महिषासुरमर्दिनी

    दिनांक  17-Oct-2020 00:20:51   
|

navratri 1_1  H
 
 
 
आजपासून नवरात्रोत्सवाचा जागर सर्वत्र सुरु होईल. नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची अगदी भक्तिभावाने आराधना केली जाईल. पण, अगदी पुरातन काळातही देवीच्या विविध रुपांचे शिल्पांत, चित्रात दर्शन होते. खासकरुन महिषासुर वधाच्या प्रसंगाचे चित्रण अनेक चित्रांत व शिल्पांत केले गेले. तेव्हा, इथे महिषासुरमर्दिनीच्या जगभरातील विविध शिल्पांचा हा घेतलेला हा आढावा...
 
 
 
“हे गिरिकन्ये, तू पृथ्वीला आनंद देणारी आहेस! मन आनंदित करणार्‍या तुला नंदी वंदन करतो! अतिशय उंच अशा विंध्याचलाच्या शिखरावर तुझा निवास आहे. विष्णू व इंद्र तुझी स्तुती करतात! हे भगवती, तू नीलकंठ महादेवाची पत्नी आहेस. विशाल कुटुंब असलेली, महानिर्मात्री अशा तुझा जयजयकार असो! महिषासुराचा वध करणारी, सुंदर केशसंभार असणारी शैलसुते, तुझा जयजयकार असो!” आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रात महिषासुरमर्दिनीची ही सुंदर स्तुती येते.
 
 
अयि गिरि-नन्दिनि नंदित-मेदिनि
विश्व-विनोदिनि नंदनुते
गिरिवर विंध्य शिरोधि-निवासिनि
विष्णु-विलासिनि जिष्णुनुते।
भगवति हे शितिकण्ठ-कुटुंबिनि
भूरि कुटुंबिनि भूरि कृते
जय जय हे महिषासुर-मर्दिनि
रम्य कपर्दिनि शैलसुते॥
 
 
‘दुर्गा सप्तशती’मध्ये महिषासुरवधाच्या प्रसंगाचे वर्णन तिसर्‍या अध्यायाच्या शेवटी आले आहे. ढाल-तलवार, धनुष्य-बाण, पाश, गदा, शूल आदि शस्त्र आपल्या अनेक हातात घेतलेली देवी महिषासुराचा सामना करत आहे. सैन्यासह आक्रमण करणार्‍या महिषासुराला देवीने एका पायाने खाली दाबून त्याच्या मानेवर त्रिशूलाने वार केला, तेव्हा त्या महिषमुखातून तो असुर मानवी रूप धारण करून बाहेर येऊ लागला. त्यावेळी देवीने तलवारीने त्याच्यावर वार करून महिषासुराचा वध केला.
 
एवमुक्त्वा समुत्पत्य सारूढा तं महासुरम् ।
पादेनाक्रम्य कण्ठे च शूलेनैनमताडयत् ॥ ४० ॥
ततः सोऽपि पदाऽऽक्रान्तस्तया निजमुखात्ततः ।
अर्धनिष्क्रान्त एवासीद्देव्या
वीर्येण संवृतः ॥ ४१ ॥
अर्धनिष्क्रान्त एवासौ
युध्यमानो महासुरः ।
तया महासिना देव्या शिरश्छित्त्वा निपातितः ॥ ४२ ॥
 
 
महिषासुर वधाच्या प्रसंगाचे चित्रण अनेक चित्रात व शिल्पात केले गेले. इथे एक आढावा महिषासुरमर्दिनीच्या जगभरातील विविध शिल्पांचा.
 
 
सरस्वती सिंधू संस्कृतीच्या हडप्पा गावात केलेल्या उत्खननात एक विलक्षणमुद्रा मिळाली होती. साधारण 4,500 वर्षांपूर्वीच्या एका लहानशा मातीच्या मुद्रिकेवर एक कथाचित्र आहे. उजवीकडे एक योगी ध्यानमुद्रेत बसला आहे, तर डावीकडून एक मोठा रेडा हल्ला करताना दिसत आहे. त्या महिषाला एका हाताने थांबवून एका पुरुषाने (की स्त्रीने?) आपल्या पायाने त्याला खाली दाबला आहे. दुसर्‍या हातातील शूल त्या महिषावर उगारला असून त्याला मारायच्या बेतात आहे. काही अभ्यासकांच्या मते, हे शिव व शक्तीचे, महिषासुरमर्दिनीचे शिल्प असू शकते. अशा प्रकारच्या आणखी काही मुद्रा हडप्पा व मोहेंजोदडोमध्ये मिळाल्या आहेत.
 
 
 
navratri 2_1  H
 
 
 
महिषासुरमर्दिनीचे असेच एक जुने शिल्प आहे मथुरा येथील. हे शिल्प आहे दुसर्‍या शतकातील. या शिल्पात देवीच्या वरील दोन हातांमध्ये सूर्य व चंद्र आहेत. एका हातात खड्ग आहे. एका हाताने देवीने महिषासुराला मानेभोवती धरले असून, दुसर्‍या हाताने पाठीवर दाब देऊन पाठ मोडून महिषासुराला मारत असलेली दिसते.
महिषासुरमर्दिनीचे हे शिल्प स्त्रीशक्तीचा एक अद्भुत अविष्कार आहे. मानवातील असुरी प्रवृत्तींचा सामना करणारी, त्याला दंड देणारी, अशा दुष्प्रवृत्तींचा विनाश करणारी ही दुर्गा आहे.
 
 
 
navratri 3_1  H
 
 
 
कर्नाटकातील ऐहोळ येथील दुर्गा मंदिरातील महिषासुरमर्दिनीचे शिल्पही प्रसिद्ध आहे. चालुक्य राजांच्या काळात सातव्या शतकात बांधलेले हे मंदिर. या मंदिरात प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूने शिव, दुर्गा यांची शिल्प आहेत. या शिल्पात अष्टभुजा देवीच्या मागून महिषावर आक्रमण करायच्या बेतात असलेला सिंह दिसतो.
 
 
 
 
navratri 4_1  H
 
 
 
महिषासुरमर्दिनीचे असेच एक सुंदर शिल्प आहे तामिळनाडूच्या महाबलीपुरम् येथील. सातव्या शतकात पल्लव राजांच्या काळात अनेक गुंफा निर्माण केल्या गेल्या. कृष्ण, वराह, त्रिमूर्ती आदि गुफांपैकी एक आहे महिषासुरमर्दिनी गुंफा. एक लहान, सुबक असे हे गुंफा मंदिर असून त्याचे मुख पूर्वेला आहे. आत गेल्यावर डावीकडे शेषशयी विष्णूचे भव्य शिल्प आहे, तर उजवीकडे महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. हे शिल्प २.५ x ४.५ मीटरच्या भिंतीवर कोरले आहे. एक चित्तथरारक युद्धप्रसंग रंगवला आहे. एका बाजूला देवीचे सैन्य व दुसर्‍या बाजूला असुराचे सैन्य. देवीच्या सैन्यात समोरच एक योद्धा स्त्री दिसते. तिच्या बाजूने लढणारे अनेक यक्ष दिसतात. सिंहावर आरूढ असलेल्या देवीच्या हातात धनुष्य-बाण, खड्ग आदी अनेक शस्त्र आहेत. असुराच्या सैन्यातील काही सैनिक खाली पडले आहेत. महिषाचे शीर असलेला महिषासुर हातात गदा घेऊन उभा आहे. सुरुवातीला ‘एका स्त्रीला मी सहज जिंकेन’ अशा आवेशात रणांगणात उतरलेला महिषासुर, लढता लढता हरायला टेकला आहे. त्याचे सैनिक मागच्या मागे पळून जायला लागले आहेत. ‘मी सुद्धा आता रण सोडून पळून जाऊ की पाय रोवून आणखी लढू,’ अशी त्याची द्विधा स्थिती शिल्पकाराने फार खुबीने दाखवली आहे. देवी मात्र आत्मविश्वासाने सिंहावरुन वेगाने हल्ला करण्यास धावून जात आहे.
 
 
 
navratri 5_1  H
 
 
अशीच एक मूर्ती आहे आठव्या शतकातील काश्मीरमधील. काश्मीरमध्ये निलमत पुराणानुसार १८ हात असलेली देवीची प्रतिमा तयार केली जात असे. काश्मिरी शैलीप्रमाणे देवी रथात आरूढ आहे. दोन सिंह हा रथ ओढत आहेत. तिच्या सिंहांनी महिषासुरावर हल्ला केला आहे. तिच्या डाव्या हाताने तिने दोन असुर धरले आहेत. मानवातील पशुवृत्तीला मारणारी दुर्गा आहे.
 
 
 
navratri 6_1  H
 
 
 
असेच एक रेखीव शिल्प आहे महिषासुरावर उभ्या असलेल्या दुर्गेचे. हे शिल्प आहे इंडोनेशिया येथील प्रम्बनन मंदिरातील.
 
 
भारताबाहेर आग्नेय आशियाई देशांमध्ये भारतीय संस्कृती पसरली होती. त्याबरोबर भारतीय भाषा, देव, धार्मिक व लौकिक साहित्य, शिल्प, वास्तुशास्त्र, सण आदी गोष्टी पोहोचल्या होत्या. त्याचीच एक परिणती म्हणजे स्त्रीशक्तीची पूजादेखील येथे रुजली होती.
 
 
जावामध्ये नवव्या शतकात प्रम्बनन त्रिदेवांचे येथे मंदिर बांधले गेले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची तीन मोठी मंदिरे असून त्या समोर त्यांच्या वाहनांची लहान मंदिरे आहेत. तसेच भोवतीने जवळ जवळ अडीचशे लहान लहान मंदिरे आहेत. भूकंपामुळे यातील लहान मंदिरे पडली आहेत. मोठ्या तीन मंदिरांचे शिखरदेखील पडले होते, पण ते एकोणिसाव्या शतकात पुनश्च बांधले. यातील महादेवाच्या मंदिरात शिव, दुर्गा, गणेश व अगस्त्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. येथील दुर्गा अष्टभुजा असून तिच्या हातात शंख, चक्र, ढाल, खड्ग आदि शस्त्र आहेत. ही देवी महिषासुरावर उभी असलेली दिसते.
 
 
 
सहसा अशा चित्रांमध्ये वधाच्या काही क्षणांच्या आधीचा प्रसंग चित्रित केला असतो. पण, इथे मात्र विजयी महिषासुरमर्दिनी चित्रित केलेली दिसते.
  
 
पूर्वेला आग्नेय आशियाई देशात जशी महिषासुरमर्दिनीची शिल्प दिसतात, तशीच अफगाणिस्तानमध्ये पण होती. अफगाणिस्तान अथवा गांधार व पलीकडच्या भागात शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय, विष्णू, सूर्य, बुद्ध या सर्वांची उपासना केली जात असे. इथे मिळालेल्या मूर्तींवरून कळते की इथे त्यांची अनेक मंदिरे होती. सातव्या शतकात आलेल्या श्वान झांगने येथील दहा मंदिरांचा उल्लेख केला आहे. आज मात्र अफगाणिस्तानमध्ये प्राचीन मंदिरांचे फार थोडे अवशेष मिळाले आहेत. मूर्ती मात्र अनेक मिळाल्या आहेत.
 
 
 
navratri 7_1  H
 
 
संगमरवरी दगडापासून तयार केलेल्या या तीन महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती. तिन्ही अफगाणिस्तानमधील. अष्टभुजा, शस्त्रधारी, सिंहावर आरूढ असलेली, कधी त्रिनेत्र असलेली शूलाने महिषासुराचा वध करणारी देवी. शेवटच्या शिल्पात दिसत आहे खड्गाने वार करणारी देवी. सप्तशतीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे महिषातून बाहेर येणार्‍या असुराचा खड्गाने वध करणारी महिषासुरमर्दिनी.
 
 
अर्धनिष्क्रान्त एवासौ
युध्यमानो महासुरः।
तया महासिना देव्या शिरश्छित्त्वा निपातितः ॥ ४२॥
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.