. राजकारणाला आवश्यक असलेली प्रवृत्ती तत्कालीन समाजात दिसून येत नव्हती. म्हणून तिचे पुनरुज्जीवन रामदासांनी अत्यंत मेहनतीने केले. बायका, मुलं, कुटुंब हे परमार्थमार्गातील धोंडे आहेत, असा एक समज तत्कालीन लोकांमध्ये पसरला होता. त्यातून प्रपंचावर हीनत्वाचा आरोप आला होता. प्रपंचावरील हा हीनत्वाचा आरोप रामदासांनी उडवून लावला. एवढेच नव्हे, तर जनमताचा ओघ त्यांनी बदलला. जनमताचा ओघ विरुद्ध दिशेने वळवणे व आपल्याला पाहिजे त्या दिशेने नेणे हे साधे-सोपे काम नाही. समर्थांनी परमार्थ विचारातील हे काम आपल्या वाणीने आणि कृतीने केले, हे सर्वजण जाणतात.रामदासांच्या प्रपंचविज्ञानाच्या विवेचनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रतिपादलेली ‘सावधानतेची तरफदारी.’ राजकारणात अखंड सावध राहावे लागते. शिवाजी महाराजांच्या ठिकाणी ही सावधानता सदैव होती म्हणून ते अनेक वेळा कठीण प्रसंगांतून सहिसलामत सुटले. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांची अफजलखानाबरोबर भेट ठरली होती. तेव्हा कुणीही तलवार बरोबर आणायची नाही, असे ठरले होते. पण, खान आपला शब्द पाळणारा नाही, हे शिवरायांना माहीत होते. तो ऐनवेळी काहीतरी दगाफटका करेल, या विचाराने शिवाजी महाराजांनी सावधगिरी म्हणून बोटात ‘वाघनखे’ ठेवली होती. भेटीत खानाने हसून आलिंगन देण्याचे नाटक करून महाराजांची मान एका हाताने दाबून दुसर्‍या हाताने महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. येथेही महाराजांनी अंगरख्याच्या आत चिलखत घालण्याची सावधगिरी बाळगल्याने खानाचा वार फुकट गेला. नंतर शिवरायांनी बोटातील वाघनखांच्या साहाय्याने खानाचा कोथळा बाहेर काढला. तो इतिहास सर्वांना माहीत आहेच. म्लेंच्छांच्या कपटी स्वभावाची पूर्ण ओळख असल्याने ‘अखंड सावध’ राहण्याचा इशारा देणारे रामदास हेच एकमेव संत त्याकाळी होते.


म्लेंछ दुर्जन उंदड ।

बहुना दिसांचे माजले बंड ।

या कारणे अखंड । सावधान असावे ॥रामदासांच्या प्रपंच-विज्ञानात राजकारणही अंतर्भूत असल्याने राजकारणातील सावधानता त्यांनी सांगितली. दासबोधातील १८.६ या समासातील ओवी क्र. ३ ते १० या ओव्या अफजलखान-शिवाजी महाराज यांच्या भेटीच्या वेळच्या असाव्यात, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यातही सावधानतेचा व विचारपूर्वक कार्य करण्याचा विचार समर्थांनी मांडला आहे. त्या ओव्या अशा आहेत-


तुंड हेकांड कठोर वचनी ।

अखंड तोले साभिमानी ।

न्याय नीति अंतःकरणी ।

घेणार नाही ॥

ऐसे लौंद बेइमानी ।

कदापि सत्य नाही वचनीं ।

पापी अपस्मार जनीं ।

राक्षेस जाणावे ॥


तोंडाळ, हेकट, गर्वाच्या मदाने झुलणारा, मनात नीती-न्यायाची चाड नसलेला, दुष्ट, बेइमानी, बेभरवशाचा, बोलण्यात खरेपणा नसलेला, लहरी, पापी, समाजातील राक्षस हे वर्णन अफजल खानाशिवाय दुसर्‍या कोणाचे असणार? तसेच त्यापुढील येणार्‍या ओव्या शिवाजी महाराजांना उद्देशून आहेत, हे त्यातील भावार्थावरून स्पष्ट होते -


बरे, ईश्वर आहे स्वाभिमानी ।

विशेष तुळजाभवानी ।

परंतु विचार पाहोनी । कार्य करावे ॥


हा (अफजल खान) देहाने वृत्तीने राक्षस आहे, तरी ईश्वराला आपला व आपल्या कार्याचा अभिमान वाटतो. तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे. तुम्ही नेहमी सावधानता बाळगता तेव्हा आणखी काय सूचना करावी.


अखंडचि सावधाना ।

बहुत काये करावी सूचना ।

परंतु काही येक अनुमाना ।

आणिले पाहिजे ॥


क्षात्रधर्म वर्णन करताना समर्थांनी झुंजार भाषाशैलीचा प्रयोग केला आहे. ‘जशास तसे’ असा समर्थांचा अभिप्राय आहे.‘शठे शाठ्यम् समाचरेत्’ ही शाठ्यनीती श्रीकृष्णांनी यापूर्वी महाभारतात दाखवून दिली आहे. भगवद्गीतेत या स्वरुपाची विचारसरणी आढळते.

 


ये यथा मां प्रपद्यते । तांस्तथैव भजाम्यहम् ॥ (४.११)

भक्तिमार्ग पंथातील लोक भले या श्लोकाचा अर्थ, ‘जे लोक मला ज्याप्रकारे भजतात, तसाच मीही त्यांना भजतो’ असा सांगोत. पण, मुत्सद्दी श्रीकृष्णाला या श्लोकात ‘जे माझ्याशी ज्या प्रकारे वागतात, तसाच मी त्यांच्याशी वागतो,’ असे ‘जशास तसे’ हे सांगायचे आहे. ‘शठे शाठ्यम् समाचरेत्।’ ही शाठ्यनीती भगवान श्रीकृष्णांनी कौरव-पांडवांच्या युद्धप्रसंगी दाखवली आहे. समर्थांनीही पांडित्य व मुत्सद्देगिरी राजकारणात सांगून त्यांना प्रपंचविज्ञानात समाविष्ट केले. राजकारण करणे हे भोळसर लोकांचे काम नाही, याची समर्थांना कल्पना होती.

ही धूर्तपणाची कामे ।

राजकारण करावे नेमे ।

ढिलेपणाच्या संभ्रमे । जावो नये ॥

समर्थांच्या प्रपंचविज्ञानात नुसत्या मुत्सद्दीपणाला स्थान नाही. त्या मुत्सद्दीपणाला तलवारीची म्हणजे शक्तीची जोड हवी. युक्तीला शक्तीची जोड नसेल तर ते व्यर्थ. त्याचप्रमाणे चतुर, सावध, दक्ष, युक्ती आणि शक्तीयुक्त पराक्रमाची योजना ही थोर उद्देशाने केली पाहिजे. समर्थांचे प्रपंचविज्ञान हे सर्वार्थाने लोकांचे समाजाचे आणि संस्कृतीचे भले करणारे आहे.


- सुरेश जाखडी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.