याला जीवन ऐसे नाव...

    दिनांक  18-Nov-2018   

 


 
 
 
विनासायास फक्त बसल्याजागी पैसे मिळावेत, असे लक्ष्मीला मुळीच वाटत नाही. लोकांनी तिला सहानुभूती दाखवून आर्थिक मदत करावी, अशीही तिची अपेक्षा नाही.
 

सौंदर्यवतींपुढे जग झुकते असे म्हणतात पण, सौंदर्य हे एखाद्या महिलेसाठी शापही ठरू शकते. याचा प्रत्यय लक्ष्मी अग्रवाल हिला पाहून येतो. ऐन वयात आलेली असतानाच ती अॅसिड हल्ल्याची बळी ठरली. आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या माणसाच्या प्रेमाला नकार दिला म्हणून त्याने तिच्यावर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यातून ती बचावली खरी पण, येणाऱ्या काळात तिला भोगावे लागणारे दुष्परिणाम हे भीषण होते. अॅसिड हल्ल्यामुळे तिने सौंदर्य तर गमावले होतेच पण, तिचा कुरूप चेहरा तिला सुखाने जगू देत नव्हता. समाज आपल्याला स्वीकारेल का, लोक आपल्याला सहानुभूती देतील की आपला कुरूप चेहरा पाहून घाबरतील? कसे वागतील लोक आपल्याशी? या सगळ्या प्रश्नांपेक्षा तिने स्वत:ला स्वीकारणे हे कितीतरी महत्त्वाचे होते. मानसिकदृष्ट्या हे तिच्यासाठी खूप मोठे आव्हान होते. परंतु, या आव्हानावर मात करत तिने आपल्यासारख्याच अॅसिड हल्ल्याचा बळी ठरलेल्या महिलांसाठी एक पाऊल उचलले.

 

लक्ष्मीने ‘छाँव’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. ही संस्था स्थापन करण्यासाठी तिला आलोक दीक्षित या समाजकार्यकर्त्यांची साथ लाभली. आलोक आणि लक्ष्मी यांनी एकत्रितरित्या अॅसिड हल्ल्याच्या पीडित महिलांसाठी लखनऊ आणि आग्रा येथे ‘शीरोझ’ कॅफे सुरू केले. ‘शीरोझ’ अर्थात ‘शी-हिरोझ’ ‘तिच्यात दडलेला हिरो’ असा याचा अर्थ होतो. या कॅफेत येणाऱ्या लोकांना पैसे आकारताना तुम्हाला शक्य असेल तितकी बिलाची रक्कम द्या, अशी विनंती केली जाते. या कॅफेच्या माध्यमातून जितके पैसे मिळतात ते ‘छाँव’ संस्थेच्या कार्यासाठी वापरले जातात. याद्वारे अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना खऱ्या अर्थाने सावली दिली जातेलक्ष्मीचे हे कार्य पाहून आणि तिच्यात असलेले अफाट धैर्य पाहून २०१४ मध्ये ‘इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने लक्ष्मीला सन्मानित करण्यात आले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या हस्ते हा पुरस्कार लक्ष्मीला देण्यात आला. इतकेच नव्हे, तर लक्ष्मीला २०१६ मध्ये लंडन येथील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘फॅशन वीक’मध्ये रॅम्पवॉक करण्याची संधी मिळाली. टीव्हीवरील एका कार्यक्रमाच्या काही भागांचे सूत्रसंचालनही तिने केले.

 

हे सगळे एकीकडे चालू असताना लक्ष्मीच्या व्यक्तिगत आयुष्यातही अनेक बदल होत होते. लक्ष्मीला तिच्या कार्यात मोलाची साथ देणारा आलोक दीक्षित याच्या ती प्रेमात पडली आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एका अॅसिड हल्ला पीडित महिलेचा आपल्या जीवनात स्वीकार केल्याबद्दल आलोक दीक्षित याच्या निर्णयाचे समाजात कौतुकही झाले. परंतु, दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याने तितकीच चर्चाही झाली. काही वर्षांनी दोघांना पीहू नावाचे एक कन्यारत्न झाले. सुरुवातीच्या काळात गोडीगुलाबीने सुरू झालेला हा संसार अवघ्या काही वर्षांतच संपुष्टात आला. काही कारणास्तव दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलासध्या लक्ष्मी मुलगी पीहूसोबत दिल्लीत एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत आहे. प्रचंड बिकट अशा आर्थिक परिस्थितीचा तिला सामना करावा लागत आहे. साधे घरभाडे भरण्यासाठीही तिच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. अशी तिची दयनीय अवस्था आहे. लक्ष्मी याबाबत म्हणते की, “मला लोक माझी कहाणी सांगण्यासाठी, माझ्या संघर्षाविषयी बोलण्यासाठी टीव्ही कार्यक्रमात आमंत्रित करतात. रॅम्प वॉक करायला बोलावतात. अनेक पुरस्कार देऊन माझा, माझ्या धैर्याचा सन्मान केला जातो. मला आदर दिला जातो. हे सर्व आनंद देणारे आहे. परंतु, जगण्यासाठी हे सारे पुरेसे नाही. कारण, कोणत्याही गोष्टीचे सोंग करता येते. परंतु, जगात पैशाचे सोंग आणता येत नाही. मला कोणत्याही कार्यक्रमासाठी मानधन दिले जात नाही.”

 

विनासायास फक्त बसल्याजागी पैसे मिळावेत, असे लक्ष्मीला मुळीच वाटत नाही. लोकांनी तिला सहानुभूती दाखवून आर्थिक मदत करावी, अशीही तिची अपेक्षा नाही. तिच्या किमान गरजा भागविण्यासाठी नोकरी करण्याची तसेच पडेल ते काम करण्याची तिची तयारी आहे. तिची मुलगी पीहू हिच्या भविष्याची चिंता तिला सतावत आहेलक्ष्मी अग्रवाल हे नाव आज तिने केलेल्या कार्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. लक्ष्मीची जीवनकहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. अॅसिड हल्ल्याच्या पीडितांसाठीच नाही, तर जगातील प्रत्येक महिलेने तिचा आदर्श घ्यावा, अशी ही कहाणी आहे. अॅसिड हल्ल्यासारख्या दुर्दैवी घटनेवर लक्ष्मीने मात केली. आता पुढ्यात असलेल्या आर्थिक संकटावरही ती नक्कीच मात करेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/