कळपाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या

    दिनांक  08-Jan-2019


 

 

 
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही घडते आहे ते चांगलेच म्हणावे. प्रत्येक कळपाच्या मर्यादा समोर येत आहेत. असहिष्णूतेच्या नावाने घसे कोरडे पाडणारे लोक आपल्याला न भावणारी गोष्ट घडली की, साहित्य संमेलनासारख्या शारदीय परंपरेलाच कसे नख लावायला सरसावतात ते सध्या महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे.
 

९२व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही आता घडत आहे ते एका अर्थाने चांगलेच म्हणायला हवे. स्वत:ला साहित्य संस्कृती आणि मूल्यांचे निर्माते म्हणविणारे लेखक, कवी, पत्रकार, संपादक वगैरे मंडळी किती दांभिक, मतलबी आणि कुरूप असतात याचे ओंगळवाणे दर्शन घडायला सुरुवात झाली आहे. असहिष्णुतेच्या नावाने घसे कोरडे पाडणारे लोक आपल्याला न भावणारी गोष्ट घडली की, साहित्य संमेलनासारख्या शारदीय परंपरेलाच कसे नख लावायला सरसावतात, ते सध्या महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. आम्हाला जे हवे ते होत नाही ना, मग ते साहित्य संमेलनच कसे होते ते पाहू, अशा अविर्भावात काही मंडळी उतरली आहेत. वस्तुत: विवेकाचा दिवा दुरून तरी दाखवावा, अशी अपेक्षा असणार्‍या संपादकांनी इथे भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, ज्याला कुणी वाली नसतो अशा लौकिकावर हात मारण्याची संधी दवडण्याची या मंडळींचीही इच्छा नाही. त्यामुळे सगळ्यांचे कंपू तसे आता या मंडळींचे कंपूदेखील कामाला लागले आहेत. संपादक उतरले की, बड्या वर्तमानपत्रात लिहायला जागा मिळावी यासाठी हाजी हाजी करणारे स्तंभलेखक असतातच. साहित्यिक स्थान आणि काही वकूब नसला, स्वत:चा वाचकवर्ग वगैरे नसला तर अशा वादात चतुरपणे एक भूमिका घेतली की, मग आपला कोपरा सापडतोच. मुळातच सगळी लढाई कोपरे मिळविण्याची, मग तो मिळाला तरी अल्पसंतुष्टांना पुरे ठरते. साहित्य संमेलनाची अवस्था ही खरोखरच आता सिंह नसलेल्या समृध्द जंगलावर कोल्ह्या- कुत्र्यांनी राज्य करावे, अशी झाली आहे. खरंतर साहित्य संमेलन उत्तमरित्या पार पडावे म्हणून या समित्या, महामंडळाचे प्रयोजन आणि अस्तित्व. मात्र तिथे लाळघोटी आणि लाचार मंडळी जाऊन बसली की तीही आपल्याच कळपातल्या कुणाला तरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नेऊन बसवितात. यासाठी साहित्यिकांनाच जबाबदार धरले पाहिजे, कारण चांगले साहित्यिक या निवडप्रक्रियेपासून नसते बालंट नको म्हणून दूर राहतात आणि इथेच साहित्यबाह्य शक्तीचे फावते. पैसा लावून, पदांचे आमिष दाखवून, व्यासपीठांवरच्या जागांची आणि पुष्पगुच्छांची लालसा दाखवून माणसे आपल्याकडे वळवली जातात. राजकीय कारणांसाठी लागणारे अभिमत निर्माण करण्याचे काम मग ही मंडळी इमानेइतबारे करीतच राहातात. असे हे दुष्टचक्र आहे. राजकारण आले की मग मर्यादाही येतात. नावडत्या विचारसरणीचे विषय आले की मग इथेही उत्तर प्रदेशप्रमाणे बुवा-बबुवाच्या युती पाहायला मिळतातच.

 

खरे तर यावर्षी गचाळपणाला अपवाद व्हावा, असा शुभशकुन घडला होता. डाव्या उजव्याच्या पलीकडे जाऊन साहित्याशी आणि त्यातून निर्माण होणार्‍या साहित्यिक मूल्यांशी आपली वीण घट्ट ठेवणारी व्यक्ती अरुणा ढेरेंच्या रूपाने संमेलनाला लाभली. पण आधी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या व्यवस्थाच इतक्या लाचार झाल्या आहेत की, कुणाच्याही कसल्याही अजेंडासाठी ही माणसे विकली जातात. नयनतारा सहगलना आणण्याची खेळीही यातूनच खेळली गेली होती. आपल्या घरातले वासे खिळखिळे झालेले असताना इतरांची उजळलेली घरे पेटविण्याचा उद्योग करण्याचा प्रयत्न डाव्या आणि समाजवादी मंडळींनी इथे केला. नयनतारा सहगल इथे येऊन काय बोलणार होत्या, याची पूर्ण कल्पना त्यांचे भाषण वाचल्यावर येते. आता त्या काही नव्याने बोलणार होत्या का? यातून मराठी साहित्यविश्‍वात काही भर पडणार होती का? साहित्याच्या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्‍या मंडळींना यातून काही मिळणार होते का? तर या प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थीच मिळतात. कळपांचे एक बरे असते, जागा अडवायला ते उपयोगी पडतात. या सगळ्या साहित्य संमेलनांमध्ये असेच कळप जाऊन जागा अडवतात आणि कसले तरी उसने अवसान आणून मग जिंकल्याच्या अर्विभावात आपल्याच कळपात फिरत राहतात. यंदा या कळपाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या ते बरेच झाले. एका गावगन्ना पुढार्‍याने धमकी दिली आणि हे कचकड्याचे ढोंगी लोक नयनतारा सहगलना येऊ नकाअसे सांगून मोकळे झाले. अरुणा ढेरेंना आपल्या अभिव्यक्तीसाठी आणीबाणीत तीन महिने तुरुंगात जाण्याचा अनुभव आहे. या लाचारांनी हे करून काय कमावले? ज्यांना स्वत:च्या अभिव्यक्तिसाठी ताठ कण्याने उभे राहाता येत नाही, ज्यांना स्वत:चे मजकूर मागे घ्यावे लागतात, लिखाणाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागते आणि नंतर गुपचूप कायदेशीर प्रक्रियांच्या आडून टाळटाळ करावी लागते, त्यांनी असल्या फंदात पडू नये आणि जे आहे किमान त्याचा तरी चिखल करू नये.

 

आपल्याला हवी तीच अभिव्यक्ती, आपल्याला हवा तोच मजकूर, आपल्याला हवी तीच माणसे हे रोगट मनोवृत्तीचे लक्षण आहे. आपली ती अभिव्यक्ती आणि इतरांची ती बाष्कळ बडबड असा काहीसा हा प्रकार आहे. एखाद्या साहित्यिकाला हिंसा, अन्याय, राजकीय घडामोडींवर न बोलता शुध्द साहित्यिक मूल्यांवर भाष्य करायचे असेल तर तो त्याच्या अभिव्यक्तीचा अधिकार आहे, हे सर्वात आधी मान्य केले पाहिजे. हिंसेचे आणि असुरक्षिततेवर भाष्य करायचेच असेल तर ते सिलेक्टिव्हअसून कसे चालेल? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांवर उगवलेला राजकीय सूड, काश्मिरी पंडितांची ससेहोलपट, गोध्य्राचे जळीतकांड या सगळ्याविषयी चिडीचूप राहायचे आणि एखाददुसर्‍या घटनेच्या आधारावर देशात असुरक्षिततेचे वातावरण असल्याचा आगडोंब पसरवायचा ही कसली अभिव्यक्ती? ही तर आपल्या राजकीय मालकांना खुश ठेवण्यासाठी केलेली चलाखीच म्हटली पाहिजे. आपल्या विचारसरणीच्या कळपाचा म्होरक्या म्हणून कायम राहण्यासाठी आणि कळपातल्या इतरांना खुश ठेवण्यासाठी केलेली कवायत म्हणूनही याकडे पाहाता येईल. या निमित्ताने जे काही झाले ते खरे तर चांगलेच म्हणावे लागेल. एकंदरीतच सगळ्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि खरे चेहरे समोर आले. जे त्यांच्या विचारसरणीच्या पिंजर्‍यात अडकलेत त्यांना कोण बाहेर काढणार? डॉ. अरुणा ढेरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होणार म्हणून यवतमाळसारख्या आडगावात पोहोचणार्‍यांची संख्याही कमी नाही. या सकारात्मकतेच्या उर्जेसाठी साहित्य संमेलनाला जाणे आवश्यक आहे. जे आपल्याच विचारांचे कैदी आहेत त्यांचे वाली कोण होणार? विध्वसांपेक्षा सृजनाचीच ताकद जगाने मानली आहे. महाराष्ट्र ज्ञानेश्‍वर, तुकारामांच्या मागे उभा राहिला, मंबांजींच्या नाही. जुने जाऊ द्या मरणालागूनही केशवसुतांच्या तुतारी कवितेतली प्रसिध्द ओळ मात्र. या कवितेचा शेवट मात्र आजच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याबद्दल चोख दिशादर्शन करणारा आहे.

 

घातक भलत्या प्रतिबंधांवर हल्ला नेण्या करा त्वरा रे

उन्नत्तीचा ध्वज उंच धरा रे

वीरांनो! तर पुढे सरा रे आवेशाने गर्जत हर हर!

पूर्वीपासूनी अजून सुरासुर तुंबळ संग्रामाला करीती

सांप्रति दानव फार माजती देवावर झेंडा मिरविती!

देवांच्या मदतीस चला तर

- किरण शेलार

संपादक

महा MTB

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/