दोन महान राष्ट्रपुरुष

    दिनांक  04-Dec-2019 20:17:17
|
CH _1  H x W: 0
 


समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एका विशिष्ट विचाराने आणि ध्येयाने एकमेकांकडे ओढले गेले. दोघांचे ध्येय हिंदवी स्वराज्य, धर्माचे रक्षण, जुलमी सुलतानशाहीचा शेवट करून रामराज्याची स्थापना असे असले तरी त्यांची कार्यक्षेत्रे आणि कार्यपद्धती भिन्न होती. तथापि हेही तितकेच खरे आहे की, त्यांनी आरंभलेली पद्धत एकमेकांना पूरक ठरली.

 

दोघेही प्रचंड बुद्धिमान आणि सामर्थ्यवान होते. त्यांना त्या गोष्टीचा गर्व नव्हता. असे लोकोत्तर पुरुष क्वचितच पाहायला मिळतात. म्हणून त्यांना अलौकिकत्व प्राप्त होते. धाडसी राजकारण आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान एकत्र आले, तर काय चमत्कार घडतो, ते सार्‍या महाराष्ट्राने समर्थ-शिव काळात पाहिले. रामदासस्वामी व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्याही ठायी प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द होती. अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने राष्ट्रीय भावना उदय पावते आणि एकंदर समाजाचे सर्वदृष्ट्या कल्याण होते. त्यांची ध्येये व चरित्रे पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरतात, त्यात शंका नाही.

 

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी यांचे संबंध जिव्हाळ्याचे कसे होते, हे जाणून घेण्यासाठी रामदासांचे राजकीय विचार साहाय्य व शिवाजी महाराजांचे धार्मिक आध्यात्मिक विचार या गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो. रामदासस्वामी हे परमार्थ क्षेत्रातील महान अधिकारी पुरुष होते. शिवाजी महाराजांनी स्वामींचा अनुग्रह व उपदेश घेतला होता. या दोन विधानांची एकत्रित गल्लत करून नंतरच्या अंधश्रद्ध स्वामीभक्तांनी शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पराक्रम, धाडसी कारवाया, स्वराज्य स्थापना यांना रामदासांच्या झोळीत टाकण्याचा खटाटोप केला. 'रामदासस्वामींनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यातून महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा झाली.' असल्या त्यांच्या विधानांना काहीही अर्थ नाही. समर्थांच्या काही अंधश्रद्ध भक्तांचे असे मत असेल तर ते सर्वथा चुकीचे आहे.

 

या विधानांची प्रतिक्रिया शिवभक्तांकडून होणे स्वाभाविक होते. पण, त्याची परिणती रामदासस्वामींविषयी अपप्रचार करण्यात व त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात झाली. त्यानुसार असा प्रचार करण्यात आला की, 'रामदास हे साधे गोसावी होते. शिवाजी महाराजांनी केलेले प्रचंड राजकीय पराक्रम पाहून या वैराग्याने राजकारणाची चार दोन वाक्ये लिहिली. यावरून त्यांनी राजकारण केले असे म्हणता येत नाही.' अर्थात, हा सारासार व रामदासस्वामींसंबंधी केलेली ही विधाने चुकीची असून समर्थकार्याचा अभ्यास न करता केलेली आहेत. आधुनिक काळात तर या वादाला जातीयवादाचा वेगळाच रंग मिसळला गेल्याने या टीकेची धार आणखी वाढली. रामदासस्वामींचे राजकीय क्षेत्रातील नव्हे, तर धार्मिक सामाजिक क्षेत्रातीलही सारे श्रेय काढून घेण्याचा नवा प्रकार उदयाला आला. तो इतका फोफावला की, चांगले चांगले लेखक स्वामींच्या कार्यावर लिहायला वा मतप्रदर्शन करायला कचरू लागले. ही अतिशय खेदजनक बाब आहे. पण, रामदासस्वामींचे कार्य व आसन इतके बळकट आहे की, त्याला धक्का लागत नाही. सुशिक्षित व खरे अभ्यासू अशा टीकेला महत्त्व देत नाहीत.

 

ऐतिहासिकदृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराज व रामदासस्वामी ही दोन स्वतंत्र स्फुरणे आहेत. शिवाजी महाराजांच्या घरात तीन पिढ्या राजकारण आणि राज्यस्थापना हे विचार नांदत होते. मालोजी नंतर शहाजीराजे, शहाजीनंतर छत्रपती शिवाजी महाराज अशी ही राजकारण पोषक विचारांची परंपरा होती. तेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापनेची कल्पना शिवाजी महाराजांना बाहेरून कुठून तरी मिळण्याचे काहीही कारण नव्हते. आपले राज्य स्थापन करावे, हे बाळकडू शिवाजी महाराजांना बारशाच्या दिवशीच मिळाले होते.

 

रामदासांच्या बाबतीत बोलायचे तर स्वामींच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली. स्वामींनी तीर्थाटनाच्या निमित्ताने बारा वर्षे पायी भ्रमंती करून सारा हिंदुस्थान पाहिला. लोकस्थिती न्याहाळली. लोकांची, धर्माची अवकळा झाल्याचे अनुभवले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या देशाची, आपल्या धर्माची अवकळा नष्ट करायची असेल, तर सर्वप्रथम आपल्या समाजाला निवृत्तीवादाकडून प्रपंच-विज्ञानाकडे वळवले पाहिजे. तत्पूर्वी ४०० वर्षे हिंदू समाजावर निवृत्तीवादाचे प्राबल्य होते. त्यामुळे समाज दुर्बल अवस्थेत होता. ते बदलून विचारांचा ओघ प्रपंचविज्ञानाकडे वळवायचा हे सामान्य माणसाचे काम नव्हते.

 

समर्थ विचारांची मीमांसा करताना थोर अभ्यासक श्री. म. माटे म्हणतात, "ढासळत चाललेल्या हिंदू समाजाला तत्त्वज्ञान व प्रपंचविज्ञान यांच्या बळावर सावरून धरले पाहिजे, असे रामदासांना वाटू लागले." आपल्या भारतभ्रमंतीत रामदासांनी जे पाहिले, अनुभवले त्यातून या जुलमी सुलतानशाहीचा अंत व हिंदवी स्वराज्य, स्वातंत्र्य हे स्वामींचे ध्येय निश्चित झाले होते. देवळे पाडली जात होती. त्यातील मूर्तींचा विध्वंस उघड्या डोळ्यांनी पाहावा लागत होता. धार्मिक स्वातंत्र्य पायदळी चिरडले जात होते. हे थांबवायचे असेल तर हिंदवी राज्याची आवश्यकता होती. 'पहिले हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण ॥' ही स्वामींची भूमिका होती. देवळे, त्यातील मूर्ती आणि धर्म वाचवायचा तर राजकारण करणे भाग होते आणि रामदासांनी ते केल्याचे ऐतिहासिक पुरावे दाखवता येतात. रामदासांचे हिंदवी स्वराज्याच्या राजकारणात काय योगदान होते, असा प्रश्न नेहमी विचारला जातो.

 

राजवाडे यांनी त्याचे उत्तर दिले आहे. ते म्हणतात, "हिंदवी स्वराज्य स्थापून शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली. त्या क्रांतीची पूर्वतयारी व तिला उपकारक नव्हे तर अनिवार्य असलेली सामाजिक क्रांती रामदासांनी केली." रामदासांनी लोकशिक्षणाच्या द्वारे लोकांची मने तयार केली, लोकांच्या चारित्र्याची घडण केली. लोकांची मने घडवणे हे राजसत्तेचे काम नाही. ते ऋषितुल्य नि:स्पृह विचारवंताचे काम असते. ते रामदासांनी केले. मुघलांची लष्करी चाकरी हे रामदासांचे राजकारण नव्हते. समर्थांचे राजकारण म्हणजे 'धर्मरक्षी' छत्रपती शिवाजी महाराज त्यांना साहाय्य करणे हे होते. जागोजाग महंतांचे जाळे हिंदुस्थानभर तयार करून त्याद्वारा छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण सफल व सुगम कसे होईल, हे स्वामींचे राजकारण होते. रामदासांनी महाराष्ट्रात राष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न केली.

 

रामदासांनी शिवाजी महाराजांच्या राज्यक्रांतीला 'मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥' या राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. रामदासांच्या या योगदानाचे स्वरूप राजवाडे यांनी लिहिलेल्या 'राधामाधव- विलास चंपू' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. 'राजवाडे लेखसंग्रह' या पुस्तकातील रामदासविषयक पुढील विचार महत्त्वाचे आहेत. राजवाडे लिहितात, "शिवाजी महाराजांपूर्वी मराठ्यांची बहुतम संख्या यवनादींची सेवा करण्यात पाप मानण्याऐवजी भूषण मानीत होते. असा हा देशघातक व राष्ट्रघातक ओघ बदलून देशातील सर्व मराठी असेल नसेल तेवढा स्वराज्याच्या ठायी मेळवावा, ही उच्चतम राष्ट्रकरणाची सल्ला रामदासाने शिवाजी महाराजांना दिली व त्या चतुरस्र मुत्सद्याने वीर पुरुषाने ती सर्वांशाने अंमलात आणली."

 

रामदासांनी राष्ट्रीयत्व व राष्ट्रभावना मराठ्यांत जागृत केली. खरोखरच कल्पक रामदास आणि कर्तबगार छत्रपती शिवाजी महाराज! आळतेकरांचे मतही याचप्रमाणे आहे. आळतेकर लिहितात, "राजकारणातल्या गुप्त बातम्या शिवाजी महाराजांना पोहोचविणे व त्यांना मदत करणे, याप्रमाणेच महाराजांना राजकारणात सल्ला देणे ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या राजकारणातील रामदासांच्या असलेल्या सहभागाच्या दृष्टीने उल्लेखनीय होती. आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घेण्याला निघण्याआधी शिवाजी महाराजांनी समर्थांचाही सल्ला घेतला होता, असा उल्लेख बखरीत आढळतो." (समर्थ चरित्र) शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी यांचा जो निकट संबंध होता, त्या संदर्भात राजवाडे म्हणतात, "जोपर्यंत दासबोध ग्रंथ विद्यमान आहे व मराठ्यांनी सतराव्या शतकात स्वतंत्र राज्य स्थापिलं, ही गोष्ट इतिहासात नमूद आहे, तोपर्यंत रामदासांच्या व शिवछत्रपतींच्या संबंध नव्याने सिद्ध करू जाण्याची, अव्यवस्थित चित्रांखेरीज बाकीच्या लोकांना काही आवश्यकता आहे असे वाटत नाही."

- सुरेश जाखडी

7738778322