शोध शोधता तुला...

    दिनांक  29-Dec-2018   

 

 
 
 
 

इराकी ज्यू पित्याच्या शोधाची इस्रायली कन्येची कहाणी

 

लिंडा अब्दुल अजीज मेन्युहीन... सध्या ६८ वर्षांच्या आणि आपल्या सुखी संसारात रमलेल्या, अतिशय उच्चशिक्षित आणि अरबी, हिब्रू, इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या इस्रायली नागरिक. पण, त्यांच्या सुखाच्या आड दडलीय एक करूण कहाणी... इराकमध्ये जन्मलेल्या ज्यूधर्मीय लिंडा तेथील ज्यूविरोधी वातावरणामुळे इस्रायलमध्ये कुटुंबासह स्थायिक झाल्या. काही कारणास्तव त्यांचे वडील इराकमध्येच थांबले. पण, पुढे त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क तुटला. त्यामुळे लिंडाच्या वडिलांचे पुढे नेमके काय झाले, हे कुणालाच ठावूक नाही. धाडसी लिंडाने आपल्या वडिलांना शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केले. पण, तर्कवितर्कांव्यतिरिक्त हाती काहीच लागले नाही. बऱ्याच वर्षांनंतर एका इराकी पत्रकारानेही लिंडाच्या वडिलांसोबत नेमके काय झाले, हे शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, सगळे प्रयत्न अयशस्वीच ठरले. याच विषयावर एक डॉक्युमेंटरीही चित्रित करण्यात आली. त्याचबरोबर लिंडाच्या ब्लॉग्समधून पित्याला शोधणाऱ्या या इस्रायली कन्येची कहाणी जगासमोर आली. लिंडा नुकत्याच भारतभेटीलाही येऊन गेल्या. तेव्हा, आपल्या वडिलांच्या शोधार्थ लिंडा यांनी केलेला संघर्ष, ज्यू म्हणून इराकमध्ये सहन केलेल्या हाल-अपेष्टा यावर प्रकाश टाकणारी ही विशेष मुलाखत...

 

तुमचा जन्म इराकमध्ये झाला आणि तुमच्या आयुष्याची साधारण १५-१७ वर्षे इराकमध्ये गेली. या काळात तुम्ही केवळ ज्यू असल्यामुळे भेदभावपूर्ण वागणुकीला सामोरे जावे लागले का?

 

माझा जन्म १९५० सालचा. माझ्या जन्माच्या वेळीच माझ्या नातेवाईकांचे इराकी नागरिकत्व कायद्याने हिरावून घेण्यात आले. म्हणून ते सगळेच इस्रायलमध्ये स्थायिक झाले. १९६७ पर्यंत आम्ही ज्या घरात राहत होतो, ते घर आणि सगळी संपत्तीदेखील इराक सरकारने ताब्यात घेतली. तरीही आम्हाला इराकमध्ये राहण्याची मुभा मात्र होती. पण, माझ्या आजोबांनी बांधलेल्या एका नवीन घरात आम्ही भाड्याने राहत होतो. त्यावेळी आम्हाला आमच्याच नातेवाईकांशी बोलण्याचीही साधी परवानगी नव्हती. त्याचबरोबर इराक किंवा इस्रायलच्या राजकारणाशी संबंधित कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्याचाही अनुमती नव्हती.

 

इराकमध्ये होणारी ती राजकीय घुसळण निश्चितच आम्हा ज्यूंसाठी भेदभावपूर्ण होती. १९६३ साली जेव्हा इराकमध्ये पहिला लष्करी उठाव झाला, तेव्हा आमच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. अख्खी रात्रं पोलिसांनी आमचे घर पिंजून काढले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मग फक्त धमकावून, आम्हाला दमदाटी करून ते निघून गेले.

 

इराकमधील पहिल्या क्रांतीच्या वेळी माझ्या वडिलांचे मित्र असलेल्या एका मुस्लीम वकिलांच्या घरी आम्ही आश्रय घेतला होता. इराकमधील राजेशाहीला त्यावेळी उलथवून टाकण्यात आले होते. आम्ही आमच्या जीवाला जपावे, असे त्या मुस्लीम वकिलांना वाटायचे. कारण, १९४१ साली इराकमध्ये जी राजकीय पोकळी निर्माण झाली, तेव्हा पोग्रीम येथे १७९ ज्यूंची हत्या करण्यात आली, तर दोन हजारांपेक्षा अधिक ज्यू जखमी झाले होते. पुढे १९५८ ते १९६३ या काळात ज्यूंची परिस्थिती तुलनेने चांगली होती आणि आमचे सर्व नागरी अधिकारही अबाधित होते. पण, इराकमधील राजेशाहीच्या काळात मात्र ज्यूंना वैद्यकशाळांमध्ये प्रवेश नव्हता आणि इतरही बरीच बंधने लादली गेली होती.

 

धर्माने ज्यू असले तरी, तुमच्या वडिलांचे मन इराकमध्ये का रमले? त्यांनी इराकमध्येच थांबवण्यामागे काही विशिष्ट कारणे होती का?

 

माझ्या वडिलांनी असा विचार केला की, इराकमध्ये त्यांना जी पेन्शन मिळेल, त्या आधारे ते इस्रायलमध्ये नंतर स्थायिक होतील. त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी होती. शिवाय, त्यांच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे इराकमधून बाहेर पडणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. त्यांचा पूर्ण विश्वास होता की, ज्यूंना पुढे-मागे पासपोर्ट नक्की मिळेल. याच काळात इराक सोडून पलायन करणाऱ्या १३२ ज्यूंना सरकारने रंगेहाथ अटक केली. नंतर त्यांची सुटकाही झाली आणि ते पळूनही गेले. पण, त्या ज्यूबांधवांनी माझ्या वडिलांनी भरलेली त्यांच्या जामिनाची रक्कम न देताच इराकमधून पळ काढला. त्यामुळे साहजिकच माझे वडील बाथ सरकारच्या रडारवर आले आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला.

 

तुमचे वडील इराकमध्येच थांबले असताना तुम्ही आणि इतर कुटुंबीयांनी इस्रायलमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला?

 

१९६७ साली इस्रायलविरोधाच्या युद्धात अरब सैन्याचा, ज्यामध्ये इराकी सैन्यदेखील सहभागी होते, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ज्यूद्वेषी बाथ सरकार इराकी सत्तेवर आले. ज्यूंवर अनन्वित अन्याय-अत्याचार करून इराकमधील पराभवाचा वचपा काढण्याची आयती संधी त्यांना मिळाली. जर्मनीत ज्याप्रमाणे हिटलरने ज्यूंना छळछावण्यांमध्ये कोंडले, तशाच विकृत कारस्थानाचा बाथ सरकारचाही कट होता. त्यावेळी आम्हा ज्यूंवर प्रचंड बंधने लादण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ज्यूंना इराक सोडण्यापासून परावृत्त करणे, त्यांच्या टेलिफोन लाईन कापणे, विद्यापीठांमध्ये ज्यूंना प्रवेश नाकारणे, कुठल्याही प्रकारच्या संपत्तीच्या विक्रीस मज्जाव करणे, आमच्याच बँक खात्यातून आम्हाला पैसे काढण्यास मनाई करणे, क्लबमधील सदस्यत्व रद्द करणे आणि इतकेच काय तर ज्यूंच्या हक्काची भेटण्याची जागा असलेला ज्यू स्पोर्ट्स क्लबही सरकारने बंद पाडला. त्याचबरोबर इराकी माध्यमांमध्येही ज्यूविरोधी भडकावू मजकुराचा मारा सुरूच होता.

 

एक तरुण म्हणून निश्चितच माझा जीव या वातावरणात गुदरमरत होता. मी माझ्या भविष्याचा विचार करत होते आणि या हिंसक सरकारच्या राज्यात मला कुठलीही सुसंधी दिसत नव्हती. मी माझ्या इंजिनिअर बॉयफ्रेंडसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवत होते. पण, ज्यूंना त्यावेळी नोकरी द्यायलाही कोणी तयार नव्हते. त्याचबरोबर माझ्या आईने लहानपणापासून आमच्या मनात रुजवलेले इस्रायलप्रतीचे प्रेम आणि इस्रायलमधील माझे नातेवाईक यांच्यामुळे मग शेवटी इस्रायलला स्थायिक होण्याचा मी निर्णय घेतला.
 

इराकमधून इस्रायलमध्ये स्थायिक झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही आमूलाग्र बदल झाले का? आणि त्यावेळी तुम्ही इराकमधील तुमच्या वडिलांच्या संपर्कात होता का?

 

सर्वप्रथम तर मला नवीन संस्कृतीशी मिळतेजुळते घ्यावे लागले आणि नवीन भाषादेखील शिकावी लागली. कारण, इस्रायलमध्ये माझी मातृभाषा (अरबी) ही शत्रूची भाषा ठरली होती. म्हणजे, एकूणच मला माझ्या परीने अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. इस्रायलचे वातावरण हे युरोपसारखे मोकळे-ढाकळे, तर इराकचे वातावरण हे अगदी अरब देशांसारखे कट्टर. म्हणजे, मी कसे कपडे घालते, कशी हसते हे सगळे बारकावे मला लक्षात घ्यावे लागले. पण, त्यातल्या त्यात हिब्रू आणि अरबी भाषेमधील साम्यामुळे मला अरबी भाषा आत्मसाद करणे तुलनेने सोप्पे गेले. पुढे मी माझ्या कौशल्यांचा वापर करायला सुरुवात केली. मी अशा ठिकाणी नोकरीसाठी रुजू झाले, जिथे अरबी भाषेला शैक्षणिक मूल्य होते. इस्रायलमध्ये एक वर्ष घालण्यापूर्वीही मी पॅलेस्टिनींना हिब्रू शिकविण्याचेही काम केले. इराकपेक्षा साहजिकच वेगळे नियम असलेल्या या नवीन वातावरणात आणि समाजात मी स्वीकार्ह होण्याच्या प्रक्रियेतच व्यस्त होते. एका इस्रायली मुलाशी लग्न केल्यानंतरही मला इस्रायली समाजात पूर्णपणे समरस होण्यासाठी तब्बल २० वर्षं लागली. मला भरपूर गोष्टींशी मिळतेजुळते घ्यावे लागले, खासकरून इस्रायली गाणी जी माझ्या इराकी गीतांपेक्षा फारच वेगळी होती.

 

इराक सोडल्यानंतरही माझ्या एका काकूच्या माध्यमातून आमचा वडिलांशी पत्रव्यवहार सुरू होता. आम्ही काकूकडे अमेरिकेत आधी पत्रं पाठवत असू आणि मग माझी काकू त्या पत्रांचा लिफाफा बदलून अमेरिकेहून इस्रायलला पाठवायची. कारण, त्यावेळी इराक आणि इस्रायलचे कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते. एवढेच नाही तर, मला माझी भाषाही अत्यंत जपून वापरावी लागायची. इस्रायल किंवा त्याच्याशी साधर्म्य साधणारा कुठलाही उल्लेख त्या पत्रांमध्ये कटाक्षाने टाळला जायचा. माझ्या वडिलांच्या शेवटच्या काही पत्रांवरुन ते पैसे गोळा करण्याचा प्रयत्न होते, एवढेच मला समजले. ते सर्वस्वी एकटे पडले होते आणि आम्हाला भेटण्याचीही त्यांना तीव्र इच्छा होती. ज्यूंना पासपोर्ट मिळण्याची थोडी फार चिन्हे दिसत होती आणि कदाचित त्यांनाही पासपोर्ट मिळेल, या भाबड्या आशेत त्यांनी जन्मभूमी, कर्मभूमी इराकमध्ये थांबणे पसंत केले.

 

पण, मग तुमचे वडील इराकमध्ये नाहीत, हे तुम्हाला कसे आणि केव्हा समजले? त्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?

 

मीजेरुसलेम पोस्टहे वर्तमानपत्र वाचताना इराकी ज्यूंच्या अपहरणाची बातमी माझ्या वाचनात आली. मी खूप घाबरले आणि क्षणभर माझा त्या बातमीवर विश्वासच बसेना. मला वाटत होते, माझे वडील कदाचित कुठे तरी लपले असावेत. इराकमधील ज्यू समाजाच्या अध्यक्षांकडून जेव्हा आम्हाला माझे वडील इराकमधून पळून गेल्याची माहिती देण्यात आली, तेव्हा माझी आई आणि बहीण त्या विरोधात उपोषणाला बसले. माझा तरीही इराक सरकारच्या दाव्यावर विश्वास नव्हता. मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी हेच वाटत होते की, माझे वडील कुठे तरी लपून बसले असावेत.

 

माझ्या वडिलांच्या शोधार्थ पुढच्याच वर्षी म्हणजे १९६३ साली मी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात जेनेव्हाला गेले, नंतर न्यूयॉर्कलाही गेले, पण त्यांचा ठावठिकाणी कळू शकला नाही. इराक आणि इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने इराकमधून दाखल झालेल्या ज्यूंबांधवांशीही आम्ही संपर्क साधला. पण, माझ्या वडिलांच्या अस्तित्वखुणांचा कुठलाही सुगावा लागला नाही. जसजसा काळ पुढे सरकत होता, तसतसा आमचा विश्वास बसू लागला की, त्यांची इराकमध्ये हत्या झाली असावी. त्यातच इराकच्या तुरुंगातून चमत्कारिकरीत्या सुटून इस्रायलमध्ये दाखल झालेल्या एका ज्यूबांधवाने माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे तुरुंगात ऐकल्याचेही सांगितले. एवढ्या प्रयत्नांनंतर अखेरीस मी ‘डेडएण्ड’पर्यंत पोहोचले.वडिलांचा शोध थांबवून माझ्या आयुष्याकडे आणि भविष्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.

 

तुमचा याच विषयासंबंधी अरबी भाषेतील ब्लॉग वाचून एका इराकी पत्रकाराने तुमच्याशी संपर्कही साधला. तुमच्या वडिलांसंबंधी अधिक शोध घेण्याची तयारीही दर्शविली. तुमच्या याच वैयक्तिक अनुभव व इराकी पत्रकाराशी चर्चांच्या आधारे प्रसिद्ध चित्रपटनिर्माते ड्यूकी डोर यांनी ‘शॅडो ऑफ बगदाद’ ही डॉक्युमेंटरीदेखील तयार केली. तेव्हा, या एकूणच प्रक्रियेनंतर आणि इराकी पत्रकाराच्या शोधमोहिमेतून तुमच्या वडिलांसंदर्भात काही तथ्ये हाती आली का?

 

खरं तर माझा विश्वासच बसत नव्हता की, केवळ ज्यू असल्यामुळे माझ्या वडिलांची इराकमध्ये हत्या झाली असावी आणि म्हणूनच तोच माझ्या शोधमोहिमेमागचा हेतू होता. या शोधादरम्यान मी भरपूर इराकी ज्यूंची माहिती मिळविली, काहींचे अपहरण करण्यात आले होते, तर काहींची हत्या. त्यातले काही ज्यू श्रीमंतही होते, पण माझे वडील मात्र गरीब होते. तरीही माझी इच्छा होती ते किमान त्यांच्या मृत्यूची नेमकी तारीख आणि कोणत्या परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला, हे शोधून काढण्याची. कारण, इराकी नोकरशहांचा अगदी लहान सहान गोष्टींच्या, घटनांच्या नोंदीकरणावर भर असायचा. मला मदत करणाऱ्या इराकी पत्रकाराने त्याच्या शोधाअंती हीच बाब अधोरेखित केली की, माझ्या वडिलांची देणी असल्यामुळे त्यांना पासपोर्ट मिळू शकला नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, त्यांना तुरुंगातून सोडवलेल्या ज्यूंची जामिनाची रक्कम जमा करायची होती आणि दुर्दैवाने माझे वडील तेवढे पैसे उभे करू शकले नाहीत. अशाप्रकारे दोन डझनहून अधिक ज्यूंनी इराकमधून पलायन केल्याने सरकारने त्यांना फासावर लटकवल्याचे, हालाहाल करून मृत्यू दिल्याचे कुठलेही रीतसर स्पष्टीकरण देणे अगदी सहजपणे टाळले. मला नंतर ही माहितीदेखील मिळाली की, ज्यूंच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इराकींनी चक्क अ‍ॅसिडचाही वापर केला. त्यामुळे कसर अलनिहायाच्या तुरुंगात माझ्या वडिलांची हत्या केल्याचा मला दाट संशय आहे.

 

या सगळ्या प्रकरणी तुम्ही कधी थेट इराकी सरकारकडे पाठपुरावा केला का? आणि केला असेल, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळाले?

 

आमच्याकडून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणजे, मी वॉशिंग्टनमधील इराकच्या दुतावासाशीही संपर्क साधला. त्यांनी मला डीएनए चाचणी करून त्याचे नमुने इराकी परराष्ट्र मंत्रालयाला पाठविण्यास सांगितले. हा अत्यंत अपमानास्पद प्रकार असून, त्यामुळे हाती काहीही लागणार नव्हते, म्हणून तोे पर्याय मी स्वीकारला नाही.

 

तुमच्या वडिलांप्रमाणेच हजारो ज्यूबांधव इराकींच्या हिंसेला बळी पडले. फक्त इराकच नाही, तर अरबजगतातून ज्यूंच्या रक्तांचे अक्षरक्ष: पाट वाहिले. याकडे तेव्हा आणि आता इस्रायल सरकार नेमके कसे पाहते? त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, समाज माध्यमांवरही तुम्ही ज्यूंविरोधी अत्याचाराला वाचा फोडली. या सगळ्या प्रयत्नांचा काही सकारात्मक परिणाम आपणाला दिसून आला का?

 

खेदाने सांगावे लागेल, पण ज्यूंवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचे महत्त्व न समजल्यामुळे इस्रायलकडून या गोष्टींची उचित दखल घेतली गेली नाही. या काळात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या बाबतीत उलथापालथ झाली. साडेआठ लाख ज्यूंना अरबराष्ट्रांमधून हाकलवण्यात आले, तर काही स्वत:हून जीव मुठीत घेऊन इस्रायलमध्ये दाखल झाले. त्याचबरोबर ६ लाख, ७० हजारांच्या आसपास अरबांना पॅलेस्टाईनमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला किंवा त्यांनीच पलायन केले. ‘जेजेएसी’ आणि ‘जेआयएनइएनए’ या संघटनांबरोबर काम करताना अमेरिकेने इराकचा ताबा घेतला होता, अगदी तेव्हापासूनच मी अरबराष्ट्रांतील ज्यूंच्या समस्या विविध व्यासपीठांवर मांडते आहे.

 

पण, अखेरीस या गोष्टींची इस्रायलच्या कनॅसेट सभागृहालाही दखल घ्यावी लागली. परिणामस्वरूप दरवर्षी अरब जगतातील ज्यूंवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचे स्मरण केल्यामुळे हा दुर्लक्षित मुद्दा प्रकाशात आला.

 

तुमच्या आयुष्यातील या सगळ्या क्लेशकारक घटनांनंतर परत इराकला जायला आवडेल का?

 

खरं सांगू तर इराकमध्ये इस्रायली राजदूत म्हणून काम करण्याचे माझे स्वप्न आहे. या सगळ्या प्रकरणाचा शेवट करण्याचा तो एक चांगला मार्ग ठरेल, असे मला वाटते. मी एका नवीन प्रोजेक्टवर काम करतेय. त्या अंतर्गत आम्ही इराकी तरुणांना इस्रायलमधील इराकी ज्यूंशी गाठभेट घालून देतो. अशाप्रकारे दोन्ही देशांमध्ये एक दुवा म्हणून काम करण्याचे माझे प्रयत्न असतात. तसेच अर्थव्यवस्थेमध्ये तसेच इतर क्षेत्रांमध्येही बहुमूल्य योगदान देणाऱ्या इस्रायली ज्यूंविषयी इराकमध्येही कमालीची उत्कंठा आहे. पण, ते काहीही असले तरी इराकमध्ये स्थायिक होणे आता मात्र शक्य नाही. कारण, तिथे स्थायिक होण्याचा अर्थ म्हणजे स्वत:च्या कुटुंबापासून दूर जाणे. त्यामुळे जगभरातील इराकी ज्यूंची एक स्थिर आणि लोकशाहीप्रधान इराकला भेट देण्याचीच इच्छा आहे.

 

काही दिवसांपूर्वीच तुम्ही भारताला भेट दिलीत. तेव्हा, एकूणच भारतभेटीचा हा अनुभव कसा होता?

 

भारतीय खानपान, संगीत आणि चित्रपट अशा बऱ्याच गोष्टी भारतीय आणि इराकी ज्यूंमध्ये साधर्म्य साधणाऱ्या आहेत. मी हार्वर्ड विद्यापीठात असताना मला सार्वजनिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळाली. पण, माझ्यासाठी सगळ्यात आश्चर्यकारक गोष्टी होती ती म्हणजे ट्राफिकमध्ये अडकलेल्या वाहनचालकांचा संयम. लोक ट्राफिक जाममध्ये वाहने चालवताना कंटाळत नाही, हे बघून जरा आश्चर्यच वाटले.

 

चित्ताकर्षक देखाव्यांमुळे, निसर्ग सौंदर्यामुळे माझी दक्षिणेकडील केरळ राज्यातील सफर खरंच संस्मरणीय ठरली. माझ्या या भारतभेटीदरम्यान मला दिसला तो विविध जाती-धर्मांचा परस्परांच्या रुढी-परंपरांविषयीचा आदर... प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचे, देवपूजेचे स्वातंत्र्य... त्याचबरोबर ‘फक्त पुरुषांच्या’ अशा समजल्या जाणाऱ्या पदांवर कार्यरत महिलांना भेटूनही मला आनंद झाला. भारतातील वस्त्रोद्योग आणि फॅशन क्षेत्र तर अगदी भुरळ पाडणारे... त्यामुळे मला पुन्हा एकदा भारताला भेट द्यायला आवडेल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/