सिंधूकाठची संस्कृती - वेदपूर्व की वेदोत्तर?

    दिनांक  17-Oct-2020 22:38:22
|

arya_1  H x W:

मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या किंवा आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानातील हडप्पा, मोहेंजोदरो आणि सिंधू खोर्‍यातल्या इतर प्राचीन नागरीकरणाचे अवशेष हे भारताबाहेरील इजिप्त, मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया, असीरिया, सुमेरिया, वगैरे ठिकाणी सापडलेल्या अत्यंत प्रगत संस्कृतीच्या अवशेषांशी समकालीन आहेत, हे पाहिले. याखेरीज सिंधू नागरीकरणात घोडे आणि रथ नाहीत, असे कारण पुढे करून आर्यांनी भारताच्या बाहेरून स्थलांतर करताना आपल्या सोबत ते भारतात आणले, अशा स्वरूपाचे पाश्चात्त्यांचे गृहीतक आणि त्यातले तथ्यसुद्धा आपण पाहिले. त्यांचेच यामधले तिसरे एक गृहीतक म्हणजे, आर्यांनी सिंधू खोर्‍यात आक्रमण केल्यानंतर पुढच्या काळात वेदांची निर्मिती केली. बघूया यात तरी कितपत तथ्य आहे ते....


पाश्चात्त्यांनी सांगितलेला कालक्रम (Chronology)
 
पाश्चात्त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचा जो कालक्रम सांगितलेला आहे, तो कसा आहे? त्याच्या मुळाशी आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धान्त आहे. मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे, इ.स.पूर्व ३००० ते इ.स.पूर्व १८००या दरम्यान भारतात सिंधू खोर्‍यातल्या नगरांशी इजिप्त, मेसोपोटेमिया इत्यादी प्रदेशाचे व्यापारी संबंध तयार झाले. त्या दरम्यान तिथल्या नागरीकरणाचा विकास झाला. पुढे इ.स.पूर्व १८०० ते इ.स.पूर्व १५००च्या दरम्यान कधीतरी मध्य आशियातून आर्य नावाच्या भटक्या टोळ्यांनी तिथे घुसखोरी केली. आर्यांनी तिथल्या मूलनिवासी लोकांना मारून हाकलून स्वत:चे वर्चस्व स्थापन केले. या घटनेनंतर पुढे या नगरांचा र्‍हास झाला. नंतर पुढच्या काळात आर्यांनी वेदांची रचना केली. वैदिक अग्नी, मरुत, वरुण, उषा, इंद्र, आदित्य वगैरे देवता विकसित झाल्या. यज्ञ वगैरे उपासना पद्धती तिथे रूढ केल्या. त्याच्या पुढे कितीतरी शतकांनी हळूहळू त्या वैदिक देवतांचा क्रमिक विकास होत होत पौराणिक देवता बनल्या, त्यांच्या असंख्य कथा बनल्या. इ.स.पूर्व सुमारे ४०० ते इ.स. सुमारे ६०० या सहस्रकात ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘पुराणे’, ‘उपपुराणे’ यांची निर्मिती झाली. त्यामुळे स्वाभाविकपणे यज्ञ आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सिंधू खोर्‍यातल्या उत्खननांमध्ये मिळालेल्या नाहीत. पौराणिक कथांचे पुरावे तर त्यात सापडणे अवघडच! या सर्व वर्णनावरून पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मतानुसार काळाची रेषा काढली, तर ती काहीशी सोबत दिलेल्या चित्राप्रमाणे दिसते.


arya_1  H x W:

प्रत्यक्ष पुरावे काय सांगतात?


आतापर्यंतच्या अनेक लेखांमध्ये आपण पाश्चात्त्य अभ्यासकांची संशोधनाची एक पद्धत पाहिली आहे. ती म्हणजे - आपल्या मूळ हेतूशी विसंगत असे प्रत्यक्षात उपलब्ध झालेले पुरावे आपल्या संशोधनात एकतर दाखवायचेच नाहीत किंवा त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करायचे. यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष समोर मांडायचा. हे करताना मग ‘आर्य’ शब्दाचा मूळचा ‘सज्जन, उदार, थोर, चारित्र्यवान’ असा असलेला अर्थही बदलून तो वंशाचा निदर्शक करावा लागला, तरी बेहत्तर! हे आपण मागे अनेक प्रकरणांचा विचार करताना वारंवार पाहिले आहेच. तीच गोष्ट इथेही पुन्हा दिसते. सनौली/सिनौली (बाघपत, उत्तर प्रदेश) येथील उत्खननात तांब्याच्या तलवारी, शिरस्त्राणे, तीन प्राचीन रथ, काही शवपेट्या आणि काही व्यक्तींची दफने अशा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी अवशेष मिळालेले आहेत. त्यातल्या रथांचा विचार आपण मागे केला. आता दफनांचा विचार करू. या मृत व्यक्तींना उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय करून जमिनीत पुरण्यात आलेले आहे. त्यांच्या डोक्याच्या आणि पायाच्या अवतीभोवती मातीची काही भांडी मिळालेली आहेत. त्यात काही खाद्यपदार्थांचे अवशेष सापडले होते. प्राचीन वैदिक समाजात मृताचे अंत्यसंस्कार करण्याच्या ज्या पद्धती प्रचलित होत्या, त्यात मृतदेह पंचमहाभूतांपैकी एकाला अर्पण करण्याचा भाव दिसतो. ‘दाह’ संस्कारात मृतदेह अग्नितत्त्वाला अर्पण केला जातो, तर इथे मृतदेह पृथ्वीतत्त्वाला अर्पण केलेला दिसत आहे. हा संस्कार ‘शतपथ ब्राह्मण’ या ग्रंथानुसार विधिवत केला गेलेला आहे. अशीच दफने हडप्पा, मोहेंजोदरो (दोन्ही सध्या पाकिस्तानात), कालिबंगन (हनुमानगढ, राजस्थान) इत्यादी ठिकाणीसुद्धा सापडलेली आहेत.


arya_1  H x W:arya_1  H x W:
कालिबंगन, बिंजोर (श्रीगंगानगर, राजस्थान) येथे झालेल्या उत्खननात जे अवशेष मिळालेले आहेत, त्यात चौरसाकृती आणि अष्टकोनी काटछेद असलेले खांबाचे अवशेष दिसतात. ते खांब आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर तिथे कधी काळी ‘वाजपेय’ यज्ञ झाल्याचे सुचवतो. ‘शतपथ ब्राह्मण’ या शुक्ल यजुर्वेदीय ग्रंथात आणि कृष्ण यजुर्वेदाच्या ‘तैत्तिरीय संहितेत’ असे खांब यज्ञात ‘यूप’ म्हणून उभारण्याचे निर्देश आहेत. यावर अतिशय सखोल शोधनिबंध डॉ. श्रीनिवास कल्याणरमण यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामुळे ही प्राचीन नागरीकरणे वैदिक संस्कृतीचेच चित्रण करतात आणि वैदिक संस्कृती उत्तर भारतातील आर्यांच्या तथाकथित आक्रमणाच्या आधीपासूनच तिथे अस्तित्वात होती, यात कोणताही संशय उरत नाही.


फक्त वैदिकच नव्हे, तर पौराणिकसुद्धा

सिंधू खोर्‍यात झालेल्या उत्खननांत असंख्य मुद्रा (Seals) मिळालेल्या आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची चित्रे आहेत. त्यातल्या काही विशेष मुद्रा इथे लक्षात घेण्याजोग्या आहेत. सोबत दिलेल्या चित्रात यांपैकी काही मुद्रा आपण पाहू शकतो. डोक्यावर शिंगांचा मुकूट घातलेला, ऊर्ध्वलिंग अवस्थेत योगमुद्रेत बसलेला, आजूबाजूला वेगवेगळे प्राणी असलेला असा ‘पशुपती शिव’ आपल्याला काही मुद्रांवर दिसतो. इतकेच नव्हे, तर इथे या पशुपतीचे चार चेहरेही या मुद्रांवर दिसतात; अर्थात चौथा चेहरा पाठीमागे गेल्याने मुद्रेवर प्रत्यक्ष अंकन तीनच चेहर्‍यांचे केलेले आहे. हा काय प्रकार आहे? ‘शैव आगम’ आणि ‘पाशुपत दर्शन’ या तत्त्वज्ञानाच्या शाखेनुसार शिवाचे पाच मुखांचे एक गूढ रूप आहे. यात प्रत्यक्षात चार मुखे दिसतात तर पाचवे मुख ‘अमूर्त’ मानले जाते, ते दिसत नाही. ‘सद्योजात’, ‘वामदेव’, ‘अघोर’, तत्पुरुष’ आणि ‘ईशान’ अशी या पाच रूपांची नावेही शैव तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे हा ‘आदियोगी’ चार मुखांचा ‘सदाशिव’ पाचव्या अमूर्त मुखासह पशुपती शिवाच्या रूपाने तत्कालीन लोकांमध्ये अगदी रुळलेला देव दिसतो. ‘वैदिक देवतांचे उन्नयन आणि क्रमिक विकास’ या नावाने सांगितले गेलेले सिद्धान्त इथे आधीच प्रत्यक्षात उतरलेले दिसतात. यासाठी इथले तत्कालीन नागरिक बाहेरून आर्य येण्याची वाट बघत बसलेले दिसत नाहीत. एका मुद्रेवर या आदियोगी शिवाच्या सोबत अजून एक व्यक्ती दिसते, ती आहे एका रेड्याशी झुंजणारी ‘दुर्गा’. तत्कालीन ‘महिषासुरमर्दिनी’च्या कथेचे हे चित्ररूप आहे. इथेही महिषासुरमर्दिनीची कथा आणि ‘शक्ती’ व तिच्या सोबत ‘शिव’ हे द्वैत लोकांमध्ये रुळलेले दिसते. ‘पुराणां’मध्ये आणि ‘महाभारता’च्या आदिपर्वात एक कथा आढळते. जम्भासुराचे दोन राक्षस पुत्र ‘सुंद’ आणि ‘उपसुंद’ हे ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्याने उन्मत्त झाले आणि त्यांनी त्रैलोक्याला ‘सळो की पळो’ करून सोडले. ‘तिलोत्तमा’ नावाच्या अप्सरेला पाहून ते भाळले. तिच्या प्राप्तीसाठी त्यांनी एकमेकांमध्ये लढाई केली. त्यात एकमेकांच्या अंगावर प्रहार करून ते मरण पावले. या कथेचे अंकन केलेली एक सिंधुकालीन मुद्रा ‘कालिबंगन’ येथे मिळाली आहे. तत्कालीन लोकांमध्ये ही पौराणिक कथा प्रचलित होती, याचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे.


arya_1  H x W:


arya_1  H x W:arya_1  H x W:

हे असे अनेक पुरावे मूकपणे सांगत आहेत की, ही प्राचीन नागरीकरणे वैदिक संस्कृतीतलीच होती. इतकेच नव्हे, तर पौराणिक देवता आणि कथांचा विकाससुद्धा याच्या आधीच्या काळातच घडलेला होता. कसले आर्यांचे आक्रमण नि कसला सिंधू संस्कृतीचा विध्वंस.... हा सगळा सिद्धान्तच जर पोकळ कल्पनांवर आधारित आहे, तर तो कालक्रम तरी कुठून खरा ठरणार?
(क्रमश:)


- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.