अच्छे दिन, बुरे दिन

    10-Jun-2018   
Total Views | 46
गेल्या काही वर्षांत मी दर एक-दोन महिन्यांनी सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम दुष्काळी खेड्यात विश्रांतीसाठी जात असतो. हे माझ्या मित्राचे गाव आहे. सतत त्याच्यासोबत फिरायला जात असताना गावकर्‍यांशी गट्टी जमली आणि आता मी एकटाच ये-जा करीत असतो. सातारा- पंढरपूर रस्त्यावर हे महिमानगड नावाचे गाव आहे. दहा-बारा वर्षांत जवळपास प्रत्येक वर्षी दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष ही नित्याची बाब! पण माझ्यासाठी तिथली मोठी अडचण म्हणजे कायम सतावणारे भारनियमन! मुंबईची सवय असल्याने चिडचिड व्हायची. पण, मागल्या दोन वर्षांत ती समस्या अजिबात संपुष्टात आली. क्वचित एखाद्या दिवशी भारनियमनाची समस्या काही तासासाठी असली तर. अन्यथा बारमाही वीजपुरवठा ठिकठाक आहे. हा सातारा- पंढरपूर रस्ता चौपदरी करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे त्यामुळे तिथपर्यंत पोहोचताना वैताग होतो. गेल्या मंगळवारी दीड महिन्यानंतर तिथे पोहोचलो. तर उन्हाळ्याने जीव कासावीस करून टाकलेला. पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली. त्यामुळे पोटोबा करून लवकर झोपणे झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून लिहिणे व वाचणे हा नित्यक्रम होताच. पण तो दुपारी. सकाळ म्हणजे सूर्य माथ्यावर येईपर्यंत नाका टपरीवर चहा व गप्पा हा खरा कार्यक्रम असतो. तो उरकल्यावर बुधवारी दुपारी लॅपटॉप घेऊन बैठक मारली. नेहमीचे काम कसेबसे उरकत नाही, तोपर्यंत आभाळ भरून आले आणि बघता बघता अंधार दाटला. काही मिनिटातच जिवाला दिलासा देणारा पाऊस कोसळू लागला. विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पावसाने धिंगाणा सुरू केला. अशा वेळी खेड्यापाड्यातली बत्ती गुल होणे, हा आपल्याकडला परिपाठच आहे. महिमानगड त्याला अपवाद नाही. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वीज गेली ती अंधार पडता पडता येईल अशी अपेक्षा होती. पण अपेक्षाभंगच झाला.
 
ती रात्र पूर्ण अंधारात गेली. दुर्दैव असे होते, की मी ज्यांच्या घरात एक खोली घेऊन मुक्काम ठोकलेला आहे, त्या संजय कुंभाराने म्हशीचा गोठा पक्का करण्याचे काम हाती घेतलेले आणि त्यासाठी तीन पिंपे भरून ठेवलेले पाणी पूर्णपणे वापरले गेलेले होते. चिंता नव्हती, कारण संध्याकाळी वीज आली की बोअरवेलचे पाणी उपसता येणार होते. पण वीज आलीच नाही आणि पाण्याची तारांबळ उडाली. अर्थात खेड्यात इतकी वा अशा किरकोळ गोष्टींनी कधीच तारांबळ उडत नाही. मात्र मोकळा वेळ असून वीज नसल्याने मला लॅपटॉप लावता येत नव्हता, की काही करायची सोय नव्हती. म्हणून वैतागून गेलो होतो. इथे गावात असलो की लिहिणे रात्री उशिरा आणि दिवसभर गावगप्पा हा ठरलेला प्लान असतो. गुडूप अंधार आणि झोपेचा पत्ता नाही, म्हणून वैताग घरभर व्यापून राहिलेला होता. रात्री केव्हातरी डोळा लागला. सकाळी जाग आली तोपर्यंत वीज आलेली नव्हती. दार उघडून बघितले तर पाण्याची बोंब होती. बिचार्‍या संजयने शेजारून चार बादल्या पाणी गोळा करून तात्पुरती सोय केली होती. गुरुवार दुपार उजाडली तरी विजेचा पत्ता नव्हता आणि मी सगळीकडून चिडचिडून गेलो होतो. नाक्यावर स्टॅन्डपाशी आलो, तर कुणाच्या कपाळावर साधी आठीही नव्हती. गावाचे दोन भाग आहेत. एक हमरस्त्यापासून आत दीड किलोमीटरवर मूळ गाव आहे आणि अलीकडल्या वीस वर्षांत अनेकांनी स्टॅन्डपाशी नव्याने घरे बांधली आहेत. मी अशाच नव्या वस्तीत राहतो. मजेची गोष्ट अशी की, या विभागलेल्या गावात दोन बाजूंनी विजेचा पुरवठा होतो. मूळ गावात दक्षिणेकडून आलेली वीज आहे आणि स्टॅन्डपाशी उत्तरेकडून आलेली वीज आहे. ही उत्तरेकडली वीज बुधवारच्या पावसाने विस्कळीत करून टाकली होती. कुठेतरी मोठा फॉल्ट निघाल्याने लगतच्या चार-पाच गावात अंधार झालेला होता. तीन दिवसांत दोन रात्री व दोन दिवस संपूर्ण वीज बेपत्ता होती. एक-दोन तास आली व गेली.
 
 
मी जितका काम ठप्प झाल्याने चिडचिडा झालेला होतो, तितकाच गावकर्‍यांच्या ढिम्मपणाने मला विचलित केलेले होते. माझ्या इतका कोणीच वैतागलेला नव्हता. जणू काही झालेलेच नसावे, इतक्या थंडपणे बिन विजेची कामे चाललेली होती. आपसात कुठून तरी सोय करून पाण्याचे कॅन भरून इकडे तिकडे हलवले आणले जात होते. दोन-तीन घरामागे बोअर आहे. पण तिथेही पाणी विजेअभावी उपसता येत नव्हते. पण तक्रार नव्हती. शुक्रवारी माझ्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. शिव्याशाप देतच मी तिथल्या एकदोन दुकानदार टपरीवाल्यांची हजेरी घेतली. कसली व्यवस्था आहे? गेले 24 तास वीज नाही आणि तुम्ही ढिम्म बसलाय वगैरे बडबडलो. तर कोणी चिडला नाही की अस्वस्थ झाला नाही. माझी बडबड ऐकून घेतल्यावर त्यातला एक साठी ओलांडलेला गावकरी शांतपणे उत्तरला, ही मुंबय न्हाई. कमीजास्त व्हायचं. त्यानेच मला हटकल्यावर इतरांना धीर आला आणि एक एकजण मला चांगला सुनावू लागला. मी पत्रकार आहे. माझे लेख वर्तमानपत्रात छापून येतात आणि अधूनमधून मी वाहिन्यांच्या चर्चेत झळकत असल्याने माझा आदरयुक्त वचक आहे. म्हणून कोणी थेट प्रत्युत्तर देत नाही. साहजिकच एक सभ्यतेचा भाग म्हणून कोणी माझ्या चिडचिडीला उत्तर देत नव्हता. पण, त्या म्हातार्‍याने सुरुवात करून दिली आणि एकामागून एकजण मला सुनावू लागले. किती वर्षे झाली तुम्ही गावात येताय आणि मुक्काम करून रहायलाय? हे काय पहिल्यांदाच होतंय का? पहिले कशी दिवस दिवस लाईट बेपत्ता असायची. दिवसाचे चार-सहा तास आली तरी देव पावला म्हणायचो आपण. आजकाल कधी वीज जातच नाही. गावात बघा आता पण वीज आहे. इथे स्टॅन्डवर काही मोठा फॉल्ट आलाय म्हणून प्रॉब्लेम झालाय. दोन दिवस कळ निघना? हा अनुभव चमत्कारिक होता. वीज नसल्याचे व वीज मंडळाच्या समस्यांचे समर्थन करीत गावातली पोरे मलाच समजावत होती.
 
 
मग त्यातल्या एकाने माझ्या दुखण्यावरच बोट ठेवले. अहो भाऊ, तुमचा मोदीच पंतप्रधान आहे ना? रोज उठून इथे गावात आल्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला तुम्हीच शिव्या मोजत होता ना? विसरलात तीन-चार वर्षांपूर्वीचे दिवस? आता ती परिस्थिती राहिली नाही. ते दिवस बदलले आणि अधिक सोयी झाल्या. म्हणून जुने दिवस विसरून चालतंय का? बारा-अठरा तास वीज नसायची ते आठवा. मग आजचे दिवसही चांगले वाटतील. तुम्ही म्हणता त्या मोदीचे अच्छे दिन म्हणा हवे तर. काही मोठा फॉल्ट असला तर वीज मंडळ तरी काय करणार? काम चालू आहे ना? एकदोनदा वीज येऊन गेली. कारण काम चालू आहे. चार गावापुरता विषय आहे. बाकी कुठे प्रॉब्लेम आहे? दहा-बारा वर्षांत प्रथमच गावातल्या लोकांनी माझी बोलती बंद केली होती. अन्यथा मी तिथे असलो की मग गप्पा आणि त्यातला मीच नेहमीचा शहाणा असायचो. त्यांच्या सुनावण्याचा अर्थ इतकाच होता, की एखादी समस्या असेल तर बोटे मोडत बसून भागत नाही. यापेक्षा वाईट दिवस होते, ते आठवायचे. मग तात्पुरती समस्या असेल, तिला तोंड देण्याची हिंमत मिळत असते. शुक्रवारी संध्याकाळी वीज पूर्ववत झाली आणि हा लेख लिहिताना माझ्या डोक्यात विचार घोळत होते, कशाला अच्छे दिन म्हणायचे आणि कशाला बुरे दिन म्हणायचे? दहा-बारा वर्षांच्या कायमस्वरूपी संकटे व अडचणीवर मात झाली असेल आणि सुसह्य जीवनाला स्थैर्य आलेले असेल, तर त्यातला एक दिवसाचा गोंधळ धरून ऊर बडवावा काय? मागली दोन-तीन वर्षे वीज कपात, पाणीसंकट वा तत्सम सामान्य समस्यांतून मुक्ती मिळाली असेल, तर हेच अच्छे दिन नाहीत काय? पण ते मला समजू शकले नाहीत, ते त्या खेडूतांना समजू शकतात. माझ्यासारखा मोदी समर्थकही दोन-चार तासांच्या अडचणीसाठी व्यवस्थेला शिव्याशाप देऊ लागतो. कारण आपले बुरे दिन कधीच नसतात. जे बुरे दिन भोगून आलेले असतात, त्यांना सुसह्य जीवनही अच्छे दिन वाटू लागतात. थोडक्यात शुक्रवार माझ्यासाठी अच्छे दिन घेऊन आला होता.

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121