दुसऱ्यांना तेजोमय करणारा ‘रवी’

    दिनांक  30-Dec-2018    
 
 
काहीं व्यक्तींचे मित्रत्वाच्या, वडिलकीच्या नात्याने मिळणारे मार्गदर्शन आयुष्यात अत्यंत मोलाचे ठरते. असेच एक मार्गदर्शक, वाचक, लेखक, समाज जागरुक व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्र मालुसरे...
 

मना करा रे प्रसन्नअसा कितीही उपदेश घोकला तरी सदासर्वकाळ ही प्रसन्नता अंगी बाणणे थोडे मुश्कीलच. पण, काहींचे मन अगदी भरकटत जाते, सदैव गोंधळात, चिंतातूर असते. त्यांच्या मनाला कसली तरी भीती, अस्वस्थता विचलित करते. अशा चित्त स्थिर नसलेल्यांना मग समुपदेशकांची मदत घ्यावी लागते. दुसऱ्यांची कोमजलेली मने फुलविण्याचे काम करणारे, मनाला आलेली मरगळ घालवणारे असेच एक जीवनमार्गदर्शक म्हणजे रवींद्र मालुसरे...

 

समुपदेशनाचे काम ते करत नाहीत, तो त्यांचा पेशादेखील नाही. परंतु, आपल्या सहवासात येणाऱ्या अनेकांना ते मोलाचे मार्गदर्शन करतात. रवींद्र यांचा स्वभावदेखील स्पष्टवक्ता. त्यांच्या मुखातून चार कठोर शब्द ऐकून समोरच्याला क्षणभर वाईटही वाटते. पण, त्यांचे हेच कठोर शब्द त्या व्यक्तीवर आपली जादू दाखवतात आणि त्याचे जीवन मार्गी लावतात. मोफत सल्ला देणारे जगभरात अनेकजण भेटतात. पण, सगळेच असे मोफत सल्ला देणारे सुयोग्य मार्ग दाखवतीलच, याची शाश्वती नाहीच. मात्र, मालुसरे यांचे तसे नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ याची त्यांना पुरेपूर जाण आहे. कोणत्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार त्याला कोणता सल्ला समर्पक ठरेल, हे मालुसरे ती व्यक्ती पाहताक्षणीच ओळखतात आणि त्यामुळेच रवींद्र मालुसरे आजवर अनेकांच्या आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ ठरले आहेत.

 

रवी जर मला त्याकाळी भेटला नसता, तर आज मी भरकटलो असतो,” असे त्यांचे मित्र आवर्जून सांगतात, तर “या माणसाने समाजासाठीच आपले आयुष्य वाहिलेले आहे,” अशी प्रेमळ तक्रार त्यांची पत्नी विजया मालुसरे करतात. एका सर्वसामान्य प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारी ही व्यक्ती. मात्र, प्रिंटिंगचे काम करता करता त्यांना वाचनाची आवड जडली. आपल्या वाचनाची आवड जोपासण्यासाठी ग्रंथालय कमी पडले, म्हणून की काय, घरातदेखील पुस्तके रचून ठेवली. आज त्यांचे घर माणसांनी कमी आणि पुस्तकांनीच जास्त भरलेले आहे. वाचनाच्या त्यांच्या आवडीचे रूपांतर पाहता पाहता वृत्तपत्र लेखनात झाले. वाचकपत्रांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे रवींद्र मालुसरे वृत्तपत्रात लेख लिहू लागले. रवींद्र मालुसरे यांची आणखी एक ओळख म्हणजे, ते मराठी वृत्तपत्रलेखक संघाचे अध्यक्ष आहेत. आजवर अनेक दिवाळी अंकांचे संपादन त्यांनी केले आहे. दरवर्षी दिवाळीला वनवासी पाड्यात जाऊन तेथे शालोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा पायंडा त्यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाला घालून दिला. वनवासी पाड्यातील लहानग्यांची दिवाळी गोड करणाऱ्या मालुसरेंनी आजवर अनेकांच्या जीवनात नवचैतन्याचे ज्ञानदीप लावले आहेत.

 

सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून केली. प्रभादेवीत राहणाऱ्या रवींद्र मालुसरे यांच्यासह अनेकांना एका दिवसात अचानक घरे खाली करण्यास सांगण्यात आले. अशावेळी आपले राहते घर आता जाणार, याची त्यांना जाणीव त्यांना झाली. स्थानिक लोकांना एकत्र आणून त्यांनी लढा दिला. शासनाशी पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा घेऊन त्यांनी स्थानिकांना आपल्या हक्काचे घर मिळवून दिले. त्यांच्या या लढ्याला आज यश मिळाले असून प्रभादेवी येथील ‘घरकुल’ ही इमारत आज खऱ्या अर्थाने फळाला आली आहे. मुंबईतील प्रभादेवी या ठिकाणाचा तेथील इतिहासाचा रवींद्र मालुसरे यांनी केलेला अभ्यास वाखाण्याजोगा आहे. मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘प्रभादेवी’ करावे, अशी मागणीही मालुसरे यांनी एका वृत्तपत्रातून केली होती. तसेच त्यांनी या मागणीचा पाठपुरावादेखील केला. अखेर रेल्वे मंत्रालयाकडून त्यांच्या या मागणीची दखल घेण्यात आली आणि स्थानकाचे नामकरण करण्यात आले.

 

रवींद्र मालुसरे हे कोकणासह सहा जिल्ह्यांतील वारकरी संप्रदायासाठी कार्य करणाऱ्या धर्मशाळेचे उपाध्यक्षही आहेत. जुन्या धर्मशाळेचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. रवींद्र मालुसरे आज अनेक पदांवर कार्यरत आहेत. ते म्हणजे त्यांच्यात असलेल्या कुशल नेतृत्वगुणांमुळे! हे नेतृत्वगुण हे आपल्या रक्तात असल्याचे रवींद्र मालुसरे अभिमानाने सांगतात. तानाजी-सूर्याजी मालुसरे आणि १९४२ च्या लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी अंबाजी मालुसरे यांच्या वंशातील असल्याने नेतृत्वगुण त्यांना सहज प्राप्त झालेव्यवहारासाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची आहेच. परंतु, मराठीची कास धरण्याचा आग्रह रवींद्र मालुसरे करतात. “मराठी भाषेची समृद्धी जपण्याकडे त्यांचा कल असतो. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकून लहानाचे मोठे झालेल्या इंग्रजाळलेल्या मुलांनी निदान घरात तरी आईवडिलांशी मराठीत बोलावे,” असे रवींद्र मालुसरे सांगतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरचे पार्टी कल्चर आपल्याकडे रुजू लागले आहे. त्यासाठी पाश्चात्य संस्कृतीला दोष न देता, तो आपल्याकडील वाढता चंगळवाद आहे,” असे मत ते परखडपणे व्यक्त करतात.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/