असंगाशी संग, प्राणांशी गाठ

    दिनांक  04-Dec-2018   
 
 

'असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ,' अशी एक छान म्हण मराठीत प्रचलित आहे. ही म्हण आत्ता सुचण्याचं खरं तर काहीच कारण नाही. परंतु, राज्यातील राजकारणात घडत असलेल्या काही घटनांचा मागोवा घेतला तर, या म्हणीची लक्षणे आपल्याला आढळून येतील. उदाहरणार्थ, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप खासदार (आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष!) नारायण राणे यांची खास त्यांच्या कणकवलीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये राणे आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी त्याबाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे सारे तर्कवितर्क पाहून वर उल्लेखलेली म्हण किती यथायोग्य आहे, याची खात्री पटते. परंतु, विद्यमान परिस्थितीत उभयतांपैकी कोण असंग आणि कोणाच्या प्राणाशी गाठ, हे सांगणं मात्र भल्याभल्यांसाठी अवघड आहे, एवढं मात्र निश्चित! या सार्‍या भेटीगाठी, त्यातून दिले जाणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संकेत, त्यानंतर प्रसारित होत असलेल्या बातम्या, यांचं कारण सध्यातरी एकच दिसतं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची होऊ घातलेली युती. गेली चार वर्षं सत्तेत राहूनही एखाद्या कट्टर विरोधकाला लाजवेल अशा थाटात आपल्याच सरकारवर यथेच्छ तोंडसुख घेऊन, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भाजप नेत्यांना पाण्यात पाहून आता निवडणूक तोंडावर येताच शिवसेना मंत्र्यांच्या खिशातील राजीनामे खिशातच राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. या चिन्हांमुळे सर्वाधिक अस्वस्थ झालेल्या व्यक्तींमध्ये नारायण राणे हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. काँग्रेसमध्ये काही आपली डाळ (कालवण?) शिजत नाही, हे बारा-तेरा वर्षांनंतर लक्षात येताच राणेंनी पुन्हा पक्षांतर केलं. राणे आता भाजपमध्ये जातील आणि छानपैकी मंत्री वगैरे होतील, अशी स्वप्नं अनेकांनी पाहिली. परंतु, झालं भलतंच. ‘वर्षा’ आणि मातोश्री या दोन्ही ठिकाणांहून जणू राणेंना कात्रजचा घाटच दाखवला गेला आणि राणे थेट राज्यसभेत पाठवले गेले. आता पुन्हा युती होण्याची किंवा कायम राहण्याची चिन्हं दिसू लागल्याने स्वाभाविकच राणे अस्वस्थ झाले आहेत आणि त्यामुळेच ते असं दबावतंत्र वापरत आहेत, असं मानायला नक्कीच वाव आहे.

राणेंचा कोकणी जुगाड

आधी शिवसेना, मग काँग्रेस मग स्वतःचा पक्ष, परंतु भाजपची खासदारकी असा प्रवास करून राणेंनी राजकीय प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. असं असताना पुत्र आ. नितेश राणे हे मात्र अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. पक्ष ’महाराष्ट्र स्वाभिमान’ नावाने आणि दोन्ही प्रमुख नेते वेगळ्याच पक्षांतर्फे विधिमंडळात, अशी परिस्थिती भारतीय लोकशाहीत अभावानेच उद्भवली असेल. त्यातच राणेंचे दुसरे पुत्र माजी खा. निलेश राणे यांना पुन्हा खासदारकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी मग त्यांच्याकडे स्वाभाविकपणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाच पर्याय उरतो. भाजप-सेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेकडे जातो आणि आघाडीमध्ये काँग्रेसकडे. २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे एकदा निवडून आले खरे परंतु एकदाच. आता परिस्थिती आधीसारखी राहिलेली नाही. २००९ ते २०१८ या काळात नदीखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. २३०१४ मध्ये युतीच्या विनायक राऊत यांनी राणेंचा दणदणून पराभव केला. पाठोपाठ विधानसभेला स्वतः नारायण राणेही पराभूत झाले. आता या नव्या पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढून एकट्याने निवडून येणं निलेश राणेच काय, स्वतः नारायण राणेंनाही अवघड जाईल, हे स्पष्टच आहे. युतीमध्ये शिवसेना हा मतदारसंघ राणेंना सोडणं याच काय पुढच्या सात जन्मांत शक्य नाही. त्यामुळे मग शेवटचा पर्याय उरतो तो काहीतरी ‘जुगाड’ करण्याचा. यासाठी महान मुत्सद्दी शरदच्चंद्र पवार साहेबांसारखा पर्याय या भूतलावर मिळेल काय? राष्ट्रवादीने काहीही करून आघाडीमध्ये हा मतदारसंघ स्वतःकडे घ्यावा आणि मग स्वाभिमान पक्षासाठी म्हणजे राणेंसाठी सोडावा, यासाठी हा सगळा आटापिटा चालू असल्याचं तळकोकणातील गजालींवरून समजतं. हे सारं कमी की काय, म्हणून स्वतः पवारसाहेब राणेंचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी कणकवलीत गेले. यावरून अनेक मंडळींनी सुतावरून स्वर्ग गाठला आहेच. परंतु, हेही लक्षात घ्यायला हवं की, कात्रजचा घाट बारामतीपासून बराच जवळ आहे. त्यामुळे पवारांना या घाटात कसं जातात, हे जसं माहीत आहे, तसंच कसं ‘पाठवतात’ हेही चांगलं माहीत आहे. त्यामुळे, काँग्रेस सोडून, स्वतःचा पक्ष काढून आणि भाजपचा खासदार होऊन जेमतेम वर्ष-दीड वर्ष व्हायच्या आतच राणेंना आणखी नवा ‘बाण’ मारायचाच असेल, तर त्यांनी पवारसाहेबांशीच ‘संग’ करावा, हेच उत्तम.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/