तेजाची आरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Feb-2020
Total Views |


bapurao lele_1  



बापूराव लेले अर्थात माझे बापूकाका. खरेतर ते माझे मामेसासरे, पण खर्‍या अर्थाने ते कायम माझे काकाच राहिले. हे नाव उच्चारता डोळ्यांसमोर असंख्य आठवणींचा पट उलगडत गेला. त्यांच्यासारख्या थोर व्यक्तीच्या जन्मशताब्दीनिमित्त मी काही लिहावे, असे जेव्हा सुचवले गेले, म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते. कारण, खरोखरच आजच्या संघाच्या आणि पत्रकारितेच्याही पिढीला, त्यांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या जीवनपद्धतीची, ‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने’ अशा व्रताची थोडीशी तरी ओळख व्हावी असे प्रकर्षाने वाटले.



घराच्या उबदार
, सुरक्षित वातावरणातून दहावी-बारावीत साधारणपणे आपण बाहेर पडतो, तेव्हा आयुष्यात नेमके काय करायचे, याबाबत बरेचदा मनात संभ्रम असतो. त्या वयात काकांनी ‘मी प्रचारक म्हणून बाहेर पडणारअसा निर्णय घेऊन टाकला होता आणि तो आयुष्यात शेवटपर्यंत पाळला. खरेतर हा असा निर्णय घरच्यांना कितीतरी त्रासदायक ठरणारा होता. घरातला मोठा मुलगा शिकून-सवरून घराला हातभार लावेल असेच दृश्य होते. परंतु, तसे होणे नव्हते. प. पू. डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते मुंबईला आले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले.



प्रचारक म्हणजे काय
, त्याने कसे राहायचे इत्यादी गोष्टींचे कुणी कितीही प्रशिक्षण दिले घेतले, तरीही ते ज्याचे त्यानेच जगायचे असते आणि त्यात किती खाचखळगे असतात हे अनुभवायचे असतात. तर रा.स्व.संघाच्या मुशीतून, पडेल ते काम उत्तमपणे करण्यातून, प्रचंड जनसंपर्कातून, संयमातून, प्रचारक जीवनाच्या मर्यादेतून आणि जीवनाच्या असंख्य खाचखळग्यातून तावूनसुलाखून निघालेल्या असंख्य प्रचारकरत्नांपैकी एक माझे काका! खरे तर ते समर्थ रामदास स्वामींच्या महंत परंपरेचे पाईकच होते असे मी म्हणेन. निष्काम कर्मयोग, स्थितप्रज्ञता, अखंड सावधपण, दुसर्‍यास प्रोत्साहित करणे, तोंडावर कुणाचीही स्तुती न करणे यांसारखे गुण त्यांच्या ठायीठायी होते.



माझ्या वडिलांचा कै
. मो. ग. तपस्वी आणि काकांचा स्नेह, घरोबा फार जुना. दोघेही जळगावचे, दोघे प्रचारक म्हणून बाहेर पडलेले, पण काका शेवटपर्यंत प्रचारकच राहिले. माझ्या लहानपणापासून त्यांचे कायम आमच्याकडे येणेजाणे असायचे. पण, तेव्हा मला ते फक्त बाबांचे एक मित्र म्हणूनच माहीत होते. एवढे नक्की माहीत होते की, आण्णांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असायचे ते, बापूकाका. किंबहुना, दोघे एकमेकांसाठी नेहमी उपलब्ध असायचे. आज मला जाणवतंय की, संघाचे काम हे २४ तासांचे असते आणि पत्रकारिता ही देखील अहोरात्र चालणारे काम असते, म्हणजे मी तरी ते तसे पाहिले आहे. मग प्रश्न असा येतो की, ही दोन्ही कामे काकांनी कशी साधली असतील? ‘२४ द ७’ हा आज परवलीचा शब्द झाला आहे. परंतु, १९३६ मध्ये मुंबईत दाखल झाल्यापासून ते २००१च्या प्रदीर्घ कालखंडात काका असेच अहोरात्र कामात मग्न असायचे. विमानतळापासून स्थानकापर्यंत सोडायला-घ्यायला, दवाखान्यात बसायला, खाऊ आणून द्यायला, बातम्यांचा मागोवा घ्यायला, वार्तापत्र लिहायला, पत्रकार परिषदेत नेमके प्रश्न विचारून अचूक बातमी टिपताना, अचाट पत्रव्यवहार करताना, त्यांनी कधी आपल्या व्यस्तपणाचा बाऊ केला नाही, देखावा तर कधीच नाही.



काकांच्या कामाचा आवाका’ आणि ‘काका’ काही अंशी आणीबाणीच्या काळात समजायला लागले. त्यावेळी संवाद केंद्र याचे ते मुख्य. भूमिगत आणि बाहेर असलेल्या प्रचारक, नेते इत्यादी मंडळींचा संपर्क हे त्यांचे मुख्य काम. ‘काही अंशी’ म्हणते, कारण तसे त्यांना समजून घेणे इतके सोपे नाही. अनेकदा आमच्या घरी संघ कार्यकर्त्यांच्या, श्रेष्ठींच्या गुप्त बैठका होत असत. फोनवर काका “हॅलो” म्हटल्यावर कायम “नमश्कार जी” असे म्हणायचे. ही त्यांची ओळख बनून गेली होती. पण, आणीबाणीत आपल्याला कुणी यावरून ओळखू नये म्हणून त्या शब्दाचा उच्चार पूर्णपणे बंद केला होता आणि फोनवर नुसते ‘आज तीन’ किंवा ‘आज पाच’ एवढाच उच्चार करायचे. यावरून आम्ही समजून जायचो की आज तीन वा पाच माणसे जेवायला येतील. एकदा तर घरात बैठक सुरू होती आणि मी खिडकीत अशीच उभी असता मला समोरच्या दुकानाबाहेर पोलीस दिसले. ते सतत आमच्याच घराकडे बघत होते. बैठक लांबत होती, तशी पोलिसांची चुळबुळ वाढत होती. शेवटी काकांना हळूच बाहेर बोलावून दाखवले. तसे ते स्वत: त्या दुकानातून काहीतरी घेण्याच्या निमित्ताने तिथे गेले आणि पाच मिनिटांमध्ये परतले. बैठक पार पडली आणि मंडळी त्या दुकानाच्याच पदपथावरून चालत निघून गेली. त्या क्षणीची ती धडधड, तो थरार आजही जसाचा तसा अनुभवता येतो. पण, त्या क्षणी काकांचे ते धाडस, सावधगिरी सर्वच वाखाणण्याजोगे होते.



काकांचे घर म्हणजे
६२ काका नगर, नवी दिल्ली.’ घर कसले ब्रह्मचार्याची मठी होती ती! या मठीचे दार सतत उघडे असायचे. कुणी दार अथवा बेल वाजवलीच तर आतून आवाज यायचा ‘खुला हैं।’ सतत चालू असलेला त्यांचा रेडिओ, (काकांना संगीताची चांगलीच जाण होती, ते पेटी उत्तम वाजवायचे, साथीला बसू शकतील एवढी खरेतर त्यांची तयारी होती. पण, भली भली प्रलोभने ज्याला रोखू शकली नाहीत, तिथे पेटी काय चीज होती...) भली मोठ्ठी वायर असलेला त्यांचा फोन, घरभर पसरलेली कागदपत्रे आणि वर्तमानपत्रे यांचे ढिगारे, पिशव्या, पिशव्यांमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ, भल्या मोठ्या स्वयंपाकघरात त्यांचा एक कुकर आणि मोजकीच चार-पाच भांडी. त्यांच्या या घरात असंख्य माणसे येऊन राहून गेली आहेत. त्या सर्वांचा काकांनी जमेल तेवढा पाहुणचार केला. त्यांचे घर आवरून देऊ म्हटले तर त्यांना ते अजिबात आवडायचे नाही आणि गंमत म्हणजे एखादा लेख, कात्रण मागितले की ते त्या ढिगार्‍यातून लगेच काढून आणून द्यायचे. “असू दे मी माझ्या खुणेने ठेवले आहे, मला बरोबर सापडते,” असे ते नेहमी म्हणायचे.



काका खाण्यापिण्याचेही दर्दी होते
. ‘देव देव’ त्यांनी केल्याचे आठवत नाही, पण चतुर्थी मात्र नियमित करायचे. आईचीही चतुर्थी असायची, तेव्हा ते बरेचदा आमच्याकडे रात्रीच्या जेवायला असायचे. त्यांच्या जेवण्याची एक गंमत होती. सर्व पदार्थांचा आधी आस्वाद घ्यायचे आणि मग सगळ्याचा काला करायचे. मी म्हणायचेसुद्धा, “अहो काका, असा काय काला करून खाता?” त्यावर म्हणायचे, “जाऊ दे गं, सगळे पोटातच तर जाणार आहे.” आज असे जाणवते की कशाची आसक्ती नको किंवा मोह नको म्हणून समर्थ रामदास स्वामी किंवा गजानन महाराजांप्रमाणेच ते प्रत्यक्षात जगत होते. न जाणो या भुकेची लालसेने, इच्छेने मला माझ्या व्रतापासून विचलित केले तर!!



पन्नासच्या दशकात दिल्लीत आलेले काका तिथे कसे स्थिरावले असतील याचा आज विचार केला तर स्तिमित व्हायला होते
. आजही दिल्लीत नव्याने स्थायिक होण्यास महाराष्ट्रातल्या लोकांची तशी तयारी नसते, तेव्हाचा तर काळच वेगळा होता. आधी पायी, मग सायकल आणि मग त्यांच्याकडे होती त्यांची सदाबहार स्कूटर. ही त्यांची स्कूटर एकदा चोरीला गेली तेव्हा अगदी शांत होते. किंबहुना, जरा काळजीत होते. म्हणाले, “ती स्कूटर चोराला परवडणारी नाही, देईल वाटेत सोडून. कारण, ती सारखी बंद पडते आणि पुन्हा सुरू करणे त्याला जमणार नाही आणि त्याला अपघात झाला तर?” फोनवर कायम ‘नमश्कारजी’ म्हणणे, त्यांची ती सदाबहार खटारा स्कूटर यावरून काकांना सहज ओळखता ये असे. तसेच लोकांच्या गर्दीतही पायजमा कुर्ता आणि वर खादीचे जाकीट असलेली व्यक्ती म्हणजे काकाच हे सहज ओळखता येत असे. दिल्लीचा उन्हाळा असो, पावसाला असो किंवा अंग गोठवणारी थंडी असो काकांच्या या पेहराव्यात कधीही बदल झाला नाही. थंडीत जाकीट तेवढे बदलायचे गरम यायचे आणि हातात हातमोजे पायात अंगठा असलेले पायमोजे आणि कोल्हापुरी पायताणे. या व्यतिरिक्त अन्य कुठल्या पोशाखात मी काकांना पाहिल्याचे आठवत नाही.



काकांचा पत्रव्यवहार हाही एक उल्लेखनीय विषय आहे
. माझ्या बाबांनी त्यांना ‘संपर्कनारायण’ अशी उपाधी बहाल केली होती. पत्रकारितेत त्यांच्या उमेदीच्या काळात पत्रव्यवहार हा एकमेव संपर्काचा मार्ग उपलब्ध असे. तसे टेलिफोन सुविधा असायची, पण ती केवळ ‘तरुण भारत’च्या कामासाठी राखीव असायची. कारण, ‘तरुण भारत’ला खर्च परवडणारा नसायचा. हेच ब्रीद माझ्या वडिलांचेही होते. आम्हा घरच्या मंडळींना त्याचा वापर करण्याची फारशी परवानगी नसायची. ‘तरुण भारत’शी इतकी बांधिलकी होती की घरातल्यांचा रोषही ते पत्करायला असायचे.



पत्रव्यवहारातही पोस्टकार्डावर अधिक भर असायचा
. अतिशय सुवाच्च सुंदर अक्षरात लिहिलेली त्यांची पत्रांच्या डाव्या कोपर्‍यात पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिनांक असे. दिवसाकाठी ते किमान २०-२५ पत्रे तरी रोज लिहीत असत. निरोपवजा मजकुरात क्रमांक घातलेले मुद्दे असायचे. अनेकदा स्मरणपत्रही असायची. काकांचे पाकीट आले की त्यात घरातल्या सगळ्यांसाठी उपयुक्त अशी कात्रणे असायची. एवढ्या प्रचंड व्यापात ते आवडीनिवडी कशा काय लक्षात ठेवायचे? त्यासाठी लागणारे वाचनही नक्कीच करत असणार. रेल्वे प्रवासात (क्वचितच असायचा) ते सतत पत्रलेखन करीत बसायचे. कारण, असा निवांत वेळ एरवी मिळत नाही, असे ते म्हणायचे. सध्या पॅसेंजर ट्रेनने जायचे आणि जवळ जवळ प्रत्येक स्थानकावर त्यांना भेटायला कुणी न कुणीतरी यायचेच. आजच्या मोबाईलच्या काळात त्यांनी तो कदाचित वापरला नसता किंवा धमाल उडवून दिली असती!! पण, त्यांची पत्रे हा आम्हा सर्व नातेवाईकांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. प्रत्येकाची मनस्थिती ओळखून त्याप्रमाणे ते सल्ला देत असत. म्हणजे फक्त सुचवत असत.



रा
. स्व. संघाचे प्रचारक, त्यातून पत्रकार, त्यामुळे काका घरातल्या लोकांच्या वाट्याला फारसे आलेच नाही. संघकार्याचे वेड डोक्यात घेऊन मनीमानसी ते भिनवून घरदार सोडल्यावर काका फारसे घरी कधी आलेच नाही. आपण सामान्यजनांना ‘मी’, ‘माझे घर’, ‘माझी माणसे’ यांचा मोह सुटतासुटत नाही, काकांनी तो एका ध्येयासाठी सोडला तो मागे फिरून न बघण्यासाठीच! जेवढा अफाट निग्रह असेल तेवढेच अचाट समर्पणही होते. विकल्या गेलेल्या आजच्या पत्रकारितेच्या उत्तरोत्तर घसरत चाललेल्या काळात काका नाहीत, हे एका अर्थाने बरेच आहे असे वाटते. कारण, त्यांना हे सहन झाले नसते. अर्थात, हार मानणार्‍यातली ती पिढी नव्हती, वेगळ्या सामर्थ्याने, त्यांचा लेखणीला धार चढली असती हे नक्की! काका आम्हा सर्व कुटुंबीयांना, सतत देत राहिले, इतके की ते ओंजळीत सामावण्याची आमची पात्रता नाही. आम्ही सर्व त्यांच्या या ऋणातच राहणे पसंत करू. त्याग, समर्पण, ध्येयासक्ती, निष्ठा, बांधिलकीच्या सत्त्वगुणांनीयुक्त या तेजाला सलाम. त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

-
- सुनीता परांजपे

@@AUTHORINFO_V1@@