राष्ट्रवादी चिंतक, व्रतस्थ पत्रकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2020
Total Views |

K R Malkani_1  
 
 
सरकारची झोप उडविणे हेच पत्रकारितेचे कर्तव्य आणि सामर्थ्य. मलकानी यांच्या पत्रकार म्हणून सरस कामगिरीचा तो पुरावा; अर्थात मलकानी यांचे आयुष्य बहुढंगी होते. १९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे नि त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करणे आवश्यक ठरते.
 
 
आणीबाणीला यंदा ४५ वर्षे पूर्ण झाली. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य यांचा संकोच करणारा तो कालखंड होता. माध्यमांवर त्यावेळी सेन्सॉरशिपचे कठोर निर्बंध होते आणि सरकारी परवानगीशिवाय कोणतेही वृत्त प्रसिद्ध करणे अशक्य होते. तथापि, तशा त्या काळातही काही पत्रकार आणि वृत्तपत्रे यांनी आपल्या परीने आणीबाणीला विरोध केला. मात्र, काहींनी त्या हुकूमशाही राजवटीसमोर सपशेल लोटांगण घातले. कोणताही प्रतिकार करण्यास ते धजावले नाहीत. आणीबाणीनंतर पत्रकारांच्या एका गटासमोर बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी, अशा नेभळट पत्रकारांना उद्देशून म्हटले होते, “त्यांनी तुम्हाला वाकायला सांगितले, तुम्ही तर रांगायला लागलात.” अर्थात, सगळेच काही रांगले नाहीत. काही वाकले, काही झुकले, काही रांगले. पण, काहींनी आपल्याला कणा असल्याचे दर्शनही घडविले. अशात ज्यांचे नाव अग्रतेने घ्यावे लागेल ते होते के. आर. मलकानी. त्यावेळी ‘मदरलँड’ या वृत्तपत्राचे संपादक असलेल्या मलकानी यांना आणीबाणीत केवळ अटक झाली असे नाही; तर आणीबाणी लागू झाल्यावर अटक होणारे ते पहिले पत्रकार होते. सरकारची झोप उडविणे हेच पत्रकारितेचे कर्तव्य आणि सामर्थ्य. मलकानी यांच्या पत्रकार म्हणून सरस कामगिरीचा तो पुरावा; अर्थात मलकानी यांचे आयुष्य बहुढंगी होते. १९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे नि त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करणे आवश्यक ठरते.
 
 
 
मलकानी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२१ रोजी आता पाकिस्तानमध्ये असलेल्या सिंध प्रांतात झाला. सिंध येथील शाळेसह पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. १९६१-६२ दरम्यान ते हार्वर्ड येथे निमन फेलो होते. भारतीय जनसंघाशी त्यांचा निर्मितीपासून संबंध आला आणि पुढे भाजपची स्थापना झाली, तेव्हाही ते त्या पक्षाशी निगडित होते. भाजपचे ते काही वर्षे उपाध्यक्ष होते आणि राज्यसभेचे सदस्यही होते. दीनदयाळ संशोधन संस्थेशी त्यांचा संबंध होता. पुढे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार केंद्रात सत्तेत असताना त्यांची नियुक्ती पुद्दुचेरीचे ‘नायब राज्यपाल’ म्हणून करण्यात आली. त्या पदावरच असताना त्यांचे २००३ मध्ये २७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. या सगळ्या जबाबदार्‍या मलकानी यांनी समर्थपणे सांभाळल्या असल्या, तरीही त्यांचा मूळ पिंड हा चिंतकाचा आणि लेखकाचा होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी अध्यापन अवश्य केले. पण, लवकरच ते ‘हिंदुस्थान टाईम्स’मध्ये उपसंपादकपदी रुजू झाले आणि नंतर ‘ऑर्गनायझर’ या संघविचाराच्या पत्रात दाखल झाले. ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी पत्राचे ते प्रदीर्घ काळ संपादक होते. त्यांचे चिंतन, लेखन आणि पत्रकारिता ही हिंदुत्ववादी विचारधारेशी निष्ठा असणारी होती आणि त्याला कारणीभूत होता तो त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आलेला संबंध. १९४१ मध्ये ते संघाचे स्वयंसेवक झाले.
 
 
 
फाळणीनंतर सिंधी समाजाला पाकिस्तानातून भारतात यावे लागले. फाळणीची ती बोच त्यांच्या मनात कायम राहिली आणि पुढे त्यांनी जेव्हा पुस्तक लेखन केले, तेव्हा हे विषय त्यांनी हाताळले. त्यांच्या नावावर असणारी पुस्तके पाहिली तरी त्यातील वैविध्य जसे दृग्गोचर होईल, तद्वत त्यांची चिंतनशीलताही अधोरेखित होईल. ‘दि सिंध स्टोरी’ हे त्यांचे पुस्तक गाजले. सिंधचा सारा इतिहासच मलकानी यांनी ओघवत्या भाषेत या पुस्तकात उभा केला. कवी शेख अयाज यांनी या पुस्तकाचा गौरव करताना म्हटले की, “प्रत्येक सिंधी घरात असलेच पाहिजे, असे हे संग्राह्य पुस्तक आहे.” खुद्द मलकानी यांनी प्रस्तावनेत म्हटले होते: “हे पुस्तक राजांचे आणि युद्धाचे वर्णन करणारे नाही; हे पुस्तक सिंध प्रदेश, तेथील माणसे, तेथील संस्कृती यांची ओळख करून देणारे आहे.” संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा कराची दौरा फाळणीपूर्वी नऊच दिवस कसा झाला होता, याचे वर्णन मलकानी यांनी त्यात केले आहे. सिंधने संघाला कसे अनेक कार्यकर्तेरूपी रत्न दिले, याचीही माहिती पुस्तकातून मिळते. ‘दि आरएसएस स्टोरी’ हेही पुस्तक त्यांच्या नावावर जमा आहे, त्याप्रमाणेच ‘पोलिटिकल मिस्टेरीज’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. महात्मा गांधी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रभृतींच्या हत्यांमागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न मलकानी यांनी त्या पुस्तकातून केला; अर्थात हे पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. या पुस्तकांखेरीज जे महत्त्वाचे पुस्तक मलकानी यांनी लिहिले ते म्हणजे, ‘दि मिडनाईट नॉक.’ आणीबाणीच्या कालखंडावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आणि हा विषय मलकानी यांच्या दृष्टीने अनेक अर्थाने ज्वलंत होता. एक तर पत्रकार म्हणून त्यांच्यावर आणि एकूणच माध्यमांवर आलेले निर्बंध, ज्या संघटनेवर त्यांची अढळ निष्ठा होती, त्या संघावर आलेली बंदी आणि मध्यरात्री खुद्द त्यांना आणीबाणीत झालेली अटक, या त्रिमिती त्यांच्या या लेखनामागील प्रेरणा होत्या. पत्रकार म्हणून आणि प्रामुख्याने ‘ऑर्गनायझर’ आणि पुढे ‘मदरलँड’ या पत्रांचे संपादक म्हणून मलकानी यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याची किंमतही त्यांनी मोजली.
 
 
 
‘ऑर्गनायझर’ हे संघविचाराचे पत्र. मात्र, ज्या काळात मलकानी संपादक होते, तो काळ संघाला समाजात स्वीकृती असणारा नव्हता. किंबहुना, संघावर अधिकाधिक संकटे कशी येतील, याचेच प्रयत्न करणारे सत्तेवर होते. काँग्रेसची आणि नेहरूंची लोकप्रियता कमालीची होती. अशा काळात सत्ताधार्‍यांना प्रश्न आपल्या वृत्तपत्रातून विचारणे, सरकारच्या धोरणांवर टीका करणे, याला निर्धार आणि पोलादी वृत्ती लागते. मलकानी यांनी त्या काळात लिहिलेले अग्रलेख पाहिले, तर त्यातून मलकानी यांची ही निडर वृत्ती दृग्गोचर होतेच; पण पत्रकारितेचे कर्तव्य हे सरकारची री ओढणे नाही, ही जाणीवही आढळते. आपण अल्पमतात असलो तरीही आपल्या तत्त्वांवर आणि मूल्यांवर निष्ठा असल्याशिवाय हे शक्य नसते. यात सरकारी नाराजी पत्करण्याची शक्यता असते आणि कटू होण्याची भीती असते. मात्र, पत्रकारितेचे व्रत सांभाळलेल्या मलकानी यांनी ‘ऑर्गनायझर’ला ‘सत्तेचे धिंडवडे निडरपणे काढणारे पत्र’ असे स्वरूप दिले आणि ते स्वतः त्यात बिनीचे शिलेदार होते.
 
 
 
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी ‘बालदिन’ साजरा करण्याच्या निर्णयाचा मलकानी यांनी खरपूस समाचार घेतला. रशियन नेते क्रुसचेव्ह आणि बुल्गानीन हेही त्याच सुमारास भारतात येणार होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आणि ‘बालदिन’ साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रंगीत तालमीसाठी रोज आणले-नेले जात होते. १९५५ मध्ये लिहिलेल्या एका संपादकीयात मलकानी यांनी लिहिले होते, “रोज विद्यार्थ्यांना कुतुब मिनार जवळच्या मैदानात हसण्याच्या, टाळ्या वाजविण्याच्या, घोषणा देण्याच्या, हार घालण्याच्या रंगीत तालमीसाठी नेण्यात येते, हे म्हणजे बालदिनाच्या सबबीखाली लहान मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. शिवाय पंडित नेहरू यांचाच वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यामागे काय तर्क आहे? हयात नेत्याचा वाढदिवस राष्ट्रीयस्तरावर साजरा करायचाच असेल, तर मग तो राष्ट्रपतींशिवाय कोणाचाही असता कामा नये.” बालदिन साजरा करायचाच, तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साजरा करावा, अशी सूचनादेखील मलकानी यांनी आपल्या संपादकीयात केली होती. याहून अधिक नि:संदिग्ध भूमिका संपादक म्हणून काय असू शकते? डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या गूढ मृत्यूनंतर लिहिलेल्या संपादकीयात मलकानी यांनी, “मुखर्जी यांच्या मृत्यूच्या कितीही चौकश्या केल्या, तरीही जनतेने जो नेता गमावला आहे तो परत येऊ शकत नाही,” अशी वेदना व्यक्त केली होती. मुखर्जी यांनी आपल्या नेतृत्वाखाली जनसंघाचा विस्तार एका नवख्या पक्षापासून काँग्रेसच्या राजवटीला पर्याय ठरू शकेल इथवर कसा केला, याचाही गौरव त्यांनी या संपादकीयात केला. ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिक केवळ वैचारिक जडत्व देणारे न होता, अन्य प्रकारचे सकस साहित्य देणारेही असावे, या कल्पनेतून त्यात चित्रपट समीक्षा द्यावी, असा विचार त्यांनी केला आणि त्यासाठी निवड केली ती लालकृष्ण अडवाणी यांची. अडवाणी स्वतः तेव्हा ‘ऑर्गनायझर’मध्ये काम करीत होते. मलकानी यांनी त्यांना एक दिवस बोलावून सांगितले की, “आपले साप्ताहिक खूपच राजकारणप्रधान झाले आहे; त्यात वैविध्य आणण्यासाठी एक स्तंभ चित्रपट समीक्षेवर सुरू करावयास हवा. तुम्ही चित्रपट पाहता; तुम्हीच हा स्तंभ का चालू करीत नाही?” अडवाणी ‘ऑर्गनायझर’मधून ‘सिने-नोट्स’ हा स्तंभ टोपण नावाखाली चालवू लागले.
 
 
 
‘ऑर्गनायझर’प्रमाणेच ‘मदरलँड’ या संघविचारांच्या पत्राचे संपादक म्हणून मलकानी यांनी उत्तम कामगिरी बजावली. कुमी कपूर यांनी लिहिलेल्या ‘दि इमर्जन्सी : ए पर्सनल हिस्ट्री’ या पुस्तकात मलकानी यांच्याविषयी लिहिले आहे. त्या लिहितात, “३० जानेवारी, १९७५ एवढ्या अगोदर ‘मदरलँड’मध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते आणि ते म्हणजे जयप्रकाश नारायण यांना अटक करण्याची योजना होत असल्याचे. अर्थात, ती खबर त्यावेळी ‘इंडियन एक्सप्रेस’लादेखील कळलेली होती. मात्र, त्यांनी ती न प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला तर माध्यमांतील अनेकांनी ‘मदरलँड’मधील वृत्त अतिरंजित असल्याचा पवित्रा घेतला. २५ जून, १९७५ रोजी रात्री आणीबाणी लागू झाली आणि २६ जूनच्या मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी मलकानी यांना त्यांच्या राजेंद्र नगरमध्ये असणार्‍या निवासस्थानी जाऊन झोपेतून उठविले आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले. मलकानी यांनी ‘मदरलँड’च्या कार्यालयात दूरध्वनी केला, जेणेकरून संघ आणि त्याबरोबरच ‘युएनआय’ आणि ‘पीटीआय’ सारख्या वृत्तसंस्थांपर्यंत ही बातमी पोहोचावी. इतर अनेकांना या बातमीचा उपयोग झाला. कारण, अशी अटक आपल्यावर ओढवू नये म्हणून ते सतर्क झाले. मलकानी पोलीस स्थानकात पोहोचले आणि पुढे त्यांची रवानगी रोहतक कारागृहात करण्यात आली. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर पहिली अटक झाली ती मलकानी यांना.”
 
 
 
‘मदरलँड’चे संपादक म्हणून मलकानी यांनी इंदिरा गांधी सरकारचे धिंडवडे काढणारे अनेक वृत्तान्त प्रकाशित केले होते, ज्यात जयप्रकाश नारायण यांच्या संभाव्य अटकेचे वृत्त होतेच; पण तत्कालीन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांच्या हत्येमागे राजकीय कारस्थान असल्याचेही होते आणि नगरवाला प्रकरणाचेही होते. हे सगळे वृत्तान्त काँग्रेस आणि मुख्यतः गांधी कुटुंबाला अस्वस्थ करणारे होते, यात शंका नाही. तेव्हा मलकानी यांनी किती निडरपणे व निर्धाराने पत्रकारिता केली होती, याचा अंदाज येऊ शकेल. त्यांनी दिलेले वृत्त पुढे खरेही ठरले. मलकानी यांचे व्रतस्थ आयुष्य होते. मलकानी यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते, “मलकानी हे राष्ट्रवादी विचारांचे चिंतक होते; त्यांचे जीवन म्हणजे राजकीय सक्रियता आणि संशोधनाधिष्ठित लेखन यांचा अनोखा संगम होता.” मलकानी यांच्या आयुष्याचे हे समर्पक वर्णन होय.
 
 
@@AUTHORINFO_V1@@