कुस्तीतील 'गोल्डन बॉय'

    दिनांक  22-Feb-2019   


 


आत्मविश्वासाच्या जोरावर भारताचा झेंडा कुस्तीमध्ये उंचावणारा महाराष्ट्राच्या कुस्तीतला 'गोल्डन बॉय' म्हणजे राहुल आवारे. त्याच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...


मंजिल मिलेगी भटक कर ही सही ।

गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं ॥

 

ही मिर्जा गालिब यांची शायरी खरेतर सध्याच्या तरुणाईला साजेशी आहे. कारण, आजची पिढी ही तुलनेने जास्त चंचल. असाच एक चंचल वृत्तीचा, पण आत्मविश्वासाच्या जोरावर भारताचा झेंडा कुस्तीमध्ये उंचावणारा महाराष्ट्राच्या कुस्तीतला 'गोल्डन बॉय' म्हणजे राहुल आवारे. याच कुस्तीपटूने २०१६ साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघात समाविष्ट केले नाही, म्हणून कुस्तीतून कायमचा संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांनी २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५८ वजनी गटात त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. पण, बीड तालुक्यातल्या पटारी नावाच्या छोट्याशा गावात जन्मलेल्या या 'गोल्डन बॉय'चा प्रवास तितकासा सोपा नव्हता. त्याला कुस्ती आणि आखाड्याचे व्यसन त्याच्या वडिलांमुळे लागले. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे स्वत: जिल्हा पातळीवरील उत्तम कुस्तीपटू होते. त्यामुळे राहुल अगदी चार वर्षांचा असल्यापासून वडिलांसोबत तालमीत जायचा. त्याचे वडील स्वत: बीड तालुक्यातील पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात.

 

राहुलची कुस्तीची आवड पाहता, त्याला केवळ पैलवान न करता त्याला कुस्तीपटू करावे, या विचाराने त्याच्या रितसर प्रशिक्षणाकरिता पुण्याला 'अर्जुन पुरस्कार' विजेते मल्ल काका पवार यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी राहुलने आपले घर सोडले आणि पुण्यात प्रशिक्षणाला सुरुवात केली. काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलने अनेक तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर पदके मिळवली. यात २००४ साली 'राष्ट्रीय ग्रामीण शाळा कुस्ती स्पर्धे'त सुवर्णपदक आणि २००५ व २००६ या दोन वर्षी 'महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धे'त सुवर्णपदक कमावले. पण, राहुलने २००८ साली 'राष्ट्रकुल युथ स्पर्धे'त सुवर्णपदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. तरीही राहुलसाठी 'दिल्ली बहुत दूर थी...' राहुलच्या मते, "माझ्यासाठी हा प्रवास खूप खडतर होता. पण, माझे गुरू आणि वडील यांच्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी घाबरलो नाही. माझ्यासाठी माझा आराखडा हेच माझे घर बनले होते. त्यामुळे त्यासाठी मी जीव ओतून मेहनत केली."

 

'राष्ट्रकुल युथ स्पर्धा' ही राहुलसाठी दिशादर्शक ठरली आणि त्यानंतर राहुल कधीच थांबला नाही. २००९ साली राहुलने उझबेकिस्तानमध्ये झालेल्या 'ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धे'त सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी जर्मन 'ग्रां-प्री गोल्ड स्पर्धे'तही राहुलने सर्वोच्च यश संपादन केले. त्यानंतर 'जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धे'त रौप्य आणि 'आशियाई चॅम्पियनशिप'मध्ये कांस्यपदक जिंकून राहुलने २००९ हे वर्ष अविस्मरणीय केले. २०१०ची सुरुवातच राहुलने 'ग्रां-प्री गोल्ड' स्पर्धेत कांस्यपदक जिंकले त्यानंतर २०११ मध्ये 'मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धे'त राहुलने वरिष्ठ गटात दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना लोळवून सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या सगळ्या यशानंतर आपल्याला सगळे काही मिळाले, असे राहुलला वाटत होते. पण, त्याला धक्का बसला तो, २०१६ सालच्या 'रिओ ऑलिम्पिक स्पर्धे'त निवडल्या गेलेल्या 'भारतीय कुस्ती संघा'त राहुलला स्थान नव्हते आणि राहुल नैराश्येचा बळी ठरला. ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झाली नाही, म्हणून त्याने कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा विचार केला. मात्र, त्याच्या वडिलांनी अडवल्यानंतर राहुलने अधिक जोमाने सरावाला सुरुवात केली आणि २०१८च्या 'राष्ट्रकुल स्पर्धे'त ५८ वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत राहुलने, "हा विजय माझ्यासाठी पुनर्जन्म मिळाल्यासारखा आहे. कारण, आज हरलो असतो, तर कुस्तीला कायमचा मुकलो असतो. हा विजय कायम स्मरणात राहील," अशी भावनिक प्रतक्रिया दिली.

 

२०१८च्या या सुवर्णपदकामुळे राहुलला पोलीस खात्यात उप-अधीक्षकपदीस सरकारी नोकरी मिळाली. त्याबद्दल राहुल विशेष खूश आहे. कारण, तो म्हणतो की, "मी आठ ते नऊ वर्षांचा असताना कारगिलचे युद्ध सुरू होते. त्या युद्धाच्या बातम्या माझे वडील मला वाचून दाखवायचे. त्यातच आमच्याच गावातील एक जवान शहीद झाला होता. त्यातून प्रेरीत होऊन लष्करात भरती होण्याची इच्छा होती. ते शक्य झाले नाही. पण, आज पोलीस उप-अधीक्षक म्हणून देशासाठी काहीतरी करता येईल याचा आनंद आहे." तरी, ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणे हे राहुलचे स्वप्न कायम आहे. त्यामुळे सध्या राहुलने २०२०ला टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. जे काम भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार करू शकला नाही, ते राहुलला करायचे आहे. ते म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून द्यायचे आहे. त्यामुळे त्याला सध्या 'सुवर्णवेध' लागले आहेत आणि भारताला कुस्तीत सुवर्णक्षण पाहायला मिळेल, यासाठी कुस्तीप्रेमीसुद्धा आतुर झाले आहेत. त्यामुळे राहुलला येत्या ऑलिम्पिकसाठी सुवर्णमय शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat