कर्म आणि तिहारची कोठडी

    दिनांक  10-Sep-2019 20:54:51   


 


चिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने आणि त्यांच्या तिहारवारी निमित्ताने आणखी एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत.


माणसाचे कर्म आणि कर्मफल त्याला कुठे घेऊन जाईल, हे सांगता येत नाही. आपले कर्मफल भोगण्यासाठी भारताचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या 'तिहार' तुरुंगात रवाना झालेले आहेत, ही बातमी चिदंबरम यांच्या राजकीय विरोधकांना आनंद देणारी असली तरी देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून विचार करता ही बातमी आनंद देणारी नाही. देशाचे गृहमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद हे अनाचार आणि भ्रष्टाचारापासून मुक्त असले पाहिजे. एवढेच नव्हे, तर देशाचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद सर्व प्रकारच्या संशयांपासून मुक्त असले पाहिजे. देश प्रचंड विश्वासावर चालतो. लोकशाहीत राजकीय मतमतांतरे स्वाभाविक असतात. त्याची फारशी चिंता करण्याचे काही कारण नाही. परंतु, देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्ती, मग ती कोणत्याही पक्षाची का असेना, संशयातित व्यवहाराची असली पाहिजे. याचे कारण असे की, जर स्वच्छ पाणी देणाऱ्या नदीनेच विषयुक्त पाणी लोकांना देण्यास सुरुवात केली तर काय होईल? सर्वोच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीने देशासाठी कर्तव्याचे पालन करण्याचे सोडून, सत्तेचा दुरुपयोग करून धन गोळा करण्यास सुरुवात केली, तर कसे चालेल?

 

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया घोटाळ्याचा आरोप आहे. विदेशातून गैरमार्गाने पैसा मिळवून तो विदेशी बँकांमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रे आणि कंपन्या तयार केल्याचे आरोप आहेत. 'ईडी' आणि 'सीबीआय'तर्फे चौकशी चालू आहे. त्यांनी पुरावे गोळा केले आहेत. ते उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत. या दोन्ही ठिकाणी त्यांचा जामीन मंजूर केला नाही. याचा अर्थ तुरुंगात जाण्याइतका सकृतदर्शनी पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आला आहे. 'तिहार तुरुंग' हा गुन्हेगारांचा तुरुंग समजला जातो. या तुरुंगात फाशी झालेले, बलात्काराचे आरोप असलेले, गँगस्टर, आर्थिक आरोप असलेले कैदी असतात. त्यांच्या सहवासात चिदंबरम यांना राहावे लागणार आहे. 'राजकीय नेता' आणि 'तुरुंगवास' यांचे नाते अतूट असते. नेल्सन मंडेला यांनी २७ वर्षे तुरुंगात काढली. आँग सान सू की यांनी १५ वर्षे तुरुंगात काढली. पं. नेहरु यांनी ११ वर्षे तुरुंगात काढली. लो. टिळक मंडालेला सहा वर्षे तुरुंगात होते. महात्मा गांधीजींना अनेकवेळा तुरुंगवास घडला. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याच्या आयुष्याची अखेर सेंट हेलेना बेटावरील तुरुंगात झाली. यापैकी कुणालाही समाज गुन्हेगार समजत नाही. त्या-त्या देशाच्या पद्धतीप्रमाणे त्यांची भव्य स्मारके उभी राहिली आहेत. काहीजणांना देवघरात स्थान मिळाले आहे. यांचा तुरुंगवास सत्यासाठी होता आणि शाश्वत जीवनमूल्यांसाठी होता. भ्रष्टाचाराचा तुरुंगवास भोगणारे पी. चिदंबरम, लालुप्रसाद आणि छगन भुजबळ यांच्या तुरुंगवासाची यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. या तिघांचे तुरुंगवास राजकीय मंडल अपमानित करणारे आणि त्याची हीन पातळी दाखविणारे आहेत.

 

पी. चिदंबरम बुद्धिमान आहेत, विद्वान आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, असे सर्वकाही आहेत. बाबासाहेब म्हणत की, “शिक्षण हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठीसुद्धा केला जाऊ शकतो आणि समाजाला छळण्यासाठीदेखील केला जातो.” चिदंबरम यांनी आपल्या बुद्धीचा आणि कौशल्याचा दुरुपयोग करून माता सरस्वतीचाच घोर अपमान केला आहे. या बुद्धिमत्तेचा उपयोग देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी जर त्यांनी केला असता तर कुणी सांगावे ते आपली मुद्रा या देशाच्या इतिहासावर उमटवून गेले असते. आज त्यांची मुद्रा तिहार तुरुंगातील कैदीही झाली आहे. चारित्र्यावरचा हा डाग कधीही पुसला जाणारा नाही. तुरुंगवासाचा आणखी एक सांगण्यासारखा किस्सा आहे. तो आहे हेन्री डेव्हिड थोरो यांचा. त्यांनी 'सिव्हिल डिसओबिनियन्स' या नावाचा एक मोठा निबंध लिहिला. हा निबंध महात्मा गांधी यांच्या 'सत्याग्रह' या संकल्पनेची जननी आहे. थोरोचे म्हणणे असे आहे की, सद्सद्विवेकबुद्धीला न पटणाऱ्या कायद्याचे पालन आपण करता नये. कायदेभंग केला पाहिजे. मेक्सिकन युद्धाचा टॅक्स भरण्याचा नकार दिल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. वाटेल तेवढे दिवस तुरुंगात राहण्याची त्यांची तयारी होती. परंतु, त्यांना एक रात्रच तुरुंगात काढावी लागली. त्यांच्या मित्रांनी दंड वगैरे भरून त्यांना बाहेर काढले. या एक रात्रीच्या कैदेने हेन्री डेव्हिड थोरो यांना एक लाख दिवस पुरेल, एवढे मोठेपण दिले. चिदंबरम यांचा तुरुंगवास मात्र चिदंबरीय वस्त्रहरण करणारा झालेला आहे. चिदंबरम यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. आपली न्यायदानाची प्रक्रिया पाहता ती किती वर्षे खाईल, हे सांगता येणार नाही. आपल्या वकिलांची बुद्धी खटल्याच्या तारखांवर तारखा पडाव्या, यात भरपूर चालते. तसा हा खटलादेखील दीर्घकाळ चालू शकतो. शासनाने जर निर्णय केला की, खटला दीर्घकाळ चालवायचा नाही, रोज सुनावणी करायची तर हा खटला निर्णयाप्रत येऊ शकतो. रामजन्मभूमीचा खटलादेखील अनेक दशके चालू आहे. अजून त्याचा निकाल लागायचा आहे. चिदंबरम खटल्याचे असे होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे.

 

चिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने आणि त्यांच्या तिहारवारी निमित्ताने आणखी एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्यापुढे इंद्राणी मुखर्जी असो की, चिदंबरम असो सर्व समान आहेत. कायद्यापुढे सर्व समान यामुळे कायद्याविषयी भय निर्माण होते आणि आदरही निर्माण होतो. 'कायद्याचे राज्य' आणि 'कायद्यापुढे सर्व समान' या दोन्ही संकल्पना आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिल्या आहेत. त्याचे पालन चिदंबरम प्रकरणात होत आहे. शेवटी पुन्हा एकदा एक विचार मनात नक्कीच येतो की, देशाच्या माजी गृहमंत्र्याला आणि अर्थमंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगाची वारी करावी लागावी, ही देशाला शोभा देणारी गोष्ट नाही. यामुळे आपल्या लोकशाही मूल्यांची प्रतिष्ठा वाढत नाही. आपण अशी आशा करूया की, देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर जाणारी माणसे काळजीपूर्वक निवडली जातील आणि ही माणसे नीतिमत्ता सोडणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, कायद्याचे राज्य व कायद्यापुढे सर्व समान या दोन संवैधानिक मूल्यांवरच देश चालत नाही. देश हा नैतिक मूल्यांवर चालतो. कायदे नैतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात. कोणताही कायदा नैतिक मूल्य प्रस्थापित करू शकत नाही. नैतिक मूल्यांचे पालन ज्याचे त्याने करायचे असते. याबाबतीत आपल्या देशात आदर्श वाटावीत, अशी राजकीय क्षेत्रात महान माणसे झालेली आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी अशी कितीतरी नावे घेता येतील. देशाला या आदर्शांची आवश्यकता आहे.